Followers

Saturday, 27 December 2025

मराठी गझल - म्हणतात लोक येथे

 गझल - म्हणतात लोक येथे 

नुसताच जर दिखावा करतात लोक येथे
मग आरशास कैसे भुलतात लोक येथे

वरवर खुशालचेंडू धरतात लोक येथे
शब्दास जागणारे मरतात लोक येथे

ही स्मारके कुणाची अन् बांधली कुणी ही
जातात "अन् तरीही" उरतात लोक येथे

मी ऐकणार नाही आता पुन्हा मनाचे
म्हणतात अन् पुन्हा मग फसतात लोक येथे

कळलाच ना जराही संदर्भ सावलीचा
होताच सांज मग का झुरतात लोक येथे

खूपतो भलेपणाही डोळ्यांमध्ये स्वतःच्या
कण होत कंकराचा सलतात लोक येथे

अस्तास जात नाही जर सूर्यही कधीचा
असुनी उजेड त्याचा विझतात लोक येथे

इतराहुनी निराळी लिहिली कधी कशी ही
ही गझल चंदनाची म्हणतात लोक येथे

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 5 November 2025

मराठी गझल - मनबिंब पाहते मी

गझल- मनबिंब पाहते मी 

पाण्यात या नभाचे प्रतिबिंब पाहते मी
सूर्यास त्या क्षणाला मग चिंब पाहते मी

हे रूप गोजिरीचे ते रूप साजिरीचे
ऐन्यात हासणारे डाळिंब पाहते मी

हा डाग विस्तवाचा की दाह वास्तवाचा
जो ठेवला मनी तो कडुलिंब पाहते मी

रेखाटली जरीही मी वर्तुळे कितीही
एका क्षणात का मग हे टिंब पाहते मी

आहे जरी दुरावा दोघांमधे तरीही
माझ्या तुझ्या मनाचे मनबिंब पाहते मी

चंदना सोमाणी ©

Thursday, 23 October 2025

मराठी गझल - सुचेल का कधी मला

 गझल - सुचेल का कधी मला 

सुचेल का कधी मला तुझ्यावरी लिहायला 
जमेल का कधी मला फुलापरी फुलायला 

मनात ठेवले जपून बीज अंकुरायला
कुणी न पेरले मला कुठेतरी रुजायला 

उन्हातही जपेल रोज गारवा मनातला 
फुलेल ग्रीष्म हा खरा खरोखरी जपायला 

अजून आवडेल तोच गोडवा तुझ्यातला 
पुन्हा पुन्हा सरी वरी पुन्हा सरी भिजायला 

जरी न भेटली कुठेच सावली सभोवती 
मिळेल का मनापरी अतातरी जगायला 

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 15 October 2025

मराठी गझल - वेडावतो मनाला

गझल - वेडावतो मनाला 

वेडावतो मनाला 
वारा क्षणाक्षणाला 

अडवू अशी कशी मी 
अर्ध्यात पावसाला

देऊ कशी उगा त्या 
मी दाद संयमाला 

कोणी दिला मघाशी 
तो घाव त्या व्रणाला 

ती साद ओळखीची 
केव्हा कळेल याला

चकवा दिला मला तू
की हूल वादळाला

भेटेन का कधी जर 
मी शोधते स्वतःला

चंदना सोमाणी ©®

Monday, 29 September 2025

मराठी गझल - कुणास ठावुक

गझल - कुणास ठावुक 

काय कसे अन् कुणास ठावुक
माझे माझ्या मनास ठावुक 

आभाळाला दुःख कशाचे 
कोसळणाऱ्या ढगास ठावुक

वरवरचे ते रूप साजिरे 
खरे काय ते क्षणास ठावुक

अल्प आयुचे दुःख किती ते
पर्ण फुलांच्या दलास ठावुक 

दंश जाहला सर्वांगाला 
दाहकता त्या फुलास ठावुक

फक्त दिखावा नम्रपणाचा
किती मीपणा स्वतःस ठावुक 

सावलीसही किती मोल, जे 
उन्हाळलेल्या जिवास ठावुक 

म्हणतो आपण स्वर्गच गाठू 
खरे की खोटे सुतास ठावुक 

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 10 September 2025

मराठी गझल - करू नये ते...

