Followers

Monday, 25 December 2023

मराठी गझल - नाही हे नको

गझल - नाही हे नको 
 
गोष्टही बळ देत नाही हे नको 
चांदणे वेळेत नाही हे नको 

बोल तू अथवा कधी बोलू नको
माफ करता येत नाही हे नको

ठेवते सांभाळुनी ठेवा तुझा
तू कधीचा नेत नाही हे नको 

याचसाठी मी फुलांना त्यागले 
फूल काही घेत नाही हे नको 

एवढी आहे जरी हिरवळ इथे 
या पुढे तर शेत नाही हे नको

सोड ना सारे बहाणे हे तुझे
अर्थ हा अभिप्रेत नाही हे नको 

"चंदना" गुंफू कसे मक्त्यात मी
नाव हे गझलेत नाही हे नको 

चंदना सोमाणी ©

Sunday, 17 December 2023

चंदनाची फुले रसग्रहण -12

चंदनाच्या परी सुवासिक चंदनाची फुले...

रसग्रहण - प्रवीण देवरे 

 'साधारणतः पंधरा दिवसांपूर्वी चंदना सोमाणी यांचा हा सुंदर मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ असलेला आकर्षक काव्यसंग्रह हाती आला. थोडीशी धावपळ असल्याने मी सदर काव्यसंग्रह एका दमात वाचू शकलो नाही. पण दररोज चार पाच कविता वाचून काव्यसंग्रह संपवला पण मन काही भरले नाही म्हणून आज पुन्हा तो हाती घेतला आणि नव्या उत्साहाने पुन्हा एकदा वाचून स्वानंद घेतला. "चंदनाची फुले" किती सुवासिक आहेत याचा प्रत्यय नवीन नवीन कविता वाचतांना येत होता. कवयित्री चंदनाताई चंदनाची फुले या पहिल्याच कवितेत म्हणतात - 

"चांदण्याच्या घरी चंदनाची फुले
  चंदनाच्या परी चंदनाची फुले"

     चंदना सोमाणी यांनी या काव्यसंग्रहात कविता आणि गझला यांचा सुरेख मेळ घालून काव्यसंग्रह अधिकच खुलवला आहे. 

पुढे त्या शब्दमैफील - यांनी कवितेत म्हणतात - 

"फुलावे असे क्षण तुझ्या सोबतीने
  जशी चांदणी रात उजळून यावी"

एक एक कविता वाचतांना वाचक मनातून दाद देत असतो पुढच्या कवितेत त्या म्हणतात 

फिर्याद- 

"पुन्हा भेटली ती युगे लोटल्यावर
  छळावे किती हीच फिर्याद आली"

  माणूस हा सतत रंग बदलत असतो त्यावर त्या चपखल भाष्य करतात -रंग माणसाचे या कवितेत त्या म्हणतात व सुंदर रूपकांचा वापर करून 

"कलेकलेने पुनवेसाठी 
  चंद्र आपले अंग बदलतो"

  मनुष्य स्वभाव वेळ प्रसंगी हळवा होतो त्याचा अनुभव प्रत्येकास कधीना कधी येत असतो तसेच 

कधी कधी कवयित्री हळव्या होतात आणि त्यांच्या लेखणीतून उतरते ती भावना - 

"डोळ्यात आसवांचा हा कोणता पहारा
  रोमांचितो ऋतू अन् अंगावरी शहारा"

जीवनाकडे त्या अत्यंत तटस्थपणे बघतात व पुढे म्हणतात -

"कोंडमारा होत आहे हा किती
  वादळी अंधार आहे जिंदगी" 

अक्षरांचा लळा, कोरडे क्षण, पुन्हा पावसाळा, चांदणे उतरून आले, लेखणीचा रंग, मनातली सल, नवं पान, आशादीप अशा अनेक दर्जेदार कवितेतून सजलेला हा काव्यसंग्रह नक्कीच वाचकांना आवडेल. शेवटी शोध या कवितेत त्या स्वतःला शोधतात...   सगळीकडे सगळीकडे..  पुस्तकाची मांडणी, टाईप आणि कागदाची क्वालिटी उत्तम आहे आटोपशीर पोस्ट घेतो जेणेकरून जाणकार वाचकांना सदर सुंदर काव्यसंग्रहाची थोडक्यात ओळख होईल हाच माफक उद्देश. चंदनाताई सोमाणी असेच आपले साहित्य उत्तरोत्तर सुवासिक होवो आणि आपल्या लेखनाचा परिमल फैलत राहो ही सदिच्छा..मनःपुर्वक शुभेच्छा देतो आणि विराम घेतो. 

प्रवीण देवरे, मुंबई 

Friday, 8 December 2023

वीज ढगातून सोडवताना...

 


वीज ढगातून सोडवताना 
पुन्हा गुंतले सावरताना
नवी पालवी फुटून येते
तुझ्यातुनी मी अंकुरताना

विखुरलेल्या चंद्र चांदण्या
अडवतात का सांजवताना
अंतरातला सूर असावा
आर्त विराणी आळवताना

अंतर मिटले मी पण सरले
सहवासाने विरघळताना
बघवत नाही मला अताशा
निळे जलाशय पाझरताना

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल & सादरीकरण-चंदना सोमाणी


 

Friday, 1 December 2023

मराठी गझल गायन - प्राजक्ता सावरकर शिंदे, गझल - चंदना सोमाणी

मराठी गझल -तुझ्या सारखी मी
👇🏼


मराठी गझल - सोबतीने रात सारी...
👇🏼


मराठी गझल - नको सारखे रे...
👇🏼


मराठी गझल - बहावा 
👇🏻



 

Thursday, 30 November 2023

जगता यायला हवं


संपादक- संतोष थोरहाते 
 
जगता यायला हवं...

कुठल्याही गोष्टीचा अट्टाहास का ? सौंदर्य हे शोधता यायला हवं, जीवन हे जगता यायला हवं.तिने फोन ठेवला आणि मनात फक्त हेच विचार घोंगावत राहिले...
इकडच्या-तिकडच्या गप्पा करता करता ती अचानक शांत झाली, फोन कटला की काय? असे वाटून कानावरचा फोन काढून पाहिला तर फोन सुरूच पण शांतता... "काय गं काय झाले?"
"जे आवडत नाही तेच घडतंय माझ्यासोबत"
"म्हणजे, म्हणजे काय घडलं आता?" "अगं, शेजारच्या मैदानात मुले खेळत होती, अचानक बॉल दारापुढे... मुलांनी आजी बॉल फेका... आजी बाॅल द्या... चा नाराच लावला, असा राग आला काय सांगू तुला"
" त्यात काय राग येण्यासारखे आहे गं"
 "अगं, आजी काय इतक्यात, माझं काय वय झालंय का? मला नाही आवडत हे आजी बिज्जी.. का कुणास ठाऊक पण; मला या वाढत्या वयाची भीती वाटते."
"भीती वाटणे स्वाभाविक आहे पण; त्यात वाईट वाटण्यासारखं काहीच नाही, नॅचरल आहे...वाहत्या काळासोबत पोहता यायला हवं, काळ थांबत नाही मग हे रूप, रंग, वय कसे थांबणार तिने फोन ठेवला तरी विचार संपत नव्हते... 
सहाजिकच आहे, सौंदर्याच्या मोहातून बाहेर पडणं सोपं नाही. कोणाला नको असतं रूपाचं लेणं..  
तिचं मन मला कळत होतं. तिची ती चिडचिड, ती घुसमट समजत होती. निसर्गचक्रा पुढे कोणाचं कसं आणि काय चालणार, ते त्याचं काम अविरत करणार हेच खरं...
मीदेखील वयाच्या त्याच वळणावर होते... जिथं तिचं मन वाढतं वय लपवण्याची केविलवाणी धडपड करत होतं, तर मी ते सहज स्वीकारलं होतं आणि तिने नाही इतकाच काय तो फरक...
'बालपण देगा देवा' असं म्हणतो पण आपण रमतो ते तारुण्यातच. ते वयही असतं तितकंच देखणं मग भुरळ पडणारच ना. परंतु वयाच्या प्रत्येक वळणावर एक सौंदर्य दडलेलं असतं ते शोधता यायला हवं आणि जगता यायला हवं...
विचारात कोरडेपणाही स्वभाविक आहे पण; वाढत्या वयात मायेचा ओलावा ही तितकाच असतो. "आजीपण" म्हणजे निसर्गाने दिलेलं दुसरं मातृत्वच आहे आणि ते तितकंच गोड आहे. अगदी साताऱ्याच्या कंदी पेढयांसारखं.. 
त्याचा गोडवा जसजसा वाढत जातो  तसं तसं आपण त्यात एकरूप होत जातो अगदी वाढतं वयही विसरून, त्यास सहज स्वीकारून आणि त्याच आईपणात स्थिरावून.  सौंदर्य हे आरशात नाही तर मनात हवं, आरसा कायम बाह्य सौंदर्य दाखवेल पण मन हे विचारांचे सौंदर्य... जे अजिंठ्याच्या लेण्यांहून सुंदर... नुकत्याच उमललेल्या कळी कडे पाहताना जेवढा आनंद होतो तितकाच फुलांकडे पाहताना...होतो ना...? 
हे तसंच आहे, फक्त पाहता यायला हवं आणि जगता यायला हवं...

