गझल - जिंदगी
सोसवेना भार आहे जिंदगी
टांगती तलवार आहे जिंदगी
सोबतीला चांदणे आहे तरी
पेटता अंगार आहे जिंदगी
कोंडमारा होत आहे हा किती
वादळी अंधार आहे जिंदगी
राहिले नात्यास नाही मोल ही
भावना बाजार आहे जिंदगी
यातनाही साहते नात्यातली
हा कसा संसार आहे जिंदगी
जीवनाला बनवतो चवदार हा
लोणच्याचा खार आहे जिंदगी
कैकदा वाटे मला ही तर हवी
कैकदा बेजार आहे जिंदगी
सार हा घे जीवनाचा चंदना
बघ कशी साकार आहे जिंदगी
अंतरिक्षा घालते ही गवसणी
देहधारी घार आहे जिंदगी
कोरते मृत्यू कपाळी शेवटी
थांबते अनुस्वार आहे जिंदगी
चंदना सोमाणी ©®

जिंदगी.........!
ReplyDeleteखरंच इतकी साधी सोपी नक्कीच नाही...... जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो म्हणून तर कधी प्रेमाने जीवन जगण्यासाठी धडपड करतो.....
हीच जिंदगी कितीतरी उदाहरणे देऊन जबरदस्त शब्दात वर्णन केली आहे. दमदार लेखणी......
लोणच्याचा खार आहे जिंदगी
स्वत:वरच भार आहे जिंदगी