गझल - करू नये ते...

करू नये ते करते आहे 
आकाशाला धरते आहे 

निळा रंगही उडून गेला
पावित्र्याला वरते आहे 

उदास झाल्या सांजसावल्या 
त्यांना सोबत करते आहे 

सावळबाधा नभास झाली 
काजळ ओले झरते आहे 

सोबतीस हे अगणित तारे 
कुणास एका स्मरते आहे 

दिखाव्यासही भुलता भुलता 
व्यर्थ वेदना मरते आहे 

कुस पालटून काळोखाची 
काळरात्रही सरते आहे 

दिशा शोधते उत्तर कोठे?
प्रश्न होउनी उरते आहे 

तडजोडी ह्या उगाच नव्हत्या 
अखेर जगणे हरते आहे 

चंदना सोमाणी ©®

Sunday, 17 August 2025

मराठी गझल - तुझी आठवण

गझल - तुझी आठवण 

उदास होता सोबत करते तुझी आठवण 
रंग ऋतूंचा लेवुन सजते तुझी आठवण

क्षणाक्षणाला फुलते जीवन असे वाटता
त्याच क्षणांवर उदार असते तुझी आठवण 

मनास माझ्या ठेच लागुनी मी कोसळता 
सावरणारी आई बनते तुझी आठवण 

रंगबिरंगी फुलांप्रमाणे मी दरवळता 
सुमनपाखरू बनून परते तुझी आठवण 

लक्ष्मणरेषा जरी आखली स्वतःभोवती 
हळव्या क्षणास तरी लांघते तुझी आठवण

श्रावणातल्या सरीत भिजता वसुंधरा ती 
हिरवा शेला मग पांघरते तुझी आठवण 

तुझी करवती किनार सलते जरी केतकी
तरी हवीशी मला वाटते तुझी आठवण 

चंदना सोमाणी ©®

Monday, 11 August 2025

मराठी गझल - चांदणे उतरून आले

गझल - चांदणे उतरून आले 

चांदणे उतरून आले आज माझ्या अंगणी 
भरजरी उजळून आली या धरेची पैठणी

हासणारी पाहिली की अंबरी ताराफुले 
वाटते केली कुणी ही साखरेची पेरणी 

चंद्र कृष्णासारखा अन् भोवताली गौळणी 
रासलीला खेळणाऱ्या चांदण्या साऱ्याजणी 

भोवती गंधाळती जाई जुई अन् मोगरी 
गंध नाही पण तरी तोऱ्यात बहरे टणटणी 

जीवघेणा मी तमाशा सोसला या जीवनी 
पण तरी झंकारते रक्तात माझ्या लावणी 

चंदना सोमाणी ©®

Friday, 1 August 2025

मराठी गझल - गुंता

गझल - गुंता

नुसता नुसता होतो गुंता 
सोडत बसतो जो तो गुंता 

आयुष्याचे होता जाळे 
वाढत जातो तो तो गुंता 

नात्यांमध्ये केला कोणी 
गुंता गुंता हो... तो गुंता 

चंदना सोमाणी ©®

Friday, 25 July 2025

मराठी गझल - नव्याने...

गझल - नव्याने  

हारलेला डाव चल मांडू नव्याने
सोड ते भांडण जुने भांडू नव्याने

जीवनाचे रंग कोऱ्या कागदावर
आज शब्दांनी पुन्हा सांडू नव्याने

गेम दे सोडून सारे नेटवरचे
खेळ खेळू चल विटीदांडू नव्याने 

कोण म्हणते सांग ना आहे नवी ती
तीच आहे वेस ओलांडू नव्याने

गाठताही येत नाही तळ मनाचा
भोवरा होऊन भोवांडू नव्याने

उखळ आहे पण तरी मग का दिसेना
दुःख माझे मी कसे कांडू नव्याने 

चांदणे पेटून उठले जर कधी तर
प्रेम देऊ त्यास, ओसांडू नव्याने

चंदना सोमाणी ©®

Thursday, 24 July 2025

मराठी गझल - पाऊस दे मला तू...