चंदना सोमाणी पुणे 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Tuesday, 28 November 2023

मराठी गझल - शेवटी काहीच नाही

 
 गझल - शेवटी काहीच नाही 

शेवटी काहीच नाही बोलता आले मला
हात हाती घेतला अन् स्पर्श बोलू लागला

रात्र नव्हती, चंद्र नव्हता आणि नव्हत्या तारका ‌
त्याच ओढीने पुन्हा मग रातवाही बरसला 

एक इच्छा का पुन्हा निसटून जाते सारखी
एक फुंकर घातली अन् एक तारा निखळला 

जायचे आहे तसेही त्याच वाटेने पुढे 
वाट नाही ओळखीची आणि चालू लागला

दूर होता चंद्र तेव्हा जवळ होता काजवा
हे असे ठरवू कसे मी कोण आहे आपला

वाह वाही होत गेली.. शब्द होता वेदना 
हा कुणाच्या मिळकतीवर शेर लिहिला चांगला

चंदना सोमाणी ©®

Monday, 27 November 2023

चंदनाची फुले - रसग्रहण - 11

अलवार उलगडत जाणारा सुंदर कविता संग्रह...  

   

 रसग्रहण - निलेश कवडे

'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह पृथ्वीराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला आहे. कविता संग्रहामध्ये गझल, मुक्तछंद, लावणी आणि गीत अशा वैविध्यपूर्ण कविता आहेत. कवितासंग्रहातील सुरूवातीच्या काही कविता गझल आहेत. एकूण कवितांपैकी गझल जास्त आहेत. 

चंदना सोमाणी यांना गझलेची खरी वाट सापडली आहे म्हणूनच त्यांच्या एका गझलेत त्या म्हणतात,

रानमाळावरी अमृताच्या सरी
याच वाटेवरी चंदनाची फुले

अशा शेराने त्या रसिकांच्या काळजाला साद घालतात. त्यांची गझल भावनांची सुंदर अभिव्यक्ती आहे. ही अशी सुंदर अभिव्यक्ती का झाली याचे उत्तर त्यांच्या गझलेतच रसिकांना मिळते, 

गझल म्हणाली मला चंदना
तुझ्यात आहे निवास माझा

त्यांचे जीवन गझलमय झाल्याचा प्रत्यय हा शेर देतो. चुकीच्या वा पर्यायाने आलेल्या शब्दाने शेराला उंची मिळत नाही तर गझल मध्ये चपखल शब्द योजना असली की शेर उंचीवर जातो. त्यांचा पुढील शेर बघा,

असा अक्षरांचा लळा चंदना ला
जसा व्यापतो अर्थ आकाश सारा

अक्षरांचा लळा असल्याशिवाय अर्थ आकाश व्यापत नाही… अक्षरांचा लळा असल्यामुळे त्यांची गझल सहज आहे. समजायला सोपी आहे. ती अलवार भाव घेऊन येते. 

तुझी आठवण गंध माळून यावी
जशी रातराणी फुलारून  यावी 

म्हणूनच हा शेर किंवा

तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा
टपोऱ्या दवांचा पुन्हा पावसाळा

असे शेर काळजाला स्पर्श करून जातात…

प्रेम हा भाव गझलेत तरलपणे मांडतानाच चंदना सोमाणी वास्तविकता सुद्धा प्रभावी शब्दात मांडतात...

सोसवेना भार आहे जिंदगी
टांगती तलवार आहे जिंदगी

सोबतीला चांदणे आहे तरी
पेटता अंगार आहे जिंदगी

असे शेर रसिकांना आयुष्याच्या खऱ्या दार्शनिक स्वरूपाची अनुभुती देतात. आयुष्य सुखदुःखाच्या वाटेने पुढे सरकत असते. माणसाला जगताना बरेवाईट अनुभव येतात ते खूप काही शिकवून जातात. परिस्थितीची दाहकता व्यक्तीला जीवनाशी समायोजन करायला भाग पाडते. अशा बिकट परिस्थितीत व्यक्ती तत्वांशी तडजोड न करता खंबीरपणे आयुष्याच्या लढाईला सामोरे जातो. ही लढाऊ वृत्ती चंदना सोमाणी यांची गझल जपते, 

सावलीचा भार सुद्धा वाटतो आता नकोसा
हा फुलांचा हार सुद्धा वाटतो आता नकोसा

त्यांचे असे शेर परिस्थितीची झळ सोसणाऱ्या माणसाचे प्रतीक बनते. सामाजिक बदल सुद्धा चंदना सोमाणी यांची गझल प्रभावीपणे टिपते, 

पाखरूही भीत नाही गोफणीला 
वेगळी आणा तिमाणे राखणीला 

भावकीची ओढ नाही भावकीला
राहिली ना ओल आता पापणीला

त्यांचे असे शेर समाज जीवनात झालेल्या विलासी जीवनशैलीला अधोरेखित करतात… त्यांच्या मनाची अस्वस्थता त्यांची लेखणी प्रभावीपणे विशद करते. 

गजांआड झाल्या जरी नेणिवा ह्या
खुल्या जाणिवांचा किती कोंडमारा 

अशा शेरातून त्यांची गझल 'खुल्या जाणिवांचा कोंडमारा' मांडते. गझल प्रमाणेच त्यांनी कवितेचे इतर प्रकार सशक्तपणे हाताळले आहेत…

'मी पाठवलेले पत्र' या मुक्त छंदातील कवितेमध्ये त्या म्हणतात, "अरे देवा हे काय केले मी तुला लिहायला घेतले पत्र पण कोरेच पाठवून दिले" देवाला हे पत्र पाठवल्यावर त्या विनंती सुद्धा करतात "घे ना समजून माझ्या मनातील मौन" असा संवाद त्या साधतात…त्यांची 'थंडीची भीती' ही कविता थंडीच्या दिवसातील जीवनमान चित्रित करते. भवसागरी या कवितेमधून "त्या दूरदृष्टी असेल ज्याची तोच पार या भवसागरी" हे जीवन विषयक तत्वज्ञान मांडून जातात. त्यांच्या मुक्तछंदातील कविता संवादी आहेत… त्या वाचकांशी हितगुज करतात या कविता वाचताना रसिक या कवितांशी एकरूप होऊन जातात. 'मैत्री' या कवितेमधून त्या खऱ्या मैत्रीचा महिमा सांगतात. कवयित्रीला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. अन्यायाविषयी चीड आहे. म्हणूनच समाजात घडत असलेल्या विघातक गोष्टींवर प्रहार करायला त्यांची लेखणी घाबरत नाही .'स्त्री तुझी अजब कहाणी' या कवितेमधून ते आपल्या व्यवस्थेवर प्रहार करतात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर ही कविता मार्मिकपणे भाष्य करते. 'प्रश्नचिन्ह' हे शीर्षक असणारी त्यांची कविता पुरुषी मानसिकतेला प्रश्न विचारून निरुत्तरित करून टाकते. 

