संवेदनांच्या ताटव्यात फुललेली "चंदनाची फुले"
रसग्रहण - चंद्रकांत चव्हाण
संवेदनांच्या ताटव्यात फुललेली ‘चंदनाची फुले’
शब्दांशी सख्य साधायला साऱ्यांनाच आवडते, पण त्यांच्या संगतीने नेमके व्यक्त होणे सगळ्यांनाच अवगत असते असे नाही. सुंदर शब्दांचा सहवास अंतरी आनंद पेरतो. त्यांना भावनांचा ओलावा लाभला की, आकांक्षांची रोपटी अंकुरित होतात. परिस्थितीचा ऊनवारा झेलत ते बहरत राहतात. अशावेळी गिरवलेली, लिहिलेली अक्षरे केवळ ध्वनींना अंकित करणारी चिन्हे नाही राहत, तर भावनांचं आभाळ होऊन अंतरी सुखसंवेदना पेरत असतात. या अनुभूतीला कोणी अपवाद असेल, असं वाटत नाही. अर्थात, यातून चंदना सोमाणी हे नाव तरी वेगळे कसे काढता येईल? संवेदनांच्या बहरलेल्या ताटव्यातून प्रसन्नतेचा परिमल घेऊन वाहणारे त्यांचे शब्द या विधानाच्या पुष्ट्यर्थ प्रमाण म्हणून पुरेसे आहेत. कवितासंग्रहाच्या मनोगतात ही भावना व्यक्त करताना त्या म्हणतात,
मनातले भाव कागदावर उतरवते
भावना व्यक्त करण्यात आनंद मिळवणे
कधी त्या भावना तुझ्या, तर कधी माझ्या (पृष्ठ. ५)
कोणी याला कल्पनाविलास, कविप्रतिभा वगैरे म्हणून वास्तवाचा अन् अशा शब्दांचा फारसा संबंध असतोच असे नाही म्हणेल, कोणी अनुभवातून हाती आलेलं संचित असल्याचे सांगेल, कोणी याला वाचकप्रिय अनुनय म्हणेल, कोणी आणखी काही. कोणी काही म्हटले, म्हणून विधानांचे अर्थ काही सहजी बदलत नसतात. ते त्यात अनुस्यूत असतातच. फक्त प्रासंगिक परिमाणांनी निर्धारित केलेले यशस्वितेचे निकष गुंता वाढवतात एवढेच. हे काही असले, तरी एक खरं आहे की, साहित्यात मनाची भावांदोलने स्पंदित होतात. आसपास घडणाऱ्या घटितांचे ओरखडे संवेदनशील मनावर उमटतात, त्यांना दिलेला अनुकूल-प्रतिकूल प्रतिसाद असतो तो. कुणीतरी तथ्य अनुभवल्याशिवाय शब्द कसे आशयघन होतील? अंतरी अधिवास करणाऱ्या संवेदना भावनांचे हात धरून चालत राहतात अन् शब्दांना मोहरलेपण गवसतं. भावनांच्या प्रतलावरून वाहणारी ‘चंदना सोमाणींची’ कविता तरल संवेदनांना अधोरेखित करत मनात विसावते. ‘चंदनाची फुले’ मधील कविता केवळ कविता न राहता भावोत्कट मनाचा सोज्वळ स्वर होते.
फुलांना अंगभूत सौंदर्य असतं. भावनांच्या झोक्यावर झुलणाऱ्यांना त्यांच्या रंगगंधाची परिभाषा शिकवावी नाही लागत. सौंदर्याची एकच एक परिभाषा नाही करता येत. ती शब्दांच्या मर्यादेत नाही कोंडता येत, तर अनुभवावी लागते. बागेतल्या फुलांना सौंदर्याच्या मोजपट्ट्या वापरून निकषात रुजवता आलं, म्हणून त्यांचं असणं वेगळं आणि माळावर उमलललेल्या फुलाच्या सौंदर्याच्या व्याख्या वेगळ्या नसतात. अंगभूत सुंदरतेचे अर्थ बदलत नसतात. सौंदर्याचे अर्थ स्वयंभू असतात, ते पाहणाऱ्याच्या नजरेवर अवलंबून नसतात. कवयित्री चंदना सोमाणींचा हा गझलकवितासंग्रह अंगभूत सौंदर्याचे साज लेवून आला आहे. तरल, तलम भावनांचा परिमल सोबत घेऊन आलेला हा संग्रह मनाचं आसमंत गंधित करीत राहतो.