गझल - पाऊस दे मला तू

मागेच हरवलेला पाऊस दे मला तू
अर्ध्यात थांबलेला पाऊस दे मला तू

ओथंबुनी जराही, जो बरसलाच नाही
थेंबात माळलेला पाऊस दे मला तू

डोळ्यातल्या पखाली डोळ्यात कैद झाल्या
विरहात जागलेला पाऊस दे मला तू 

तेव्हा तिथे तसा तू सोडून जो दिला तो
वाटेत गाठलेला पाऊस दे मला तू

हर एक शायराने, शब्दात मांडलेला
गझलेत गुंफलेला पाऊस दे मला तू

चंदना सोमाणी ©®

Tuesday, 22 July 2025

मराठी गझल - आरसा

 गझल - आरसा

का असा पारा उडाला स्वैर झाला आरसा
गैर मी नाही तरीही गैर झाला आरसा

आपलेपरकेपणाचा भाव जर होता खरा 
मग कुणाच्या चेहऱ्याचा... वैर झाला आरसा

आसवे होती खुळी ती, जी न झाली मोकळी 
झाकुनी डोळे स्वतःचे गैर झाला आरसा

छान झाले द्वेष मिटला मोकळा झाला ऋतू 
पाहुनी आता मला निर्वैर झाला आरसा

मीच माझ्या आत जेव्हा पाहिले डोकावुनी 
अंतरीच्या वेदनांची सैर झाला आरसा

चंदना सोमाणी ©®

Monday, 21 July 2025

चारोळी - 22


 जितकी अवसेची काळी रात्र
तितकाच पुनवेचा उजेड लख्ख 
अंधारात वाट दिसावी म्हणून 
देवानं चांदोबाच टांगला चक्क

चंदना सोमाणी ©®


Sunday, 20 July 2025

चंदनाची फुले - रसग्रहण - 18

शब्दांच्या बागेत उमललेली चंदनाची फुले 

रसग्रहण - कांता सोनवणे - कनकुटे 

#शब्दांच्या_बागेत_उमललेली_चंदनाची_फुले_

रखरखत्या उन्हात चालून दमल्यावर, समोर एक डेरेदार झाड दिसावं आणि त्या झाडाच्या थंडगार छायेत काही वेळ निवांत बसावं यापेक्षा सुख दुसरं ते काय....?वाऱ्याची मंद झुळूक आपल्या लाही लाही झालेल्या देहाला स्पर्शून जावी आणि तनाला अन मनाला थंडावा मिळावा, याला स्वर्गसुख म्हणलं तर वावगं ठरू नये.....नाही का...? अगदी तशीच अनुभूती मला #चंदनाची_फुले हा कवितासंग्रह वाचल्यानंतर आली.
चंदनाचा गुणधर्मच मुळात शीतल,कोमल! त्याचा घरभर दरवळणारा मंद सुवास जसा मन प्रसन्न करतो अगदी तसेच गुणधर्म घेऊन चंदनाची फुले हा कवितासंग्रह फुलारून आलेला आहे.खरं तर #फुलारून हा शब्द त्याच कवितासंग्रहातील आहे, जो की मला फार आवडला.सामान्यतः फुलून येणे, फुलोरा ही शब्द ऐकण्यात किंवा वाचनात येतात,पण फुलारून येणे या शब्दाने मला मोहिनी घातली.या आणि अशा वेगळ्या, नवीन शब्दांची उत्पत्ती केवळ उच्चकोटीची प्रतिभाच करू शकते.त्यातला असाच एक शब्द तो म्हणजे #गुलमोहरेल! गुलमोहर खरं तर एक झाड पण ग्रीष्माच्या तीव्र झळा सोसून तो मोहरतो. गुलमोहर हा नाम असलेला शब्द आहे पण आपल्या एका शेरात त्या गुलमोहरचा  गुलमोहरेल हा क्रियावाचक शब्द चपखलपणे बसविणे म्हणजे कमालच! खरंच किती खोल अर्थ दडलेला आहे त्या गुलमोहरेल या शब्दांत!
नाविन्य, कल्पकता, निसर्गाशी एकरूपता, जीवनाचा अर्थ सांगणारा....अशा अनेक गुणधर्माने नटलेला #कवयित्री चंदना सोमाणी यांचा #चंदनाची फुले हा कवितासंग्रह म्हणजे केवळ अप्रतिम आणि अप्रतिमच!!
गझला आणि मुक्तछंद काव्य यांचा सुरेख संगम या कवितासंग्रहात साधलेला आहे.