'वेगळे रंग' या कवितेमध्ये ऐहिक सुखा पलीकडचे खरे प्रेम त्या मांडतांना म्हणतात, "चल एक नवीन आकाश शोधूया तुझ्या न माझ्या वेगळ्या अशा इंद्रधनुषी रंगासाठी" अशा शब्दांत त्यांनी प्रेम या भावनेला अधिक व्यापक बनवले आहे. 

बाईला पुरुषाकडून किंबहुना तिच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची जास्त गरज असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हाच भाव 'मनातल्या कविता' या कवितेमधून त्या अधोरेखित करतात. त्यांच्या पुढील ओळी बघा,

जमेल ना रे मला हे
तुझा हात हातात घेऊन 
मला ऐकवायच्यात तुला 
मी केलेल्या अनेक कविता

अशा शब्दात कवयित्री चंदना सोमाणी असंख्य स्त्रियांच्या अव्यक्त भावना त्या बोलक्या करतात… 'क्षण' या कवितेत त्या एखाद्या कळी प्रमाणे हळुवार उलगडत जातात...

आभाळाची शाल पांघरुनी
अलगत कुशीत शिरावे
अलगत कुशीत शिरता
मन चांदण चांदण व्हावे 

अशा शब्दात स्त्री सुलभ भाव हळुवारपणे सुरेख मांडतात… 'भिजलेले क्षण' या कवितेमधून त्या थेट पावसाला साद घालतात. लावणी हा प्रकार सुद्धा त्यांनी सुंदर हाताळला आहे.

'नवं पान' या कवितेत त्या जीवनविषयक आशावाद मांडतांना त्या व्यक्तीच्या थेट वर्मावर बोट ठेवतात…

ओढ संपली की
सुरू होते ओढाताण
आणि शापित आयुष्याचं
आपोआप उघडतं एक पान!

किती सुंदर शब्दांत त्यांनी दुःखाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात ओढाताण वाढली की तणाव वाढतो. म्हणूनच ओढ कायम ठेवण्यासाठी व्यक्तीने सतत प्रयत्न करत राहायला हवे. एकमेकां मधला जिव्हाळा आपण जपला पाहिजे. नात्यांमध्ये ओलावा कायम राहिला तर ओढाताण होत नाही. आजच्या या काळात हा ओलावाच जगण्याचा खरा आधार आहे. 

'चंदनाची फुले' या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध जेष्ठ गझलकार आदरणीय म. भा. चव्हाण सर यांची पाठराखण लाभली आहे. कविता संग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुखपृष्ठावर कवितासंग्रहाचे नाव सुंदर पद्धतीने लिहिले गेले आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आकर्षक झाले आहे. कवितासंग्रहातील तांत्रिक बाबी चांगल्या हाताळल्या गेल्या आहेत. चंदना सोमाणी यांची कविता लिहिण्याची स्वतःची शैली आहे. त्यांच्या कविता सहज आणि अलवार असतात. त्या उस्फुर्त भावना मांडतात. त्यांच्या कवितांमध्ये लय आहे. रसिक वाचता वाचता त्या गुणगुणायला लागतात ही त्यांच्या लिखाणाची खरी ताकद आहे. चक्रव्यूह, पोकळी, चौफुली आणि ओंजळीतली भाव फुले या कविता वाचकांना वेगळीच अनुभूती देतात. इतरही कविता आपल्या वेगळेपण जपतात. 

'आस' या कवितेमध्ये चंदना सोमाणी यांनी मांडलेला विचार माणसाला चिंतन करायला लावतो. खरे जगणे म्हणजे काय याचे उत्तरच ही कविता वाटते. त्या या कवितेमधून एक आस व्यक्त करतात ती मला खूप महत्त्वाची वाटते,

सदैव प्रकाशणारी पायवाट
चालत राहावे त्या पायवाटेवर
आणि झोकून द्यावे स्वतःला
काळाच्या ओघात
कोमेजण्यासाठी नव्हे
तर उमलण्यासाठी
सदैव..!

अशा शब्दात त्या माणसाला जगायला प्रवृत्त करतात. 'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांनी रसिकांना एक सुंदर कविता संग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन… त्यांच्या पुढील लिखाणास माझ्या मनापासून शुभेच्छा…

………निलेश कवडे अकोला 

मो. ९८२२३६७७०६

 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹




Sunday, 26 November 2023

गाऊ विठ्ठल विठ्ठल


टाळ प्रत्येकाच्या हाती
ओवी प्रत्येकाच्या ओठी
ज्याच्या त्याच्या मनामध्ये
डोकावितो जगजेठी 

हरपून देहभान 
करू भजन किर्तन 
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

देह हरेक वेगळा
एक भक्तीचा सोहळा
त्याच्या दर्शनाने होतो
जीव सावळा सावळा

हरपून देहभान
करू किती गुणगान
मुखे म्हणू पांडुरंग...पांडुरंग पांडुरंग 
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल 

त्याचा भुलवितो रंग
वेड लावितो श्रीरंग
त्याच्याकडे पाहुनिया
होते दृष्टीही निरंग

हरपून देहभान
एक होत जाते मन
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

जरी संपली ही वारी
भाव दाटतो अंतरी
ओढ मनाची मनाला
पुन्हा बोलवितो हरी

हरपून देहभान
सोडुनीया अवगुण
मुखे म्हणू पांडुरंग... पांडुरंग पांडुरंग
गाऊ विठ्ठल विठ्ठल गाऊ विठ्ठल विठ्ठल

चंदना सोमाणी ©®

Saturday, 25 November 2023

खुळी आस...

संपादक- अनिल जाधव 

*खुळी आस*

आज तो तिला भेटून गेला, वीस वर्षानंतर...

आलेला हुंदका तिने मोठ्या निग्रहाने परतवला. दाटलेल्या कंठाने व भरलेल्या नेत्रांनी नेत्रा घराकडे परतली, मनातील विचारांची श्रृंखला तुटत नव्हती. एकामागोमाग एक विचारचक्र सुरूच...

असे काय घडले की श्रीधर मुंबईहून नांदेड इतके लांब अंतर कापून तिला भेटायला आलेला असतांना फक्त दोन शब्दांसाठी काही मिनिटे वेळ देऊ शकला नाही. चहाचा आग्रह देखील यासाठीच की अजून काही क्षण त्याच्या सोबत घालवता यावे पण आल्या पावली का माघारी फिरला असावा....?

सारेच समजण्यापलीकडे...

असे काय कारण असेल, मान्य; त्रिवार मान्य आता आपल्या वाटा भिन्न असतील पण एक मैत्रीच्या बंधाखातर तरी बोलू शकत होताच की तो...

गतकालीन स्मृतींच्या गजबजलेल्या कोलाहलातून मन बाहेर पडायला तयार नव्हते. एक एक दृश्य चित्रपटातील चलचित्राप्रमाणे फेर धरू लागले आणि मन पुन्हा मागे गतकाळात जाऊन विसावले.

