अंधार या मनाचा की कोणती विराणी
मी आळवीत आहे गाणी उदासवाणी
वाटे मनास माझ्या येथून दूर जावे
आभाळ मागते हे फिरुनी पुन्हा निशाणी
भरले जरी कितीही आकाश चांदण्यांनी
खोटीच आज वाटे माझी मला कहाणी
ना वाटली तमाही अंधारल्या जगाची
होतीच रात वेडी ती काजवी दिवाणी
खोटारड्याच बाता मारू नये जगाने
फुलते कधी कुठे? का दिवसाच रातराणी
वाऱ्यासवे पसरला हा गंध भोवताली
बागेत ठेवली ही कोणी गुलाबदाणी
गेले जरी उन्हाने करपून रान सारे
आहे अजून थोडे या कातळात पाणी
डोळ्यात प्रश्न साधा त्या कोवळ्या वयाच्या
ही जात कोणती अन् ही कोणती घराणी
चंदना सोमाणी ©®

Outstanding ❤️👌👌
ReplyDeleteThank you so much...❤️
Deleteखूप सुंदर गझल बेटा!
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 🌹 काका
DeleteHat's off.......... काय लिहीतेस गं साक्षात सरस्वती सरसर उतरते तुझ्या लेखणीतून....✍️
ReplyDeleteI am a BIG fan of you ❤️😘