कविता अंतरी दाटलेला कल्लोळ असते. भावनांना मुखरित करण्याचे माध्यम असते. एक ओढ असते. भावोत्कट मनाचा उद्गार असते, तर गझल एक असोशी असते. आतून काहीतरी धडका द्यायला लागले की, अंतर्यामी वसतीला असलेली भावस्पंदने साद घालू लागतात. त्यांचे आवाज मनाच्या आसमंतात फेर धरतात. भावनांना ओलावा लाभतो. शब्दांना पंख. आशयाची पाखरे भरून आलेल्या आभाळात विहार करायला लागतात. भावनांचे संपृक्त ढग झरू लागतात. या ओघळण्याला कोणी भावांदोलने, कोणी मनोगते म्हणतात, तर कोणी अंतरीचे गुज. कोणी आणखी काही. काही म्हटले म्हणून भावनांचे अर्थ बदलत नसतात. कविता आणि गझल प्रकारची व्याख्या काही असू द्या. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांची सोबत करीत निघालेल्या भावनांना परिभाषेच्या कुंपणात सहसा बंदिस्त नाही करता येत. शब्दांचा साज लेवून आलेल्या रचनांना कोणी काही म्हटले, तरी त्यानी फरक काय पडतो? भरलेलं आभाळ रीतं होणार असतं, ते शब्दांच्या सहवासात रमतं अन् मोकळं होतं इतकंच.
अरबी-फारशीच्या वाटेने चालत निघालेली गझल उर्दू, हिंदी भाषांना वळसे घालून अन्य भाषांमध्ये येऊन स्थिरावली. तिच्यात एक नजाकत आहे. अंगभूत सौंदर्य सामावलेले आहे. म्हणूनच की काय, ती साहित्याच्या परगण्यात कुतूहलाचं वलय घेऊन नांदते आहे. रसिकांच्या मनावर अधिराज्य करते आहे. रचना कोणतीही असो, ती जितकी सहज, तितकी सामन्यांच्या सहवासात रमते. याला हा संग्रहही अपवाद नाही.
वृत्त, छंद, मात्रा, लगावली सांभाळत आशयगर्भ लेखन करायला कवीचा कस लागतो, हे खरेच. पण सुगम लिहिणेही अगदी विनासायास घडते असे नाही. गझलेच्या परगण्यात तंत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयत्नाने ते अवगत करता येते. सरावाने अचूक होत जाते, पण सगळ्यांनाच ते साध्य होते असे नाही. चंदना सोमाणींनी ते आत्मसात केलंय. निखळ कलाकृतीच्या निकषात रचनेचे हे तंत्र अनिवार्य असेलही. तिच्या शुद्धतेचे ते सन्मानपत्र असेल. गझलेचा आत्मा असेल किंवा मान्यतेची मोहर अंकित करण्याचा मार्ग असेल. पण बंधनांपेक्षा भावनांचे अनुबंध अधिक आत्मीय असतात, असे कोणाला वाटत असल्यास वावगं काही नाही.
साहित्याचा प्रकार कोणताही असो, ते आस्थेचे अनुबंध समजून घेत शब्दांकित होत असते. सामान्य माणूस आपलं असं काही त्यातून अपेक्षितो. केवळ कविता किंवा गझलच नाही, तर कोणत्याही कलाकृतीत आपलं असणं-नसणं वाचक शोधत असतो. ही शोधयात्रा अनवरत सुरु असते. शब्दांच्या फुललेल्या ताटव्यात आपलं असं काही शोधू पाहणाऱ्याच्या वाटेवर ‘चंदनाची फुले’ हाती लागतात. हवं असणारं त्यात गवसतं. व्यथा, वेदना, सल, जगण्यातले ताणेबाणे आणखी कायकाय. हे आपणच आपल्याला सापडणे असते म्हणा हवं तर.