नेत्राचे घर ज्या गल्लीत होते त्याच गल्लीत श्रीधरचे असल्याने, तो खेळतानाचा पहिला स्पर्श, ती पहिली नजरानजर, त्यानंतरची ती आंतरिक ओढ, भेटी-गाठी सारे सारे आठवून कशातच मन लागेना. पुन्हा पुन्हा एकच प्रश्न समोर उभा राहत होता, का ? तो का असा वागला असावा...? हा प्रश्न फारच जीवघेणा ठरत होता. काही काहीच कळत नव्हते नेत्राला आणि जाणून घ्यायची तर ओढ लागलेली म्हणून दुसऱ्या दिवशी कारण विचारण्यासाठी तिने फोन लावला. 

रिंग जात राहिली पण समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता. खूप वेळा प्रयत्न करून एकदाही फोन उचलला न जावा, जाऊ देत, काही कामात गर्क असेल नंबर पाहून वेळ मिळाल्यावर तोच पुन्हा लावेल फोन असा विचार तिच्या मनात डोकावला. परंतू असे काहीच घडले नाही उलट कितीतरी दिवस नियमितपणे फोन करून देखील उचलला गेला नाही.

काही केल्या कोडे उलगडत नव्हते...

आणि एक दिवस अचानक श्रीधरने फोन उचलला, पुन्हा फोन करू नकोस इतकेच सांगण्यापुरता...

अरे पण कारण तरी समजू दे ना?

दोन मिनिटांच्या भेटीत असे काय घडले की गेल्या सहा महिन्यात फोनवर तास तास बोलणारा तू, अचानक फोन करू नकोस असे बोलतोस...??

नंतरचे काही वेळ ती फक्त ऐकत होती आणि तिचे डोळे मृग नक्षत्राप्रमाणे बरसत होते...

ती आपले मन व्यक्त करणार तरी कसे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने फोन ठेवला सुद्धा...

आभाळ भरून आल्यावर ढग बरसल्याने आकाश निरभ्र होते तसेच मन भरून आल्यावर मोकळे होण्यासाठी शब्द रुपाने बरसणे अनिवार्य होते पण लग्नानंतर नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे शेजारीपाजारी बोलण्याची चोरी तर मित्रमैत्रिणींचा प्रश्नच उद्भवत नव्हता. 

पतिपत्नीचं नातं जोपर्यंत मनाने एकजीव होत नाही तोपर्यंत गतकालीन स्मृती पुसल्या जाणे अशक्यप्राय होते, असेच काहीसे नेत्राच्या बाबतीत घडतं होते. सततचा अविश्वास तिला श्रीधरला विस्मृतीत जाऊ देत नव्हता. त्याचे ते प्रेम तिच्या मनाला रुंजी घालायचे. 

आनंदा नेत्राचा नवरा, नेत्राच्या वयाच्या दुप्पट वय तर होतेच पण दोन मुलांच्या बापाबरोबर वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे लग्न ठरले त्याच रात्री तिने श्रीधरला घरात विचारायला सांगितले पण त्याने भितीपोटी नकार दिल्याने शेवटी बोहल्यावर उभे राहण्यापलीकडे नेत्राकडे काहीच पर्याय शिल्लक नव्हता...

लग्नानंतर जे प्रेम, माया, आपुलकीची एखाद्या जोडीदाराला गरज भासते ते सुख नेत्राच्या वाट्याला आनंदाकडून न आल्याने श्रीधर तिच्या मनातून बाहेर पडलाच नाही कधी व एकदा तिच्या मैत्रिणीने लग्नाच्या वीस वर्षानंतर फोनवर श्रीधर बद्दल सांगितले व तिचे मन पुन्हा त्याच्याकडे ओढले जाऊ लागले अनैतिकतेच्या भावनेतून नव्हे तर फक्त भावनिक प्रेमापोटी, जिव्हाळ्याचे दोन शब्द ऐकण्यासाठी...

ते शब्द म्हणजे, तू कशी आहेस? तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात...??

पण छे, नियती एखाद्यावर इतकी कशी रूष्ठ असू शकते कोणास ठाऊक? 

नेत्राची होणारी कुचंबणा, मानसिक तसाच शारीरिक छळ, त्यांच्या वयातील अंतर, त्यात दबल्या जाणाऱ्या तिच्या भावना आणि पहिल्या प्रियकरासाठीची तिची उचल खाल्लेली भेटीची ओढ, किमान श्रीधर भेटल्यानंतर मनाचा एक नाजूक कप्पा, भावनिक प्रेमाचा रितेपणा भरून येईल असे तिला वाटत होते, भेटीनंतर या गोष्टींचा पुरता भ्रमनिरास झाला.

मन घायाळ झाले तर जखम भरून काढण्यासाठी किती वेळ जाईल सांगणे अशक्य, मारलेले घाव जातात पण मनावरील शब्दांचा ओरखडा माणसाचे खच्चीकरण करतो असेच त्या झालेल्या फोनवरील संवादाने तिचे मन खचून गेले होते. काही केल्या मनातून विचार जायला तयार नव्हते. 

दिवसामागून दिवस जात होते आणि मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने तिला माहेरी जाण्याची संधी मिळाली. बाल मित्रमैत्रिणींना भेटता येईल, जीवनातील काही क्षण पुन्हा आनंदाने घालवता येईल, माहेरची ओढ जणू अंधारात एक सुखाचा कवडसा असेच काहीसे तिच्या मनाला वाटून गेले.

आयुष्यात काही गोष्टी हव्या-नको असल्या तरी जशा आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात...

काही क्षणातच तिची ट्रेन स्टेशनवर पोहोचणारच होती....

माहेरच्या सुमधूर आठवणी तिच्या मनात रुंजी घालू लागल्या. त्याचप्रमाणे तिचे मन नकळत श्रीधरच्या आत्ताच्या आणि आधीच्या वागण्यातील तुलनात्मक बदल आठवता नैराश्याच्या दरीत खोल लोटलं जात होतं. मनाची नुसती घुसमट होत होती, बोजड घुसमट. हलकं होण्यासाठी मन मोकळं होणं गरजेच होतं आणि स्टेशनवर उतरताच तिला तिची बालमैत्रीण वसुधा दृष्टीस पडली, त्या रखरखत्या उन्हातही एक मंद वाऱ्याची झुळूक तिला सुखावून गेली...

श्रीधर भेटून गेल्यानंतरचा आजपर्यंतचा दाबून धरलेला हुंदका वसुधाच्या मिठीत तिने मोकळा केला.

काय गं, असे काय झाले रडायला...? वसुधाने विचारले. 

ह्रदयात साठलेल्या वेदनेला सांत्वनाचा वारे लागताच अश्रू बनून ओघळू लागले. 

असा नव्हता ना गं श्रीधर? नेत्रा बोलता बोलता रडू लागली. तू नंबर दिल्यानंतर गेले सहा महिने फोनवर बोलतांना म्हणायचा, तुझा तो रेखीव गोरापान चेहरा माझ्या मनात आजही तसाच त्या वहीतील गुलाबासारखा जपून ठेवलाय मी. किती सहन करतेस गं तू मला तुझे दुःख पाहवत नाही, हा खरंच त्याचा नाटकीपणा होता का गं? की फक्त प्रेमाचा मुखवटा धारण केला होता तो त्या भेटीत गळून पडला. जीवनाच्या काटेरी वाटेवर चालतांना फक्त एक त्याच्या भेटीची आस मला रोज नवजीवन जगायला भाग पाडत होती ते त्याचे प्रेम आठवून अन् त्याने असे वागावे, तुला आठवतो तो दिवस बाबा निवर्तलेला. तो दिवस माझ्यासाठी अतिशय कठीण परंतू त्याने मला दुःखातून उभारले. त्याच्या निस्सीम प्रेमाने भेटीच्या दिवसापर्यंत जगण्यास उभारी दिली. तो येणार असा फोन येताच मला स्वर्ग दोन बोट उरलेला. अतिशय आतूरतेने मी त्या दिवसाची वाट पाहिली. तो कसा असेल? कसा दिसत असेल त्यात देखील माझ्यासारखाच बदल झाला असेल का? की आजही तो पुर्वीइतकाच रूबाबदार दिसत असेल ? 

