Followers

Wednesday, 10 April 2024

माझे दोन शब्द - उन्हात घर माझे


रसग्रहण - चंदना सोमाणी 

             *मज नको हे गगन धरा
              दे मनाचा रिता कोपरा*...
जगातील कोणतेही सुख त्यागून फक्त मनाचा रिता कोपरा मागणे सोपे नाही. जी व्यक्ती स्वतः मनाने निर्मळ, निस्वार्थी असेल तीच अशी मागणी करू शकते... मग तो कोपरा प्रत्येक समोरच्या व्यक्तीचा हवा...
म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्ती, आपली.. सोबतच परकीही खरंच.. काय सुंदर शेर हा....

            *सावल्यांचे नव्हे शहर माझे 
              बांधले मी उन्हात घर माझे*

काय अप्रतिम शेर आहे हा...
आयुष्यभर जर काबाडकष्ट करूनही आपल्या हाती काहीच लागत नसेल तर त्या मृगजळापाठी धावण्यापेक्षा आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती हीच खरी खिलाडूवृत्ती नाही का....??
 सही... सही.... वाह नितीन दा 
मला तरी या शेराचा अर्थ असाच काहीसा उलगडला...

याच गझलेतील एक शेर
           *मी तुझा चांगलेपणा जपतो
             तू गुन्हे तेवढे विसर माझे*

चुका आयुष्यात प्रत्येकाकडून होतात. त्याच त्या गोष्टींचा बाऊ न करता वेळप्रसंगी जर एकमेकांना समजून उमजून घेतले तर जीवन अधिक सुखकर होईल नाही...?
त्याच धर्तीवर हा एक शेर

           *भांडण मिटवू ठरवू नंतर 
             कोण चुकीचे कोण बरोबर*..

खूपच छान असे हे शेर नितीन दा... सहजीवनाच्या वाटेवर समजले तर  साखर पेरणारे 👍

आहाहा काय शेर आहे.. दादा

            *शतकांची पापे धुतल्यावर ही
              गंगेचे पाणी निर्मळ अजून*

आपल्या माणसांच्या चुका आपल्या पोटात घालून त्यांच्यावर पूर्वीइतकेच प्रेम करणे, त्यांना तोच आदर देणे सोपे नाही... त्यासाठी गंगाच व्हायला हवे...

            *जीवनाला दिशा लाभली
              पावलांचा फिरे भोवरा*... 

अतिशय लक्षवेधक शेर...
होय... एखादा मार्ग सापडला की पावले आपोआप त्या वाटेवर चालू लागतात. ती दिशा योग्य आहे कळले की तो मार्ग निश्चित होतो आणि एकदा का मार्ग निश्चित झाला प्रवास अखंडित सुरू होतो... सुंदर सुंदर... 

              *लावले सर्व बळ पणाला मी
                सिद्ध केले खरे स्वतःला मी*

स्वतःला सिद्ध करणे इतकेही सोपे नसते...पण खरंच दादा "उन्हात घर माझे" या संग्रहातून तुम्ही स्वतःला एक चांगला कवी-गझलकार म्हणून सिद्ध केले आहे यात दुमत नाही. कविता, लावणी,मुक्तछंद मुक्तके सर्वच त्यांच्या त्यांच्या जागी छान आहे...
कवी आपल्या सोबतच इतरांचेही भोगलेले, सोसलेले लिहितो हीच त्याची खासियत असते आणि हेच शब्द त्याच्या संवेदनशील मनातून अवतरले की इतरांचे मन त्या शब्दांवर पकड घेते व त्याला ते आपलेसे वाटतात, हीच या शब्दांना मिळालेली उत्कृष्ट दाद असते...
एकंदरीत काय तर पुस्तक आवडण्याजोगे आहे. प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे एक आगळेवेगळेपण जपणारे सुंदर पुस्तक...
सलील कुलकर्णी सरांची सुंदर प्रस्तावना तसेच गझलनवाज भीमराव पांचाळे दादांनी भरभरून दिलेल्या शुभेच्छा व आशीर्वाद संग्रहाची शोभा वाढवणाऱ्या आहेत...
शब्दांच्या दुनियेत मला भेटणाऱ्या अनेकांपैकी एक नितीन दादा...कधी भेटलो, बोललो नाही पण हक्काचा भाऊ मिळाला... त्याच्या पुस्तकावर दोन शब्द लिहावे इतकीच मनोमन इच्छा झाली आणि त्यासाठी हा शब्दप्रपंच...

जाता जाता इतकेच लिहीन...

              ह्या चिखलाच्या दुनियेमध्ये राहुनही मी
              कसे ठेवले काळीज निर्मळ मला विचारा..

चिखलातूनच कमळ उगवते आणि सर्वांना मोहित करते असाच हा संग्रह किती किती सुंदर आहे हे मला विचारा... आशयसंपन्नते सोबतच कलात्मक रीतीने मांडणी, वाचनीय, संग्रही असावा असाच...
नितीन दा खूपच सुंदर असा हा संग्रह.. खूप खूप धन्यवाद आपण मला हे शब्दधन आठवणीने पाठवून दिले यासाठी.. 🙏💐
पुढील लेखन प्रवासासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा... लिहित रहा....👍👍 

चंदना सोमाणी ©®

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...