वाचते मी मला कैक वेळा तरी
गूढ कादंबरी चंदनाची फुले (पृष्ठ. ९)
स्वतःला शोधून पाहिल्याशिवाय आसपास आकळत नाही. खरंतर इहतली अधिवास करणारा प्रत्येक जीव स्वतःच एक गूढ असतो. त्याच्या जगण्यात एकेक स्वतंत्र कथा, कविता, कादंबरी लपलेली असते. ती संवेदनशील विचारांनी वाचता यायला अन् वाचून वेचता यायला हवी. सजग नजर आणि सर्जक विचार केवळ शब्दांचे मळे नाही फुलवत, तर आयुष्याचे अन्वयार्थ शोधत असतात. कागदावर अंकित झालेले शब्द मनाची मनोगते होतात. या हृदयाचे त्या हृदयी जाणे असते ते. पण याचा अर्थ माणूस येथून तेथून सगळाच आकळतो असं नाही. हे सांगताना कवयित्री म्हणतात,
थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा
जीवन आहे अगम्य कोडे
कसा सोडवू प्रयास माझा (पृष्ठ. १५)
जगण्याशी भिडावे तेवढे गुंते उलगडत जातात आणि त्याहून अधिक वाकुल्या दाखवत राहतात. प्रवासाचे रस्ते योजनापूर्वक निर्धारित करता आले, तरी वाटा काही कोणाच्या आज्ञेने चालत नसतात. चालणे घडावे म्हणून कोणी वाटा कोरून नाही ठेवत. कशाच्या तरी शोधात चालणं जिवांचं भागधेय असतं. अंतरी अधिवास करून असलेली क्षितिजे आपल्या पावलांनी नाही चालून येत. त्यांच्याकडे पावले वळती करायला लागतात. त्यासाठी अनभिज्ञ दिशांशी सख्य साधायला लागते. ओंजळभर कर्तृत्वाला आभाळ समजणे प्रमाद असतो. आपणच आपल्याला ओळखताना सुटलेला हातचा असतो तो. थकेपर्यंत प्रयत्न करणाऱ्याखेरीज देवही कुणाला मदत करीत नाही असे म्हणतात. प्रारब्धवाद माणसांच्या मर्यादा अधोरेखित करीत असेल, तर प्रयत्नवाद त्याच्या विजिगीषू वृत्तीचा परिपाक असतो, हेही वास्तवच.
कवयित्रीची जीवनाविषयी तक्रार नाही. परिस्थितीची जाण आणि जगण्याच्या प्रयोजनांचे भान यात अंतराय आले की, जगण्याचे गुंते अधिक जटिल होत जातात. आयुष्याचं सजग भान घेऊन घडणारा प्रवास जगण्याला नवे अन्वयार्थ देत असतो. जगणं समजून घेताना पुढ्यात मांडलेल्या प्रयोजनांची संगती लावावी लागते. हे समजून घेणं आपणच आपल्याला नव्याने उमजून घेणं असतं. त्या लिहितात,
सोसवेना भार आहे जिंदगी
टांगती तलवार आहे जिंदगी
सोबतीला चांदणे आहे तरी
पेटता अंगार आहे जिंदगी
कोंडमारा होत आहे हा किती
वादळी अंधार आहे जिंदगी (पृष्ठ. २०)
ऊन-सावलीचा खेळ आयुष्यात अनवरत सुरु असतो. जीवनात सुखापेक्षा दुःखाचेच अधिक्य आहे. सुखांना शोधणारी माणसे दुःखाला कुरवाळत बसतात. नियतीने ओटीत घातलेल्या क्षणांचे सोहळे संपन्न करण्याऐवजी; पदरी पडलेल्या पळांना पर्याप्त न मानता इतरांच्या सुखाची परिमाणे लावून मोजतात अन् हाती लागलेला क्षणही दवडतात . आयुष्यात विसावलेल्या आनंदाची अभिधाने कधी सुखाच्या बरसणाऱ्या धारा असतात. कधी परिस्थितीने पोळलेले वणवे, तर कधी अभावाचे शुष्क उन्हाळे. पण याचा अर्थ असाही नाही की, बहरलेले ऋतू अंगणी येत नाहीत. जीवनाचे सोहळे करता येतात, फक्त तो एक निखळ आनंदाचा क्षण वेचता यायला हवा.