परंतू भेटून गेल्यानंतरचा तो फोनवरील संवाद जीवघेणा ठरला.

मला काही आयुष्यभर त्याच्या खांद्यावर ओझे बनून राहायचे नव्हते तर जिव्हाळ्याच्या दोन बोलाची अपेक्षा बाळगली होती मी, हाच का तो श्रीधर जो माझ्यावर जिवापाड प्रेम करायचा की फक्त माझ्या तारूण्यातील देखणेपणावर...???

श्रीधरच्या एका भेटीसाठी आसूसलेली मी, आजपर्यंतच्या वेदनादायी आयुष्यातून त्याची एक वासनारहीत प्रेमळ मिठी सुखाच्या क्षणाचा एक कवडसा देईल, ह्या एका क्षणासाठी मी सारे आयुष्य वेचले. अन्याय सहन करून देखील जगले, मनात एक खुळी आस घेऊन...

आणि तो म्हणाला की तू आता पूर्वीप्रमाणे दिसत नाहीस, तुझा तो अवतार पाहून मला किळस वाटली. 

मनापासून प्रेम करणारा श्रीधर कधीकाळी फक्त तिच्या सौंदर्यावर प्रेम करत होता ही गोष्ट तिच्यासाठी त्रासदायक ठरत होती. कोणीतरी आपल्यावर प्रेम करते ही भावना जशी सुखावणारी असते तसेच बाह्य सौंदर्य संपुष्टात आल्यावर ती व्यक्ती आपला द्वेष करते ही भावना क्लेशदायी ठरते. कथा, कादंबरीतून स्त्री सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की; तिच्या शारीरिक सौंदर्यापुढे आंतरिक सौंदर्य दुर्लक्षित होते. 

जगात शारीरिक सौंदर्याचे आकर्षण हीच सर्वात मोठी गोष्ट आहे का? शारीरिक प्रेमापुढे भावनिक प्रेम दर्जाहीन का ठरवले जाते...? 

बाह्य सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की मनातील कोमल भावना यापुढे अर्थहीन ठरल्या जाव्या...??

आज ना उद्या जे सौंदर्य लुप्त होणार ते शारीरिक मग चिरकाल टिकणाऱ्या अंतरंगातील मृदु-कोमल भावना, आंतरिक सौंदर्याला काहीच महत्त्व नाही का?

नात्यांची श्रृंखला स्वभावावर जोडली जावी न की बाह्य सौंदर्यावर...

वेलींवरील फुलांचा टवटवीतपणा त्याच्या पोषक तत्वांवर अवलंबून असतो, कसदार माती, पुरेसा सुर्यप्रकाश, खत व पाणी मिळाल्यावर त्याचे निर्माल्य होईपर्यंत ते टिकते, नाहीतर अकाली गळून पडते...

असाच काट्यांनी वेढलेला गुलाब होती ती...

झाकोळलेले आभाळ बरसून स्वच्छ, नितळ, निरभ्र झाले होते...

जसे तिचे मन मोकळं होऊन.......!!!


.....# चंदना सोमाणी ©® पुणे

Friday, 24 November 2023

मराठी गझल आणि रसग्रहण - या मनाचे त्या मनाला

गझलेचे रसग्रहण - रवींद्र सोनवणे 

मराठी गझल - या मनाचे त्या मनाला

या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही 
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही 

जीत होती हार होती काय होते काय सांगू 
जिंकणे सोपे खरे तर हारताही येत नाही 

कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले 
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही 

दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला
आतला आईपणा नाकारताही येत नाही 

थांबलेला क्षण म्हणाला, कोण आहे यातला तू
हा भला की तो भला हे ताडताही येत नाही 

संपले ना पर्व इथले जायचे तर जा अता तू
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही 

घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित
वेदना जख्मी मनाच्या मोजताही येत नाही 

चंदना सोमाणी, पुणे 

आदरणीय गझलकारा सौ.चंदना सोमाणी. एक असं नाव ज्यांनी अल्पावधीतच गझल विश्वात आपलं स्वतःचं एक वलय निर्माण केलेलं आहे. त्यांच्या बहुसंख्य गझला ध्वनिमुद्रित, चित्रफीत मुद्रीत झालेल्या आहेत. त्यांच्या गझलेचे वेगळे पण श्रोत्यांना भावते. त्यांची स्वतःची अशी एक शैली आहे, जिच्यात कुणाच्याही लिखाणाची छाप सापडत नाही. जे काही आहे ते फक्त आणि फक्त चंदना सोमाणीच आहे. हे त्यांच्या गझल लेखनाचे वैशिष्ट्य आहे. खयालांची विविधता आणि मांडणीचे नेमकेपण हे त्यांच्या गझलेचे विशेष गुण आहेत. आज मला त्यांच्या अशाच एका सुंदरशा गझलेचे रसग्रहण करण्याची संधी  मिळाली याबद्दल मला आत्मिक आनंद होत आहे. चला तर गझलेच्या रसग्रहणाकडे वळूयात...

गझलेचा मतला बघुयात...


या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही

वरील मतल्याला अनेक पैलू आहेत. मानवी मनाची दोन प्रकारची अभिव्यक्ती असते. एक सुप्त मनाची आणि दुसरी जागरूक मनाची. सुप्त मन आपल्या नकळत काही विशिष्ट घटनांची नोंद करत असते तर जागरुक मन सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या जाणिवा अधोरेखित करत जात असते. अशावेळी सुप्त मन आणि जागरूक मन यांच्यातल्या प्रसंगांची एकमेकावर प्रभावी संघर्षमय उद्विग्नता आपल्या मनस्थितीवर परिणाम करत असते. आणि या द्वंद्वात होणारी आपली भावनिक घालमेल भावनांचा कोंडमारा आपण कुठेच व्यक्त करू शकत नसतो. ही अव्यक्त घुसमट माणसाला खूप अस्वस्थ करून सोडते. खूपदा जवळची व्यक्ती आपल्या जवळ असते पण तिलाही हा कोंडमारा आणि ही घुसमट आपण सांगू शकत नसतो. अशी काहीशी मनाची अवस्था होऊन जाते. त्या अशा अवस्थेबद्दल वरील मतला अतिशय समर्पकपणे भाष्य करतो.

आता दुसरा शेर बघुयात... 

जीत होती हार होती काय होते काय सांगू
जिंकणे सोपे खरे तर हारताही येत नाही 

वरील शेर खूप बोलका आहे. खूपदा आपल्याला मनासारखे यश मिळते. पण ते यश साजरे करताना काहीतरी सल मनाला खात असते. नेमका आनंद साजरा करावा की दुःख व्यक्त करावे हेच माणसाला उमजत नसते. कदाचित जो विजय मिळवला गेला आहे तो बहुधा आपल्याच आप्त स्वकियांवर मिळवला गेलेला असेल आणि ज्याच्यामुळे काही सुंदरशी नाती दुरावल्याचे दुःख मनाला खात असेल. अशा वेळी जिंकून सुद्धा हारल्यासारखेच वाटत असते. त्यावेळी आनंद आणि दुःख ह्या दोन्हीही भावना मनाला कोणतंच समाधान देऊ शकत नसतात. जिंकायचे तर असते पण इतर कुणाला हरवणे मनाला मान्य नसते अशा वेळी धड जिंकता सुद्धा येत नाही. हार पत्करायची म्हटल्यावर कुठेतरी अस्तित्वाचा प्रश्न सतावत राहतो अशी ही द्विधा अवस्था, मनाचे मनाशी चालणारे द्वंद वरील शेर सांगतो आहे. कदाचित हा हारजितीचा प्रश्न हा स्वतःशीच स्वतःवर विजय मिळवण्याचा संघर्ष असेल असेही वाटते कारण मनाचे खेळ कुणालाही उलगडणे कठीण असते. यावरून मला एका मराठी गाण्यांच्या ओळी आठवतात.

मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्या आधी कळीचे, फुल पाई तुडविते 
दैव दुसरे घडविते

असेच असते मानवाच्या जीवनाचे. एखादी गोष्ट नशिबात असते परंतु दैवाला काही वेगळेच मंजूर असते. असा हा शक्याशक्यतेचा संघर्ष म्हणजेच वरील शेर आहे.

पुढचा शेर बघुयात...

कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही 

वरील शेरा साठी एका हिंदी गाण्यातल्या ओळी अतिशय चपखल बसतात

आनेवाला पल जानेवाला है,
हो सके तो इस्मे जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवला है !!

जीवनात जे  क्षण हातून निसटून जातात ते पुन्हा कितीही मागितले तर कोणालाच ते पुन्हा फिरून लाभत नसतात. जे जगायचे आहे ते आताच ह्याच क्षणात जगायचे आहे. कारण पुन्हा हा क्षण पुन्हा फिरून आयुष्यात कधीच  येणारा नसतो. म्हणून जे आहे ते आताच आहे. जे जगायचे आहे ते आताच जगुन घ्या. कारण पुन्हा हे क्षण जगायला मिळणार नाहीयेत. कित्येकदा आयुष्याचा उलटा प्रवास करताना आठवणींच्या जगात सुंदर सुंदरसे क्षण हाताला लागतात. ज्या ठिकाणी मन युगांपासून आजही थांबलेले असते. ते क्षण माणसाला पुन्हा जसेच्या तसे हवे असतात. पण आज ह्या क्षणाला त्या वेळी असलेल्या जवळच्या गोष्टी, व्यक्ती, काळ आणि वास्तवाचे स्वरूप आता पूर्णपणे बदललेले असते. ना तो काळ राहिलेला असतो ना त्या गोष्टी आजच्या घडीला जवळ असतात. असतात फक्त हव्या हव्याशा वाटणाऱ्या त्या जुन्या क्षणातील जगलेल्या आठवणी. पण त्याही कालानुरूप धूसर धूसर होत जाताना दिसत असतात. अशी ही मानवी मनाची खंत  वरील शेरातून व्यक्त होताना दिसते.

पुढचा शेर बघुयात...

दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला
आतला आईपणा नाकारताही येत नाही 

प्रत्येक पुरुषात दोन अभिव्यक्ती असतात. एक स्त्रीसुलभ भावना आणि दुसरी पुरुषी भावना. ह्या नैसर्गिक जाणिवांना कोणीही अपवाद नसतो. प्रसंगानुरुप प्रत्येक स्त्री पुरुषातील ह्या दोन्ही अभिव्यक्ती होत जातात. वरील शेर दोन गोष्टी इथे सांगतो एक स्त्री मधली आई आणि दुसरी पुरुषाच्या आत असलेल्या स्त्री मनाची ग्वाही. ह्या दोन गोष्टींबद्दल वरील शेर बोलत असतो.
      आधी एका स्त्री मना विषयी हा शेर काय सांगतो ते बघुयात, वरील शेरा मध्ये असणारी स्त्री सांगते आहे की मी स्त्री आहे म्हणूनच आज मी आई होऊ शकले आहे. ही माझी नैसर्गिक आई म्हणून जी अनुभूती आहे ही निसर्ग दत्त देणगी आहे. जी मी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ती मी नाकारू शकत नाही. कारण मी एक स्त्री आहे अर्थात मादी आहे म्हणून आज मी आईपणाचे सुख उपभोगू शकते आहे. कदाचित मी मादीच नसती तर ह्या आईपणाच्या भावना मला अनुभवता आल्या नसत्या. म्हणून माझ्यातल्या स्त्रीला आईपण अनुभवायला मिळाले हा मी माझा सन्मानच समजते. तो काही माझा कोणता दोष नाहीये. असा विचार वरील शेर मांडतो.
       दुसऱ्या अंगाने विचार केल्यास असे म्हणता येईल की एखादा पुरुष काही अपरिहार्य कारणाने एखाद्या अपत्याचा सांभाळ आई प्रमाणे करत असेल. यात त्यावेळी त्याच्यातील मातृत्व आपोआप जागे होते. त्याच्यातील मातृत्व पुरुषपणावर हावी होऊन नैसर्गिक रित्या त्याच्या मनात त्या बाळा विजयी वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, कणव, ओढ आणि अगतिकता आपोआप तीव्रपणे निर्माण होत जाते आणि पुरुषांमधील एका स्त्री मनाचा त्या ठिकाणी उदय होऊन त्याच्याठायी पुरूषतली एक आई जिवंत होते. जी तितक्याच उत्कटतेने त्या बाळावर प्रेम करते जेवढी बाळाला जन्म देणारी एक स्त्री करत असते.
      अशा दोन अंगांनी विचार करायला लावणारा हा शेर आहे

पुढचा शेर बघुयात...

थांबलेला क्षण म्हणाला कोण आहे यातला तू
हा भला की तो भला हे ताडताही येत नाही

प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाच्या मनाची अवस्था बदलत जात असते. ह्या क्षणाला एखादी व्यक्ती जर खूप प्रेमळ वागली असेल तर पुढच्याच क्षणाला हीच व्यक्ती वेगळी वागेल, वेगळीच भासेल. मनाची स्थित्यंतरे ही अनाकलनीय असतात. त्यांचा उलगडा करणे हे एक दिव्यच असते. प्रत्येक क्षणाला माणूस आपलीच वेगळी वेगळी छाप मागे सोडून जात असतो. एकच व्यक्ती एखाद्याशी खूपच प्रेमळ वागत असेल तर तीच व्यक्ती एखाद्या दुसऱ्या माणसा बरोबर अतिशय वाईट वागली असेल. याचाच अर्थ असा की जशी सभोवतालची भौगोलिक तसेच वास्तविक परिस्थिती बदलते तशी मानवाच्या मनाची अवस्था बदलत जाते. अशा वेळी एकाच व्यक्ती बद्दल दोन वेगवेगळे भिन्न मतप्रवाह उदयाला येतात. आणि मग आपल्याला त्या बद्दल बोलताना नेमका हा असा आहे का तसा आहे? हे ठरवणे कठीण जाते. असेच काहीसे वरील शेर सांगतो आहे.

पुढचा शेर बघुयात...

संपले ना पर्व इथले जायचे तर जा अता तू
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही

वरील शेर अगदी काळाला उद्देशून लिहिलेला शेर आहे. काळ अव्याहतपणे चालत असतो. तो ना काल कोणासाठी थांबला होता  ना आज कुणासाठी थांबणार आहे. त्याच्या या प्रवासामध्ये मात्र तो असंख्य अशा खुणा माणसाच्या जीवनावर उमटवून जातो. असंख्य अशा आठवणी मागे ठेवून जातो. जिथे फक्त माणसालाच वाटते की या इथे काळ थांबला होता. पण तो केवळ एक भास असतो. आठवणींचा मनाला हुलकावणी देणारा आभास असतो. माणसाने कितीही म्हटले की मृत्यू तू आलास तसा आल्यापावली निघून जा मला अजून थांबायचे आहे. पण तो काळ असतो. तो कुणाचे ऐकतही नाही आणि कुणासाठी थांबत सुद्धा नाही तुम्हाला जेव्हा न्यायचे आहे तेव्हा तो घेऊनच जाईल असा काळाचा महिमा असतो. प्रत्येकाचे बालपण रम्य असते, प्रत्येकाचे तारुण्य सुंदर असते. आणि त्या त्या काळातल्या आठवणी खूप सुंदर आणि मनाला मोहरून टाकणाऱ्या असतात. तरीही आपले बालपण किंवा तारुण्य माणसाला पुन्हा फिरून नव्याने मिळत नसते. कारण ते काळासोबत मागे पडलेले असते वाहून गेलेले असते. म्हणून तुम्ही काळाला कितीही सांगितले की तुझे कार्य संपले आहे तू आता इथून जा. पण तो कुणाच्या सांगण्यानुसार कधीही वागत नसतो