कवयित्री त्यांच्या पहिल्याच गझलेत म्हणतात, 

वाचते मी मला कैकवेळा तरी
गूढ कादंबरी चंदनाची फुले!

या शेरात म्हटल्याप्रमाणे, खरंच स्त्रीचं मन असंच असतं का...? अनेक गूढ रहस्याने भरलेलं...वरवर दिसणाऱ्या प्रसन्न चेहऱ्यामागे कितीतरी दुःख, यातना,वेदना, विवंचना तिच्या हृदयात रुतलेल्या असतात...हेच तर कवयित्रीला सुचवायचं नसेल ना...?

पुढील शेरात कवयित्री म्हणतात, 


किती साचले दुःख ह्रदयी नभाच्या
कशा आसवांच्या निथळतात धारा


खरंच का...नभाला ही मन असेल का...?त्यालाही दुःख होत असेल का...?जसं आपल्याला दुःख झाल्यावर टचकन डोळ्यातून पाणी येते....तसं आभाळाला दुःख झाल्यामुळे ते भरून येतं का...? या आणि अशा अनेक नाजूक प्रश्नांना कवयित्रीने सुंदररित्या हाताळले आहे.
जेव्हा आपल्याला ठेच लागते,किंवा कुठे कापले,भाजले तर आपल्या तोंडातून "आई गं" हा नैसर्गिक उद्गार आपोआप बाहेर पडतो...अगदी तसेच कवितासंग्रहाच्या बाबतीत घडते.त्यातील गझलेचे प्रत्येक शेर वाचल्यानंतर "वाह" हा नैसर्गिक उद्गार आपसूकच बाहेर पडतो.हीच खरी मोठी ताकद या कवितासंग्रहाची आहे असे मला वाटते.


थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा

या शेरात जीवनाचे तत्वज्ञान किती साध्या आणि सोप्या भाषेत कवयित्री समजावून सांगतात.जीवन क्षणभंगुर आहे...कधी काय घडेल सांगता येत नाही तरी माणूस कोणत्या मग्रुरीत राहतो, कळत नाही...आले ते क्षण आनंदाने घालवावे, अवाजवी अपेक्षा करू नये असे साधे तत्व सुंदर पध्दतीने आणि कलात्मक रितीने समजावून सांगितले आहे.

हासणारी पाहिली की अंबरी ताराफुले
वाटते केली कुणी ही साखरेची पेरणी

या शेरात कवयित्रीने किती कल्पकतेने तारकांचे वर्णन केले आहे. आकाशातील हसणारे तारे पाहून त्याठिकाणी जणूकाही साखरेची पेरणी केली आहे की काय....असा प्रश्न कवयित्रीला पडलेला आहे.