त्याच्या किंवा तिच्या मनी विलसणाऱ्या आकांक्षांची क्षेत्रे कितीही विस्तारली, तरी तो तिच्याशिवाय आणि ती त्याच्याशिवाय पूर्णत्वाच्या बिंदूवर पोहचू शकत नाही. प्रगतीच्या पर्याप्त परिभाषा आयुष्याच्या पटावर अंकित केल्या, तरी एक हळवा कोपरा अंतर्यामी अधिवास करून रहातोच ना! तो एकटा किंवा ती एकटी असणे पूर्णत्व नाही. त्याच्याशिवाय तिच्या आयुष्यात अन् तिच्याशिवाय त्याच्या जगण्यात काहीतरी न्यून राहते. पूर्णत्वाची परिभाषा बहुदा पर्याप्त नसतेच. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात वसलेल्या प्रेमाला तो साद देत राहतो. कळीचं फूल व्हावं अन् डहाळीवर हसत राहावं तसं. अंतरी जागणारा हा भाव तेवढ्याच तरल शब्दात लेखांकित करताना कवयित्री म्हणते,
डोळ्यात आसवांचा हा कोणता पहारा
रोमांचितो ऋतू अन् अंगावरी शहारा
बरसून घे अरे तू प्रेमात आज माझ्या
चाहूल पावसाची की हा तुझा इशारा
भुलले अशी कशी मी त्या लाघवी स्मिताला
दूरस्थ तारकांचा मज वाटला सहारा (पृष्ठ. १७)
तिच्या असण्याचे अनेक अन्वयार्थ असतात, पण तिच्या नसण्यात अभावाचे अनेक आयाम असतात. तिच्या मनाचा ठाव घेणे अवघड. त्याहून तिच्या भावनांचा तळ गाठणे अधिक कठीण असते. तिच्या अंतरी नांदणाऱ्या विश्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. पण तिच्या आयुष्याचं वास्तव काही अद्याप बदललेलं नाही, हेही सत्यच. तिच्या परिघाभोवती असणाऱ्या अर्थाची वलये शोधण्याचा प्रयत्न चंदना सोमाणींची कविता करते. नात्यांच्या विणीचे धागे घेऊन स्त्रीमनाची स्पंदने या कवितांतून निनादत राहतात.
कसा आवरू मी व्यथेचा पसारा
उधळतो सुखाला इथे रोज वारा
जरी शोधले मी प्रितीच्या फुलांना
मनाला मिळेना कुठेही सहारा
किती साचले दुःख हृदयी नभाच्या
कशा आसवांच्या निथळतात धारा (पृष्ठ. १०)
नारीचे आयुष्य सीमांकित करणाऱ्या गोष्टी जगात सगळीकडे सारख्याच. तिच्या आकांक्षांच्या गगनाला आस्थेचे सदन सहजी मिळेलच असे नाही. मनी विलसणाऱ्या स्वप्नांच्या इंद्रधनुष्याला रंग हिचे असले, तरी शोभा मात्र दुसऱ्याच्या प्रांगणी. व्यवस्थेने बांधलेल्या भिंती अन् परिस्थितीने उभी केलेली कुंपणे तिचे आयुष्य वेढतात. वास्तवाच्या विखारी दाहकतेत तिच्या स्वप्नांचा कधीच धूर झालेला असतो. मागे उरतात फक्त मन विषण्ण करणारे भग्न अवशेष. मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात लपवलेल्या भावनांना आपलेपण घेऊन आलेला वारा कुठल्यातरी अवचित क्षणी साद घालतो अन् सुखाचा परिमल हाती लागेल म्हणता म्हणता नेमकी दिशा बदलतो. त्याने आणि तिनेही कळत-नकळत जतन केलेले अहं स्वप्नांच्या चौकटींना बाधित करतात. हाती आलं आलं म्हणताना सुख पाऱ्यासारखं निसटून जातं. हे सांगताना कवयित्री म्हणते,
काळालाही प्रश्न पडावा, असेच काही उत्तर होते
गतकाळाच्या कुपीत सारे, दडलेले ते अत्तर होते
चौकट होती अभिमानाची, पार करू ना शकलो आपण
असे कितीसे दोघांमधले, क्षितिजाइतके अंतर होते
नश्वर इथला देह त्यागणे, अवघड होते असे कितीसे
आत्म्यावर जर विजय मिळवला, मनात काम जरतर होते (पृष्ठ. ३२)