काळ आला देहाशी खाऊ, 
असे तुकोबाचे वचन आहे..ते आजही सत्य आहे आणि उद्याचेही सत्यच आहे.
अशा रीतीने वरील शेर वाचकाला अभिप्रेत होतो

आता गझलेचा शेवटचा शेर पाहू

घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित
वेदना जख्मी मनाच्या मोजताही येत नाही 

वरील शेराचा साधा सरळ विचार केला यार एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रेमात असंख्य घाव दिले आहेत ज्याच्या जखमा तिच्या मनावर अगणित झालेल्या आहेत. ज्या मोजणे केवळ अशक्य आहे. असा एक साधा सरळ विचार अभिप्रेत होतो. परंतू तात्विक विचार केल्यावर ह्या शेराची व्याप्ती खूप वाढते. एखादा माणूस जन्माला आल्यापासून ते जगण्याचा शेवट होई पर्यंत असंख्य अशा चढ उतारावरून जात असतो. आणि ह्या प्रवासात त्याला खूप काही दुःख हाल अपेष्टा तर मिळतातच त्याच बरोबर मानअपमानही सहन करावा लागलेला असतो. ह्या प्रवासात बऱ्याच गोष्टी हाती लागतात तर बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी हातातून निसटून गेलेल्या असतात. जेव्हा हा पीडित जीव ह्या सर्व कालचक्रातील जीवन घटनांचा एकांतात विचार करतो त्यावेळी काय मिळवले काय गमावले याचा हिशोब करताना काय जगलो याचा विचार मनाला विकल करून जातो. आणि ते दुःख सहन होत नाही कुणाला सांगणे तर अगदीच दुरापास्त असते. असा हा जीवनाचा प्रवास आपल्या दोन ओळीच्या शेरा मध्ये गझलकारा अतिशय समर्थपणे मांडतात.

एका सुंदर गझलेचे रसग्रहण करण्याचा एक आत्मिक आनंद लाभत आहे.

रवींद्र सोनवणे 
9096873678

मराठी गझल - नको सारखे रे...

मराठी गझल - नको सारखे रे...

नको सारखे रे नको घाव देऊ
व्यथेला नको वेग भरधाव देऊ

नको दूर जाऊ नको दूर ठेऊ
नको त्या सुखाला नको भाव देऊ

किती सारखे तेच ते नाव येते
तुला आज आपण नवे नाव देऊ

जिथे काल होतो तिथे आज आहे
नव्या वेदनेला नवा गाव देऊ

पुन्हा हारण्याचा पुरे वाद आता
नवा खेळ आणिक नवा डाव देऊ 

तुला भेटण्याला जिथे वाव नाही 
अशा अंतरंगी नको ठाव देऊ  

चंदना सोमाणी ©®

Thursday, 23 November 2023

मराठी गझल आणि रसग्रहण - क्षण एखादा

 गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण तिराणकर 

मराठी गझल -क्षण एखादा 

तिराणकर काका पुन्हा एकदा निशब्द केलंत मला...

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

आदरणीय पै. इलाही सरांच्या आरशाहून मराठी गझल विश्वाला दुःखभारीत आरशाचे दुःख धुंद तरीही गंधाळ नि वेगळा आरसा दाखवणारी चंदना व माणसाच्या आयुष्यातील क्षणाक्षणावर ज्याची पकड आहे असा काळ, असा एखादा क्षण सौगात म्हणून आपल्या झोळीत टाकतो की आयुष्याला अनोखे वळण मिळते.
कालाय तस्मै नमः काळ हाच सर्वश्रेष्ठ आहे काळाने रावाला रंक नि रंकाला राव केले आहे..
या मातीने काळाला कवेत घेऊन असे अनेक आकाश स्वतःच्या कालपटात नि काळ पोटात गिळंकृत केली आहेत. तो निर्मम काळ ज्याला कुणाची तमा नाही, काळाला काळीज नाही, तो पूर्णतः  नि:संग आहे. देहहीन आहे. त्याला मानवी अवयव नाहीत. तो सार्वकालीक व सर्वजयी आहे. त्याचा देह बनला क्षणाक्षणाच्या कणाकणांनी.  अवघ्या ब्रम्हांडाला तो व्यापून आहे. मात्र  त्याचा कालातीत अदृश्य देह हा क्षण क्षण जुळवून सरकत जातो, काळाचं हे अनभिज्ञ अजेय तत्त्वज्ञान सौ.  चंदना सोमाणी गझलेत बांधू शकतात. काळाचा महिमा सांगण्यात संत महंतांनी, विचारवंत तत्त्वज्ञांनी आयुष्ये रिक्त केली समाज प्रबोधनासाठी.  एवढा गोवर्धन चंदना कृष्णासारखी काही शेरांनी एका करंगळीवर पेलते, जे सहज साध्य नाही.  त्याला चिंतनाचा आवाका मोठा असावा लागतो.
निरव शांततेचा भंग करीत अकस्मात चर्चच्या कळसावरून घनगंभीर चर्चबेल निनादते तेव्हा येशूच्या सुळावरील यातनांचा नि त्याच्या खिळे ठोकलेल्या जखमातून वाहून साकळलेल्या रक्त कणांच्या वेदनांचा दर्दभरा वास्तव-भास मन विदीर्ण करून जावा, एवढी एखाद्याची चिंतनशीलता ही प्रज्ञेच्या पलिकडील "तथाता"
या स्थितप्रज्ञ-समानुभूतीची असावी लागते, तेव्हाच काळाचा वेध घेता येतो. त्याच्या अंतरंगात अंमळ डोकावता येतं. 
मानवी आयुष्य व देह हा पळ, क्षण नि श्वास  निश्वास यांनी युक्त आहे. हे सारं संपृक्त होतं तेव्हा सारं संपून जातं.
आज सर्वांना माहीत असणारं वास्तव माणसे नजरेआड करतात. जीवनाची आपापली वाट चोखाळत राजमार्ग शोधत असतानाच संपून जातात. वाटेवर झडलेल्या फुलांच्या पायघड्या असतात, तर पुढे संपूर्ण मार्ग बाभूळबनातील कंटकांनी व्यापलेला असतो. कभी खुशी कभी गम.
अवघं आयुष्य सोसताना, पोसताना, सांभाळताना असा एखादा क्षण येतो की ज्याची अपूर्वाई कालातीत असते. तो क्षण वर्तमान नि भावी आयुष्य व्यापूनही उरतोच. हा अनुभव सर्वकालिक आहे आणि याच्या अगदी उलट, असा एखादा क्षण येऊन जातो की अवघ्या जिंदगीची माती करून जातो. अस्तित्व संपवून टाकतो. यापूर्वीचा गंधित दरवळ तो समर्थ बलवान क्षण एका वादळ फुंकरीत संपवून टाकतो. होत्याचं नव्हतं करून जातो म्हणून चंदनाची प्रज्ञा शेर पाझरते ---

आयुष्याला पुरून उरतो क्षण एखादा
होत्याचेही नव्हते करतो क्षण एखादा 

काळ कधीच खोटे वागत नाही.  फक्त तो सरतो, सरकतो तसा  असत्याचे आवरण फाडीत जातो. अन त्याचेच अभिन्न अंग असलेला एखादा चुकार व टूकार क्षण खोटा ठरतो. पण त्यालाही दोष देता येणार नाही कारण त्यामागेही मानवी कृत्याचा सम्यक कार्यकारण भाव असतो.

