Followers

Wednesday, 3 April 2024

मराठी गझल - कोण जाणे

 गझल - कोण जाणे 

त्या क्षणांचे काय होते कोण जाणे
अन् मनांचे काय होते कोण जाणे

विस्तवाच्या भर उन्हाने पोळलेल्या
सावल्यांचे काय होते कोण जाणे

सांडलेले श्वास ज्यांचे त्या नकोशा
घुंगराचे काय होते कोण जाणे

ज्यात मोती सापडेना त्या अभागी
शिंपल्यांचे काय होते कोण जाणे

लोपते कटुता तमाची, अन् प्रभाती
तारकांचे काय होते कोण जाणे

शब्द नाही, अर्थ नाही, ओठ मिटल्या
अक्षरांचे काय होते कोण जाणे

वेदनाही मुक्त नाही ज्या चुड्यांच्या
हुंदक्यांचे काय होते कोण जाणे

चंदना सोमाणी ©®

2 comments:

  1. प्रत्येक शेर जीवघेणा... जबरदस्त गझल

    ReplyDelete

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...