विचारांत विसावलेले अनेक किंतु जगण्यातल्या सहजपणाचे विसर्जन करतात. पण तोच एक पळ असतो, जो वेचता आला की, आयुष्याला इंद्रधनूचे रंग लाभतात. पण परिस्थिती अशा काही वळणावर नेऊन उभी करते की, ठरवून केलेल्या गोष्टीही अनपेक्षितपणे शेवट बदलतात. पेचच असे काही निर्माण होतात की, नको असलेला विकल्प आपला म्हणावा लागतो. ही सल आयुष्यात कायम राहून जाते, कवयित्री म्हणते,
वेळ दिला नाही तुला तेव्हा
पण ती सल आज जाणवतेय मला
थांबायचे तर होते,
पण जग आडवे आले मला (पृष्ठ. ३८)
तिच्या ‘ती’ असण्याच्या काही मर्यादा असतात. नव्हे त्या परिस्थितीने निर्माण केलेल्या असतात. तसे ‘त्याचेही’ काही परीघ असतात. ते व्यवस्थेने निर्धारित केलेले असतात. आकांक्षांच्या गगनात विहार तर दोघेही करतात, पण भरारी घेणाऱ्या पंखाना प्राप्त होणारा प्रेरणांचा पाठींबा वेगळा असतो. त्याच्या अन् तिच्या आयुष्याची प्रयोजने भिन्न बिंदूंवर उभी असतात. खरंतर प्रत्येकाला आयुष्याचे अर्थ शोधावे लागतात. जगण्याचे अन्वयार्थ आकळायला लागतात. त्याने तिला अन् तिने त्याला समजून घेण्याचा प्रवास अगणित प्रश्नचिन्हांच्या उत्तरांचा शोध असतो. शक्यतांचे तीर धरून वाहणारा प्रवाह असतो तो.
ओढ संपली की
सुरू होते ओढाताण
आणि शापित आयुष्याचं
आपोआप उघडतं एक पान...
पण का ही घुसमट?
अन् कशासाठी हा ताण
माझं अव्यक्त मन
आज अंधारल्या रात्रीसमान भयाण(पृष्ठ. ३९)
कवयित्री चंदना सोमाणींच्या कवितेतील शब्द वाचकांच्या मनात आपला ओंजळभर आशियाना उभा करतात. काव्यप्रतिभेचा मळा बहरून येण्याचाही ऋतू असतो. या बहरात कल्पनेला गंध लाभतो. तो आसमंत व्यापून उरतो. शब्दांना गगन गवसते, प्रतिमांना पालवी फुटते. मनाच्या मातीत पडलेली बीजे तरारून वर येतात. त्या म्हणतात,
मी शोधते स्वतः स्वतःलाच
फुलांवरील दवात उतरलेल्या
सप्तरंगी कवडशात,
इंद्रधनूत,
रांगोळीतून
कवितेच्या भावरंगी शब्दात...
आणि जीवनाच्या कॅनव्हासवर
तू उतरवलेल्या रंगात...(पृष्ठ. ६६)
या कविता अशाच उगवून आलेल्या आहेत. स्त्री मनाची भाषिते आहेत. तिच्या मनी विलसणाऱ्या कोमल भावनांचा गंध शब्द बनून दरवळत राहतो. अंगभूत सौंदर्याचे साज लेवून आलेल्या या गझल, कविता भावनांचं भरलेलं आभाळ होतात. जगण्या आणि वागण्यातील संगती-विसंगती ज्यांना कळल्या, त्यांना शब्दांची उसनवारी नाही करायला लागत. त्यात उमलत्या फुलाची स्वाभाविकता असते. संग्रहात लेखांकित अक्षरे आशयाची सोबत करीत भावनांचे पंख लेऊन विहार करीत राहतात. भावजागर करीत राहतात, म्हणूनच संवेदनांचे किनारे धरून वाहणारी ही कविता कवयित्रीच्या पुढच्या लेखन प्रवासाचे आश्वस्त सुतोवाच करते, असं म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
••
• चंदनाची फुले (गझल आणि कवितांचा संग्रह)
• कवयित्री: चंदना सोमाणी
• प्रथम आवृत्ती: डिसेंबर २०१८
• प्रकाशक: पृथ्वीराज प्रकाशन, पुणे
• पृष्ठे: ८० | मूल्य: ₹१५०
••
परीक्षण:
चंद्रकांत चव्हाण, जळगाव
संवाद: ९४२०७८९४५५
अतिशय सुंदर शब्दात केलेल्या परिक्षणासाठी Chandrakant Chavan सरांचे तसेच "चपराक" या दर्जेदार प्रकाशनाचे प्रकाशक Ghanshyam Patil सर या दोघांचेही मनापासून आभार...🙏