हळव्या मनाची व्यथा, प्रेमिकेचे मनोगत, जीवनाचे सार सांगणारे तत्वज्ञान, सद्यस्थितीतील सत्यपरिस्थिती...अशा एक ना अनेक विषयांची जुळणी म्हणजे चंदनाची फुले!
शब्दांची बाग कवयित्रीला गवसली आहे, किंबहुना तिने ती निर्माण केली आहे.आणि त्यावरच सुंदर, डौलदार फुलांचा बहर आलेला आहे तीच ही कधीही न कोमेजणारी #चंदनाची फुले!!
कवयित्रीच्या शब्दांमध्ये एक आर्त भाव आहे. हळवी आर्जवे आहेत...
#आशादीप या कवितेच्या खालील ओळी वाचून आपल्या मनाचा तळ ढवळला नाही तर नवलच...!

एकीकडे तेजोमयी दिव्याच्या झगमगाटाने
व्यापलेले धरतीमय आकाश पहात
दुसरीकडे वळले
तर एक माई
एकच दिवा लावून दारी उभी होती
शून्य नजरेने स्वर्गीय आविष्कार पहात 
विचारले,
का माई, एकच दिवा का?
पोराबाळांच्या तोंडातील घास काढून
फोडणीसाठी वाचवलेल्या तेलातून
लावलेला दिवा...
वाट पाहतेय
पुराण काळापासून चालत आलेल्या
त्या लक्ष्मीची....
कष्ट करून हात झिजले
आता दिवा पाहून तरी
तिला माझ्या गरिबीची 
कीव येते का ते...?
वाट बघत
त्याच शून्य नजरेने....

किती भावगर्भित आशय आहे कवितेचा!
सर्जनशीलता, सृजनशीलता, सहवेदना या सर्वच भावना कवितेतून ओसंडत आहेत.

एका ठिकाणी कवयित्री म्हणतात,

असा अक्षरांचा लळा "चंदनाला"...

पण मला असे म्हणावेसे वाटते,

असा "चंदनाचा" लळा अक्षराला!!

शब्दांचं सामर्थ्य, अर्थाचं साम्राज्य, उच्चकोटीची प्रतिभा,प्रगल्भता, संवेदनशीलता असे गुणवैशिष्ट्ये असलेला परिपूर्ण असा कवितासंग्रह आपल्या संग्रही नक्कीच असावा.

#पुस्तकाचे_नाव - चंदनाची फुले ( कवितासंग्रह )
#कवयित्री  - सौ.चंदना सोमाणी
#प्रकाशन - पृथ्वीराज प्रकाशन,पुणे.
#किंमत - १५० रू.
#शब्दांकन - कांता सोनवणे कनकुटे 
                    औरंगाबाद.

Sunday, 13 July 2025

मायेची ऊब...

मायेची ऊब 

 आईच्या कुशीत 
मायेची ऊब दाटे
बुडवावी शाळा 
असे थंडीत वाटे

थकत नाही कसे 
घड्याळीचे काटे 
उठण्याची थंडीत 
भारी भीती वाटे

सूर्य किरण ही 
उशिरा पहा उठे
मग मलाच का बरे 
त्रास पहाटे पहाटे 

स्वेटर टोपी घालून 
मी विदूषक दिसे
पटापट घेई पापे 
आई पहा कसे

उबदार गोधडी 
अन् ऊनही कोवळे
मारता शाळेला बुट्टी 
वाटे संपू नये हिवाळे 

चंदना सोमाणी ©®



Friday, 11 July 2025

वेल्हाळ पाऊस...

