असे म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी" या उक्तीस समर्पक असा...चंदनाची फुले...
रसग्रहण - राजेंद्र महादेव जाधव
चंदनाची फुले...चंदना सोमाणी
असे म्हणतात ,' जे न देखे रवी ते देखे कवी '
या उक्तीस समर्पक असा ' चंदनाची फुले ' हा चंदना सोमाणी यांचा काव्यसंग्रह वाचनात आला. त्यातली काही फुले सामायिक करावीशी वाटतात. तश्या सर्वच कविता आणि गझल मस्तच पण त्यातही काही भावलेल्या....
कसा आवरू मी व्यथेचा पसारा
उधळतो सुखाला इथे रोज वारा
आपले जीवन असेच नाही का?
'सहाण' आणि ' चंदन 'यांचे नाते आपल्या काही नात्यांनाही लागू पडते जे कवयित्रीनी छान मांडलेय...
'कितीही जरी यत्न केला तरीही
सहाणे विना गंध ना चंदनाला
"त्याग समर्पण फक्त चंदनाचेच का?
सहाण पण झिजते सोबत
आयुष्य कसे भरभर निघून जाते कळतच नाही आणि या ओळीही पुरेश्या पटतात...
'थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा'
आणि अश्या या जीवन प्रवाहात अशीही कुचंबणा वाटेस येते..
'विवंचना ही कुणास सांगू
माझ्यापुरता समास माझा'
लहानपणी जसजसे समजू लागते, जगरहाटी प्रमाणे मनुष्य वेगवेगळे मुखवटे लाऊन जगू, वावरू लागतो...
'कलेकलेने पुनवेसाठी
चंद्र आपुले अंग बदलतो
समोर दिसता मृत्यू तेव्हा
माणूस का मग रंग बदलतो
एका कवितेत 'जीवन ' आणि ' 'जिंदगी ' यातही फरक आहे हे चंदना जाणवून देतात.
'जीवनाला बनवतो चवदार हा
लोणच्याचा खार आहे जिंदगी
कोरते मृत्यू कपाळी शेवटी
थांबते अनुस्वार आहे जिंदगी
तुम्हाला या ओळी वाचून राजेश खन्नाचा ' आनंद ' आठवला असेल..
"बाबू मोशाय ,जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं "
काहीजण उगाच सहानुभूती आणि कीव दाखवतात. खरे तर sympathy पेक्षा empathy जास्त महत्त्वाची आहे हेच ते विसरतात.
मोकळा जर श्वास नाही, कोरडा पान्हा कशाला
बेगडी उपकार सुद्धा वाटतो आता नकोसा
दुश्मनाला लाज वाटे हादरे ही भिंत जेव्हा
नाटकी शेजार सुद्धा वाटतो आता नकोसा
कितीदा बघावे नको त्या रुपांना
खऱ्या दर्पणांचा किती कोंडमारा
आभाळ,स्वर्ग यांचेही जीवनाशी नाते काही वेगळेच हे काही ओळी सुचवून जातात.
आभाळाला दुःख कशाचे
कोसळणाऱ्या ढगास ठावुक
फक्त दिखावा नम्र पणाचा
किती 'मी'पणा स्वतःस ठावुक
म्हणतो आपण स्वर्गच गाठू
खरे की खोटे सुतास ठावुक
जगाच्या या मोहमयी पसाऱ्यात असे अडकतो की...
मोहमयी डाव सारा
उधळता आला नाही कधी
आसक्ती निर्माण होताना
विरक्ती शिवलीच नाही कधी
....एक उद्योगपती मरणासन्न... सर्वांस विचारतोय ..कुठे आहात...मुलगा,मुलगी,बायको,नातवंडे,सूना सर्व सांगतात.. जवळ आहोत..उद्यागपती कातर स्वरात " अरे, मग दुकानात कोण आहे? '..अशी अवस्था आहे आपुली..
नात्यांतील फोलपणा ही चंदना यांच्या काही ओळी सांगून जातात..
त्या काळचा धोबी तो आजही जिवंत आहे
आजही जनाचे ऐकून राम सीतेस त्यागत आहे
आणि तरीही कसेही जीवन असो,कसेही लोक असोत/ वागोत कसेही उतार चढाव ही असो....
सदाचाराची साठव नगद
दुराचाराचा कर खर्च
हाच खरा असेल हिशोब
बाकी सारे बेहिशोब
असे चंदनाजी सांगून जातात.
राजेंद्र महादेव जाधव
०९ /१०/२०२४


