गझल- मनबिंब पाहते मी
पाण्यात या नभाचे प्रतिबिंब पाहते मी
सूर्यास त्या क्षणाला मग चिंब पाहते मी हे रूप गोजिरीचे ते रूप साजिरीचे
ऐन्यात हासणारे डाळिंब पाहते मी
हा डाग विस्तवाचा की दाह वास्तवाचा
जो ठेवला मनी तो कडुलिंब पाहते मी
रेखाटली जरीही मी वर्तुळे कितीही
एका क्षणात का मग हे टिंब पाहते मी
आहे जरी दुरावा दोघांमधे तरीही
माझ्या तुझ्या मनाचे मनबिंब पाहते मी
चंदना सोमाणी ©
