गझल - एकेक पाकळी
एकेक पाकळी गळणार शेवटी
मृत्यो तुझ्या खुणा दिसणार शेवटी
बांधून घेतली लेणी सुबक जरी
कोरीव दुःखही हसणार शेवटी
किंतू मनातला काढून टाकला
पण वाद हा जुना उरणार शेवटी
वेचू नकोस तू कण कण मनातले
अंदाजही तुझे चुकणार शेवटी
हा चेहरा नको अन् आरसा नको
प्रतिमाच आपली फसणार शेवटी
हेतू न चांगला तू हे म्हणू नको
तो मर्म त्यातला कळणार शेवटी
हा देह जाळला मी चंदनापरी
राखेतही फुले फुलणार शेवटी
चंदना सोमाणी ©®

तुझा जन्म फक्त गझलेसाठीच झाला, कारण गझलेतील मर्म तुला चांगलेच कळले आहे.
ReplyDeleteगझल सम्राज्ञी चंदना निश्चितच भट साहेबांनी तुलाच खो दिला आहे. 🫡🫡🫡
प्रत्येक शेर कोरीव आणि दाणेदार...❤️❤️❤️😘😘