मनाच्या कोऱ्या पानावर...
रसग्रहण - आशा पांडे, नागपूर
जेव्हा पहिल्या जेष्ठ गझलकारा आपल्या गझल_कवितासंग्रह "चंदनाची फुले" यावर लिहितात तेव्हा आभार मानायला शब्द उरतातच कुठे... लेख वाचताना संपूर्ण पुस्तकातील पानं डोळ्यासमोर फेर धरून नाचू लागली... आशाताई तुमचा अभिप्राय लेखणीस अजून बळ देईल हे निश्चित....🙏🙏
माणसाचे हे जग बहुरूपी, बहुरंगी आहे तसेच कवितेचे ही जग बहुरूपी, बहुरंगी आहे. सृष्टीच्या प्रत्येक कणाशी कवितेचे नाते असते. जीवनाच्या प्रत्येक क्षणाशी कविता जोडलेली असते. संवेदनशील मनांना ती जाणवते. त्यांच्या सोबत असते. त्यांना साथ देते.
माणसाला कवेत घेण्याचे सामर्थ्य कवितेत आहे व दुखऱ्या मनावर फुंकर घालण्याचा हळुवारपणाही कवितेत आहे. सृष्टीची विविधता जपण्याचे कौशल्य कवितेत आहे. या दुनियेतल्या प्रत्येक फुलांचे रूप वेगळे, रंग वेगळा, गंधही वेगळा, रुपाची मोहिनी वेगळी, रंगाची जादू वेगळी आणि गंधाचा अलवार स्पर्श वेगळा. तसेच प्रत्येक कवीची कविता वेगळी, अगदी एकाच कवीचीही प्रत्येक कविता वेगळी हे सत्य प्रकर्षाने जाणवते चंदना सोमाणी या पुण्याच्या कवियित्रीच्या "चंदनाची फुले" या कवितासंग्रहात.
काही कविता चांदण्यात जन्माला आल्या आहेत. चंदेरी झाल्या आहेत. त्या चंद्रप्रकाशातही फुलांवर दव थेंबाचे मोती चमकतात. कल्पना आणि वास्तवाचे झिलमिल नाते उलगडते. मनाच्या कोऱ्या पानावर चांदणे कोरत जाणारी ही कविता निखळणाऱ्या तारकांना दृष्टीआड करू शकत नाही. कविता कल्पनेला वास्तवात आणण्याचे भावसामर्थ्य देते. आत्मविश्वास देते तसेच ती कटू- कठोर वास्तवाला कल्पनेसारखा तरल आणि तलम बनवण्याचे मार्दव, ऋजूता आणि सौंदर्याचा ध्यास देते. सत्याच्या शिवात्म रूपाचा सुंदर अविष्कार म्हणजे कविता. प्रत्येक जीवन दर्पणात कवितेचे प्रतिबिंब असावेत ते असे. कविता मनोवृत्तीचे उन्नयन करते. उंच भरारी घेणाऱ्या पाखरांच्या पंखांना बळ देण्याचे कामही कविता करते आणि पाखराला घरटा पर्यंत सुरक्षित आणण्याचे कर्तव्यही कविता करते.
पावले पुढे-मागे होतात. फेरबदल होतात. अखेरीस गंतव्याप्रत नेते ती कविता. ही कविता अशीच आहे. मोहाच्या क्षणात भुलता मनी कातर -कातर होते. ते कातर मन क्षणात सावरते. जाणीव होते. सोपे सोपे म्हणता-म्हणता मागचे सारे खडतर होते. या खडतर मार्गावर आणखी दोन पावले सोबत असावी, असे वाटते. कुठून तरी साथ यावी किंवा आपल्या हाकेला प्रतिसाद यावा, या झुलत्या क्षणांना घेऊनच येते नशीब, ज्यामुळे साद-प्रतिसाद केवळ एक आभास ठरतो. कितीही यत्न केले तरी झिजण्याशिवाय चंदनाला गंध नाही हे अकाट्य सत्य समोर उभे ठाकते.
वास्तवाच्या कठोर भूमीवर कारुण्य भावाने देह झिजल्या शिवाय कीर्तीगंध सुखाचा सुगंध लाभत नाही. जीवनाचा हा अर्थ शिकवणारी ही कविता शाश्वताशी नाते जोडते. आत्मभान जागे करणारी कविताच असते. आत्माभिमानही कविताच जागवते. मानवी मनातल्या सगळ्या सुप्रवृत्तींना जाग आणण्याचे काम कविताच करते. चंदना सोमाणी ची कविताच सांगते सुखाची सोपी संकल्पना. "माणूस माणसाचा" या कवितेतून व कविताच खंतावतेदेखील, जेव्हा ही सोपी संकल्पना कुणाला कळत नाही 'दुःखाचे कारण उमजते' या कवितेतून आपल्याच मनाच्या चक्रव्यूहात आपण अडकलेले असतो तेव्हा चक्रव्यूह कसा भेदायचा हे ती सांगते, कारण ती निर्मितीचा धर्म पाळते.
कविता भावाभिव्यक्ती असली तरी रांगोळी प्रमाणे रेषेत राहणारी असते. बिंदू- बिंदू जोडणारी असते. सगळ्या रंगाची संगती साधून एक नयनमनोहर रंग तयार करते ती कविता. कविता माणसाला माणुसकीचे दान देते. महान बनवते ती कविता. कोमेजणारी फुले अंधाराच्या पदरात लपवून उमललेल्या फुलांनी झाडांना नटवते ती कविता. कविता जीवनाची शक्ती असते. कोसळणाऱ्या जलधारांना ज्या ताकतीने धरणीमाय सोसून घेते त्याच ताकतीने कविता कोसळणार्या मनाला झेलून घेते. संवाद साधते. ती मनाला जगाच्या नजरे पलीकडे असलेले अभंग आकाश शोधण्याची प्रेरणा देते. कविता सदा चैतन्यमय ठेवणारी चेतना आहे. शब्दार्थाच्या पलीकडे ती आत्म्याचा अनात्म विलास आहे. त्याग आणि समर्पणाच्या पावलांनी चालणारी, कर्तव्य निष्ठा आणि विश्वास श्वासात जपणारी, भूतकाळाला वर्तमानाचा हात देऊन भविष्याकडे नेणारी, मानवी मनाला दैवी वरदानात लाभलेली ही कविता विद्रूपतेच्या प्रांतात शिरू नये. बीभत्स, विदारक होऊ नये. नैराश्याची दुसर छाया या चारुगात्रीवर पडू नये. जगाच्या इतिहासात अनेक युगांतरकारी, क्रांती घडवणारी कविताच आहे. तिची हीच शक्ती कवींनी जतन करावी. तिला चिदानंदमयी बनवावी.
आशा पांडे, नागपूर
लेखिका ज्येष्ठ पंचवाषिक कवयित्री, गझलकार व साहित्य बिहार अध्यक्ष आहेत.



No comments:
Post a Comment