Followers

Saturday, 21 February 2026

मराठी गझल - जखम उर्मिलेची

गझल - जखम उर्मिलेची

का आत आत माझ्या अंधार कोसळे
हा सूर्य कोणता जो माझ्या सवे जळे

ठेवीन दिमकतीला मी शेकडो झरे
देईल काय धोका राखील जो तळे

नजरेसही दिसेना शोधू तरी कुठे
ही जखम उर्मिलेची आतून साकळे

हा प्रश्न पावसाला पडलाच शेवटी
अश्रू तरी कुणाचे सर्वात वेगळे

मी जोजवू कसे या दुःखास पोरक्या
पाहून दुःख माझे काळोख तळमळे

कोणीतरी उगीचच हा वाद घातला
भरणार ना कधीही शेतातले खळे

अदृश्य होत गेली ही अक्षरे कशी
लिहिले जरी कितीही कोरेच हे फळे

चंदना सोमाणी ©®

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...