गझल - किती कोंडमारा
मुक्या भावनांचा किती कोंडमारा
कळ्यांचा फुलांचा किती कोंडमारा
कधी उंबरा जो न ओलांडला त्या
लुळ्या पावलांचा किती कोंडमारा
जुन्या त्या दिशा शोधताना नव्याने
निनावी दिशांचा किती कोंडमारा
जिथे फास घेतोस कृषका, अरे त्या
तरूंच्या मनांचा किती कोंडमारा
कितीदा बघावे नको त्या रुपांना
खऱ्या दर्पणांचा किती कोंडमारा
घरंदाज आहे बहाणा व्यथेचा
द्विधा आसवांचा किती कोंडमारा
गजांआड झाल्या जरी नेणिवा ह्या
खुल्या जाणिवांचा किती कोंडमारा
चंदना सोमाणी ©®

व्वाहहह.... आशयगर्भ..... प्रत्येक शेर मनाला स्पर्शून जातो.........!
ReplyDeleteकमेंट करतांना माझ्या जीवाचा कोंडमारा होतो आहे........!
तू अशक्य आहेस.............!🙏❤️