वेल्हाळ पाऊस 

जशी चाहूल लागली 
तसा चातक हसला 
मला वेल्हाळ पाऊस 
त्याच्या डोळ्यात दिसला 

एका एका थेंबासाठी 
किती किती आतुरला 
बोरी बाभळीचा काटा 
खोल पायात रुतला

थेंबा थेंबात साठला
माझ्या पुढ्यात ठाकला 
डोळे आकाशाला आले 
आणि मेघ पाझरला 

पावसाने दिली साथ 
बळीराजा सुखावला 
शेत शिवारात साऱ्या 
पुन्हा पाचू उगवला 

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 9 July 2025

मराठी गझल - फारसे

गझल - फारसे

करतात घाव तेही दमदार फारसे 
समजू नको फुलांना अलवार फारसे

आले कसे कळेना भरघोस पीक हे 
नव्हते तसे बियाणे कसदार फारसे 

हा रंगमंच फिरतो ज्याच्या सभोवती 
कळले तरी न त्यांचे किरदार फारसे 

विसरू कसे स्वतःचे ते घाव चंदनी 
स्मरतात दाह त्यांचे अनिवार फारसे 

चलनात आज शिक्के खोटे जिथे तिथे 
शोधून सापडेना कलदार फारसे 

का टाकतोस फासे उलटेच जीवना 
कळलेच ना तुझे हे व्यवहार फारसे 

शमली न वंचितांची पुरती तहानही 
पाणी नसे तळ्याचे चवदार फारसे 

मृत्यू समीप येता तेव्हा कुठे कळे 
श्वासांवरी असे ना अधिकार फारसे

चंदना सोमाणी ©®

Thursday, 3 July 2025

गझल - वाटतो आता नकोसा

गझल - वाटतो आता नकोसा 

सावलीचा भार सुद्धा वाटतो आता नकोसा 
हा फुलांचा हार सुद्धा वाटतो आता नकोसा 

का जिवाला घोर लावी चांदणेही सांजवेळी 
लाघवी शृंगार सुद्धा वाटतो आता नकोसा 

ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे
पद्मिनी जोहर सुद्धा वाटतो आता नकोसा 

