गझल - शब्दमैफील
तुझी आठवण गंध माळून यावी
जशी रातराणी फुलारून यावी
अशी दूर व्हावी निराशा मनाची
जशी ज्योत अंधार भेदून यावी
फुलावे असे क्षण तुझ्या सोबतीने
जशी चांदणी रात उजळून यावी
रुजावे असे गीत ओठी तुझ्या की
जशी शब्द मैफील रंगून यावी
अशी चंदनाने लिहावी गझल की
जशी स्वप्न कक्षेस लांघून यावी
चंदना सोमाणी ©®

No comments:
Post a Comment