Followers

Monday, 19 February 2024

मराठी गझल - आरसा आणि क्षणाक्षणाला

पाऱ्याजैसी तरल संवेदना जपणाऱ्या गझलकारा - चंदना सोमाणी 
गझल रसग्रहण - प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

आज आपण भेटूया प्रसिद्ध गझलकारा चंदना सोमाणी यांच्या गझलांना. चंदना सोमाणी या गेल्या अनेक वर्षांपासून गझल लेखन
करीत आहेत. त्यांनी विपुल कविता लेखनही केले आहे. विविध
दैनिकांच्या पुरवण्या, मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी ललित लेखनही केले आहे. 

सुखदुःखाच्या वळणावर हा ललित लेखसंग्रह, दरवळ रातराणी हा काव्यसंग्रह आणि चंदनाची फुले हा गझल – कवितासंग्रह प्रसिद्ध आहे.. शब्दगंध चंदनाचा हे पुस्तकही त्यांच्या नावावर आहे. 

सध्या त्या पुणे येथे स्थायिक आहेत. तशा त्या मूळच्या ही पुण्याच्या आहेत. सोमनाथ सोमाणी यांच्याशी त्या १४ जून १९९३ रोजी विवाहबद्ध झाल्या आहेत. 

त्यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले आहेत. सिद्धिविनायक मेडिकल फाउंडेशन व सिद्धिविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका समारंभात त्यांना प्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत वक्ते आणि संपादक कुमार सप्तर्षी आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे. पहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांच्या हस्ते साहित्य गौरव संमेलनात त्यांना विशेष गौरवान्वित करण्यात आले. आहे. अनेक मुशायऱ्यातून त्यांनी गझल पेश केल्या आहेत.

गझल म्हणाली मला चंदना
तुझ्यात आहे निवास माझा

गझलेवर निःस्सीम प्रेम करणाऱ्या चंदनाजींच्या अनेक गझल गायत्री गायकवाड या गायिकेने गायल्या आहेत. डॉ. आश्विन जावडेकर यांनीही त्यांच्या दोन गझलना चाली लावून त्या पेश केल्या आहेत. संकेत नागपूरकर यांनी चंदनाजींच्या अनेक रचना संगीतबद्ध करून मैफलीत तसेच नागपूर आकाशवाणीवरून देखील पेश केल्या आहेत.

अनेक फेसबुक पेजवरून त्यांचे लाइव्ह सादरीकरणही झाले आहे. अनेक मुशायऱ्यांतून त्यांच्या गझलना चांगली दाद मिळते. 

चंदनाजी एका गझलेत म्हणतात, 

नुसता नुसता होतो गुंता
सोडत बसतो जो तो गुंता

आयुष्याचे होता जाळे
वाढत जातो तो तो गुंता

नात्यांमध्ये केला कोणी
गुंता गुंता हो... तो गुंता 

हा जो आयुष्याचा गुंता आहे तो सोडवत बसणे तसे प्रत्येकाला भाग असते. अनेकदा आपणच या गुंत्यात गुंतत राहतो. तरीदेखील सुरेश भटसाहेब म्हणतात तसे, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा.... 

सगळ्या गुंत्यात गुंतलो तरीदेखील या गुंत्यांतून मोकळे होऊन आपला पाय सोडवून घेतला पाहिजे 

आयुष्य म्हणजे तरी काय असतं. एक प्रकारचा गुंताच की... मग नुसता नुसता होतो गुंता म्हणायची पाळी येते. आता आयुष्यात असा गुंता आलाच तर तो सोडविण्यासाठी आपल्यालाच धडपड करावी लागते. तो गुंता सोडवत बसावेच लागते प्रत्येकाला. अनेकदा नात्यांमध्ये देखील गुंता निर्माण होतो. या गुंत्यामुळे नाते कमकुवत होऊ शकते. अनेक जोडप्यांची नाती अशा गुंत्यांमुळे तुटून गेलेली असली तरी चंदनाताई म्हणतात, हा गुंता सोडविणे आवश्यक आणि भागही असते. तरच जीवन सुखी होईल. 

त्यांची एक गझल विलक्षण आहे. त्या म्हणतात, 

का असा पारा उडाला स्वैर झाला आरसा
गैर मी नाही तरीही गैर झाला आरसा

आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब असणारी ही गझल. प्रत्येकाकडे असलेल्या आरशाच्या पाठीमागे पारा असतो. केवळ काचेतून प्रतिबिंब दिसणार नाही. परंतु अनेकदा हा पारा उडून जातो आणि आरसादेखील स्वैर वागू लागतो. पारा उडालेल्या आरशात आपले प्रतिबिंब पाहू नये असे म्हणतात. कारण पारा उडालेल्या आरशात आपणही भग्न भग्न झालेले दिसतो. आपण नसून पारा उडालेल्या आरशातील तो किंवा ती दुसरेच कोणी असावे, असा भास होतो. आपलेपणा आणि परकेपणा हे दोन्ही आपल्या आयुष्याला घट्ट धरून असलेले घटक आहेत. मग या आरशाला एखाद्याचा चेहरा वैरी वाटतो. परंतु जेव्हा द्वेषाची भावना मिटते त्यावेळी मात्र एखाद्या निर्वैर ऋषीसारखा चेहराही निर्वैर होतो. आपण त्या आरशांत एखाद्या शांत वेळी आणि आपले मन स्थिर असताना डोकावून पाहिले असता त्या आरशातून आपण अंतरातील वेदनांची सफर करून येतो. (इथे त्यांनी सैर हा हिंदी- उर्दू शब्द वापरला आहे. त्यामुळे त्या शेराची नजाकत आणखी वाढली आहे. 

