गझल - सांजवेळी ही उदासी
काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी
का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी
याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम केले
तेच क्षण उधळीत येते सांजवेळी ही उदासी
का मला दिसलेच नाही ते झिरपणेही ढगांचे
आसवे भिजवीत येते सांजवेळी ही उदासी
भासला होता तुझा तो स्पर्श तेव्हाचा मिडासी
अन् तुला गुंफीत येते सांजवेळी ही उदासी
साहिला आजन्म सारा मी दुरावा आपल्यांचा
दाह गोंजारीत येते सांजवेळी ही उदासी
चंद्रही झाकोळला अन् चांदण्याही लुप्त झाल्या
पौर्णिमा कोरीत येते सांजवेळी ही उदासी
ठेवले उश्वास काही मी उशाशी सांजवेळी
त्याच चाकोरीत येते सांजवेळी ही उदासी
चंदना सोमाणी ©®

चंदना तुझी गझल चंद्रासारखी कलेकलेने पौर्णिमा होऊ पाहते........
ReplyDeleteप्रत्येक शेर लाजवाब 👌👌👌😘