आळवेना रागदारी खेळ सारा प्राक्तनाचा 
नेटका संसार सुद्धा वाटतो आता नकोसा 

कोवळीशी आस माझी कोवळा संसार माझा
आर्जवी आधार सुद्धा वाटतो आता नकोसा 

मोकळा जर श्वास नाही कोरडा पान्हा कशाला 
बेगडी उपकार सुद्धा वाटतो आता नकोसा 

दुश्मनाला लाज वाटे हादरे ही भिंत जेव्हा 
नाटकी शेजार सुद्धा वाटतो आता नकोसा 

चंदना सोमाणी ©®

Tuesday, 24 June 2025

गझल - हेच वाटले होते

गझल - हेच वाटले होते 

हरता हरता जिंकू आपण हेच वाटले होते
सुटला नव्हता पेच तरी पण हेच वाटले होते

किती काहिली, तगमग होती तुला भेटण्याआधी
रुसला होता लहरी श्रावण हेच वाटले होते

शुल्लक होते कारण उगीच भांडत होते दोघे
पेटत गेला वाद अकारण हेच वाटले होते

विसरत नसतो जरी छवी तो, तरी विसरला अंती
जुन्या रूपाला नवीन दर्पण हेच वाटले होते

छळले नव्हते इतके त्याने छळले आहे आता
छळण्यालाही असेल कारण हेच वाटले होते

याच्या आधी तूच दिलेला घाव कोवळा होता
म्हणून साधा नसेल तो व्रण हेच वाटले होते

चंदना सोमाणी ©®

Monday, 16 June 2025

गझल - रंग बेरंग

गझल - रंग बेरंग 

करतात हे ऋतूही बघ राग राग आता
हे सूर्य चंद्र तारे सारे महाग आता 

एकी कुठे दिसेना, का रंग वेगळे हे
का ढंग भावनांचा झाला कजाग आता

हे हाल पाहवेना झाले किती फुलांचे 
गेले गळून सारे, सारे पराग आता 

ही आगही जळेना, विझले चिराग सारे 
येईल का उद्याला वेळीच जाग आता

ना राहिली नदीला ती ओढ सागराची 
अन् दाखवी किनारा खोटाच त्याग आता 

का रंग होत गेला बेरंग या धरेचा
रंगीत राहिला ना कुठलाच भाग आता

पाहू कसे कुण्याही दुर्दु:ख वंचितांचे 
का लावला सुखाने त्याला सुराग आता

उरला असा कितीसा हा काळ जीवनाचा 
सोडून जायचे का काशी प्रयाग आता

चंदना सोमाणी ©®

Thursday, 5 June 2025

मराठी गझल - वन-वे

मराठी गझल - वन-वे

सुंदर आहे...फसवे आहे 
जग कवितेचे कडवे आहे 

डाव्यालाही कळते आहे 
जे आहे ते उजवे आहे

आई इतकी माया करतो
मन बापाचे हळवे आहे

नाते आहे म्हणजे सोबत
रुसवे आहे फुगवे आहे

प्राण ओततो मातीमध्ये 
सुख डोळ्यांचे हिरवे आहे

परतीच्या ह्या वाटेवरचा 
मृत्यू केवळ वन वे आहे

चंदना सोमाणी ©

Saturday, 31 May 2025

मराठी गझल - चित्र देखणे

मराठी गझल - चित्र देखणे 


आयुष्याचे चित्र देखणे 
या जगण्याचे फिटे पारणे 

जणू मुकर्रर व्हावे जगणे 
तसे नव्याने तुझे गुंतणे 

चहू दिशांना नसेल चकवा 
अनेक वाटा अनेक वळणे 

सौंदर्याचा शाप मिळाला 
तरी सुगंधित झाले जगणे

काळासोबत बोलत आहे 
गूढ असावे तिचे बोलणे 

पुन्हा एकदा जन्म घेतला 
पुन्हा एकदा आले मरणे

चंदना सोमाणी ©®

Friday, 30 May 2025

मराठी गझल - कबिराचे दोहे सुचले

मराठी गझल - कबिराचे दोहे सुचले 
 

फुललेल्या नात्यावर जेव्हा ऊन पसरले
केवळ काही आठवणींचे वसंत उरले

शब्दाने तर बोलत नव्हते कुणीच काही
मौनामध्ये त्यांच्या पुढचे वास्तव दिसले

कुणी टाकला खडा स्मृतींच्या डोहामध्ये
मन पटलावर हलके हलके तरंग उठले

आभाळाला साद घातली कोडे सुटले
थेंबांचे मग मोती झाले क्षण गहिवरले

हवी कशाला इथे कुणाची मिरासदारी
कसेल त्याची जमीन या धर्तीवर म्हणले

सहजासहजी असे कधीही घडले नाही
दुःखाच्या जागेवर कोणी सुख पांघरले

जर हे झाले असते तर ते झाले असते
जर तर करता करता सारे जीवन सरले

भान नसावे.. उन्मन व्हावे.. या देहाने
आणि शेवटी जर कबिराचे दोहे सुचले

चंदना सोमाणी ©®

Saturday, 15 February 2025

चारोळी - २१


 शेवट माहीत असून सुद्धा 
सुरुवात करतो आपण
मग बाकी काहीच नाही 
स्वतःच स्वतःशी लढतो आपण

चंदना सोमाणी ©®

Monday, 27 January 2025

मराठी गझल - तू अशी वाहून जा

                           गझल - तू अशी वाहून जा


अडथळ्यांना मात दे अन् तू अशी वाहून जा
साजरी सुरुवात दे अन् तू अशी वाहून जा 

साथ देतो जर किनारा, शोध तू रस्ते नवे 
हात त्या हातात दे अन् तू अशी वाहून जा 

अटळ आहे तेवणे तर हो तमाची प्रेयसी 
तेवलेली वात दे अन् तू अशी वाहून जा 

सांजवेळी सांजवारा माळताना श्रावणी 
चिंब ओली रात दे अन् तू अशी वाहून जा 

राधिकेचा कृष्ण कान्हा राधिकेची बासरी
मारवा ओठात दे अन् तू अशी वाहून जा 

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - २०


 कणभर मनाच्या 
मणभर मागण्या 
अपूर्णत्वाच्या मग
असंख्य डागण्या 

चंदना सोमाणी ©®

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...