का असा पारा उडाला स्वैर झाला आरसा
गैर मी नाही तरीही गैर झाला आरसा

आपलेपरकेपणाचा भाव जर होता खरा 
मग कुणाच्या चेहऱ्याचा... वैर झाला आरसा

आसवे होती खुळी ती, जी न झाली मोकळी 
झाकुनी डोळे स्वतःचे गैर झाला आरसा

छान झाले द्वेष मिटला मोकळा झाला ऋतू 
पाहुनी आता मला निर्वैर झाला आरसा

मीच माझ्या आत जेव्हा पाहिले डोकावुनी 
अंतरीच्या वेदनांची सैर झाला आरसा

चंदना सोमाणी ©®

अंधारावर मात शिवाजी ही गझल शिवचरित्र सांगतानाच जीवनाचे आगळे वेगळे दर्शनही घडवते. खरे तर इतिहास पुरुषांच्या विजयश्रीचे पोवाडे असतात. परंतु गझलेसारख्या नाजूक तरल आणि प्रणयरंगी रंगलेल्या काव्यप्रकारातही शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती सांगता येते हे चंदनाताईंनी दाखवून दिले आहे. 

त्यांच्या एका गझलेतील शेरातही अध्यात्माची झलक दिसते. 

राधा राधा म्हणता म्हणता शामच हरवत गेला
पावरीत मग कोण फुंकते कुठले विरह तराणे

राधा आणि श्याम काही वेगळे नसतात. परंतु राधेश्याम असे म्हटल्यावरच कृष्णाची ओळख पटते. तो राधेशी इतका एकरूप झाला आहे तर मग पावरीत (इथे पावा किंवा बासरीसाठी पावरी हा शब्द त्यांनी वापरला आहे.) पावा हा पुल्लिंगी शब्द तर पावरी (ती पावरी) स्त्रीलिंगी शब्द आहे. या शब्दांतूनदेखील चंदनाताईंनी बासरी आणि कान्हा, राधा आणि कृष्णांचे अद्वैत उलगडून दाखवले आहे. 

त्यांची वेडावतो मनाला ही गझल मनाला भुरळ घालणारी आहे. चंदनाताईंनी या गझलांचे फोटो दिल्याने विश्लेषणासाठी प्रत्येक शेर घेतला असला तरी एकत्र पूर्ण गझल देत नाही. त्या फोटोत तो तो शेर वाचणे गरजेचे आहे. 

वारा हे चंचलतेचे प्रतीक आहे. शिवाय वायू आहे म्हणून श्वास चालतो. देहामध्ये वारा वाहत असतो. तो कधी चैतन्याच्या सळसळीच्या रुपात तर कधी मनाला चंचलपणा देणारा हा वारा. आपले मनदेखील या वाऱ्याप्रमाणेच अस्थिर व चंचल आहे. क्षणाक्षणाला मनाचा प्रवास सुरू असतो. त्यांनी मनाला वाऱ्याची उपमा दिली आहे. 

एका शेरात त्या म्हणतात पावसाचा काही भरवसा नसतो. तो कधी रिमझिम, कधी वादळी आवर्तने घेत, तर काही वेळेला झोडपणाऱ्या गारांच्या रूपाने पडत असतो. प्रेम आणि पावसाची त्या तुलना करतात. पाऊस जसा बेभरवशाचा तसाच प्रियकर (क्वचित प्रेयसीदेखील) चंचल बनून आपल्याला गारांप्रमाणे झोडपून काढते. 

हा शेरदेखील महत्त्वाचा आहे. त्या म्हणतात. इथे पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी रोजी आपण स्वातंत्र्याचे गुणगान गात असतो. परंतु प्रसंगी सत्याग्रह, आंदोलने मोठ्या संख्येने होतात. अनेकदा ती स्वातंत्र्यासाठी मग ती मतं स्वातंत्र्य असो की विचारस्वातंत्र्य असो ते दडपण्यासाठी राजसत्ते तुला मोठ्या प्रमाणात कारागृहे (तुरुंग – कारा) का बांधावी लागतात असा सवाल त्या करतात. 

त्यांचे आरशावर प्रचंड प्रेम आहे. अनेक गझलांतून आणि शेरांतून हमखास आरसा प्रकटतो. वेडावतो मनाला या गझलेतही त्याचे प्रत्यंतर येते. 

का आरशास भासे चर्या अनोळखीशी
उडतो अताअताशा पारा क्षणाक्षणाला 

अक्षरांची द्विरुक्ती किंवा शब्दांची द्विरुक्ती त्यांच्या अनेक शेरात वाचावयास मिळते. याच गझलेत राजकारणी (चारा घोटाळा) डोकावतो.

वेडावतो मनाला वारा क्षणाक्षणाला 
नसतो मनास तेव्हा थारा क्षणाक्षणाला

प्रेमात पावसाचा असतो कुठे भरवसा 
पडतात त्यात काही गारा क्षणाक्षणाला

स्वातंत्र्यगान जर का ओठांवरी तुझ्या तर
का बांधतोस मग तू कारा क्षणाक्षणाला

का आरशास भासे चर्या अनोळखीशी 
उडतो अता अताशा पारा क्षणाक्षणाला

समजून घेतली मी आत्ताच लोकशाही 
खातात लोक तेही चारा क्षणाक्षणाला

जर भेटलाच आहे सहवास सागराचा 
होतोच मग किनारा खारा क्षणाक्षणाला

चंदना सोमाणी ©

_--------+++ 

आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या काही गझला व शेरांचे अवलोकन करून त्यांना मी ही भेट दिली आहे. आपण वाचकांनाही ती निश्चित आवडेल. वाचून अभिप्राय द्यालच. 

प्रकाश रामचंद्र क्षीरसागर (९०११०८२२९९) 
ताळगाव, गोवा.

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...