फाटत जातो बुरखा टरटर सत्याचा अन् 
म्हणता म्हणता खोटा ठरतो क्षण एखादा

आयुष्याच्या ग्रंथात आपल्याच नोंदी असतात आपल्याच पाऊलखुणा उमटत जातात. काही चटोर, काही कठोर , काही कमी, काही जास्त, काही छोटी, काही मोठी, काही लिहूनही कोरी, काही पानांवर व्यथा, काहींवर कथा, काही वेदना, काही संवेदना , काही सुखाने भारलेली तर काही दुःखाने घेरलेली अक्षरे उमटत जातात. काही पाने व्यवधानाने तर काही अनावधानाने कोरी राहतात. कधीकधी मागील सारी पाने भरून गेली असावी असे वाटते पण आज वरचा आपला अवघा ग्रंथ कोरा राहिला हे नंतर जाणवतं.  वाघावर आरूढ होऊन येणाऱ्या चौदाशे वर्षे वयाच्या चांगदेवांनी दिलेला कोरा कागद पाहून त्यांच्या ज्ञानाचा कोरेपण दाखवून देणारी मुक्ताई मला चंदनाच्या रूपात दिसते. असा एक क्षण येऊन धडकतो की आयुष्याचा अवघा ग्रंथ क्षणात भरून जातो. हा अनुभूतीचा नि समानुभूतीचा प्रकार आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.

कोरी पाने उलटत गेली भरली नव्हती
शेवट सारी पाने भरतो क्षण एखादा

एकट्या दुकट्यालाच नाही तर कधीकधी सकल जगाला अचंबित करणारा एखादा क्षण येऊन जातो. क्षणात सुरू झालेले वादळाचे  विप्लवी तांडव सारे काही नेस्तनाबूत करून जाते क्षणात आलेल्या एका त्सुनामीने.  ज्याची स्वप्नातही कल्पना नसावी असे काहीतरी घडून जाते क्षणात आयुष्य वळण घेते निर्धाराचे नि नरेंद्रातून विवेकानंदांचा जन्म होतो. निर्णयाचा एकच क्षण, दुःख मुक्तीच्या विवंचनेने भारलेला कुणी राजकुमार सिद्धार्थ "तथाता" मार्गावर क्रमण करतो. मोहाचा एकच क्षण निर्धाराने टाळतो आणि गौतमाचा बुद्ध होतो.  झाडाला वाटलेही नव्हते असे घडेल पण ते घडले. हे सारे ज्यात अंतर्भूत आहे तो शेर चंदना लिहिते---

माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
क्षणात एका गफलत करतो क्षण एखादा

आपण जे अपेक्षिलेले नसते माणसांचे सर्व आडाखे, अंदाज चुकवणारा असा एखादा फसवा क्षण.
आपल्याच माणसांनी केलेली फसगत, वंचना त्यातून निर्माण होणारी वेदना या वेदनेच्या यातना आपले अंतर्बाह्य अंगांग घेरून टाकतात. सुटकेचा एक उसासा ही न घेऊ देता जिवंत मरणाचा अनुभव. पण अचानक घनतम चिरणारी एक वीज अंतरात चमकावी, तिचा लोळही विरावा न विरावा तोच घनांदकारावरचा तिचा प्रहार आपल्या समस्त दुःखांना क्षणार्धात दूर सारतो नि तो एखादा क्षण त्या शतक्षत विव्हल लाव्हातप्त काळजावर एक सुखेरी फुंकर घालून मनाला शीतलता प्रदान करून दुःख मुक्त करतो.
कळीकाळालाही त्याचेच एक अभिन्न अंग असलेला एखादा क्षण किती हळवा आहे हे कळत नाही त्याच्याच अंतरात तो सामावलेला असूनही. ज्यावर मानवी गुणांचे आरोपण झाल्यासारखा सुखात हसतो, दु:खात रडतो नि काही वेगळे दिसताच बावरतोही, एखादा क्षण असाही बावरतो हे काळालाही कधी कधी कळत नाही ही गंमत. त्याचं तप्त मन मानवी मनावर फुंकर घालणंही नियतीच नियोजन.
शेवटी शेवटी अंताची चाहूल लागते माणसाला. आता आपला प्रवास संपायला आला, मुक्कामाचे ठिकाण आल्याचा वास्तव- भास अनामिक भीतीने घेरून टाकतो माणसाचे अवघे अस्तित्व. डोळे ताठरतात,  मन अनंताचा वेध घेते. मेंदू जागा आहे आठवांचे रसायन मेंदूला पुरवणार्‍या पेशींची अस्तित्वगामी घाबरी पळापळ सुरू आहे, काय आवरावे ? नि काय सावरावे कळत नाही. मन:पटलावर एकेक घटना चलचित्रासारख्या सरकत  आहेत. माणसे,  घटना, मान-अपमान, पैसा, कीर्ती, यातना, विवंचना, वंचना, फसगत, दगे देणारे सगे सारं सारं आठवतं जातं माणसाला अंतिम क्षणी निमिषार्धात. तो एकच क्षण. कदाचित शेवटच्या श्वासाचा अमूर्त अंतिम साक्षीदार. तो अंतिम क्षण पैलतटीच्या मोहक मुक्तीच्या सादेने मोहरून जातो. हा आशय घेऊन चंदना लिहिते---

पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
ऐलतटावर मग मोहरतो क्षण एखादा

जे शक्य नाही त्याचाही वेध घेण्याची गुर्मीगर्भित भाषा मानवी मन बोलू लागते. त्याचं ते खुजेपण त्याला दाखवून देण्यासाठी कर्तव्य परायण चंदना लिहिते---

मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
तशाच केवळ भ्रमात हरतो क्षण एखादा

भ्रमाचे पांघरूण ओढून फसवा क्षण बाजी हरतो. भ्रम आणि वास्तव याचा अन्योन्य संबंध ज्ञानदेवांनी दोरी आणि साप या रुपकाने ज्ञानेश्वरीत वर्णिलाच आहे. चंदना-मुक्ताई हे भान पुन्हा माणसाला देते.

शुभाशिर्वादासह बाळकृष्ण तिराणकर 

मराठी गझल - या मनाचे त्या मनाला, स्वरसाज - राहुलदेव कदम, गझल - चंदना सोमाणी



 

चंदनाची फुले - रसग्रहण - 10

जगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल - 

                             रसग्रहण - मधूकर जाधव 

जगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल

                                   मधुकर जाधव, सिन्नर 

     “चंदनाची फुले” हा सौ. चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह. फेसबुकावरील मैत्रीचे जे माणसं जोडणारे वलयं आहेत. त्यातून हा कवितासंग्रह मला भेट मिळाला. यावर भलावण वा टीका  काहीतरी लिहावं म्हणून हा प्रपंच. 

       सौ. चंदना सोमाणी ह्या नवोदित कवियित्री नाहीत. लेखक म्हणून त्यांची पहिली ओळख त्यांनी २०१६ मध्ये सुरुवात करून पहिली पुस्तिका ‘सुखदुःखाच्या वळणावर’ जगणं आनंदी कसं करता येईल यावरचं त्यात भाष्य आहे. पहिला कवितासंग्रह ‘दरवळ रातराणीचा’ २०१७ मध्ये आला. आणि ‘चंदनाची फुले’ हा २०१८ मध्ये गझल नि कविता ५८ रचनांचा दुसरा कवितासंग्रह आहे. 

       ‘मनातले....’ मनोगतात त्या म्हणतात, ‘मी फक्त लिहिते...’ ह्या ओळी बरेच काही सांगून जातात. निर्मितीचा ध्यास सातत्य ह्यात दिसून येते. मा. म. भा. चव्हाण यांनी आपल्या  मलपृष्ठावर  दोन शब्दात ‘सत्य आणि सौंदर्याचा महोत्सव’ असं म्हणून गौरविले आहे. 

       कवितेच्या प्रांतात कवितेचं बेसुमार पिकं काढलं जात आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या गदारोळात कवितेला काही हक्काची दालन खुली झाली आहेत. (फेसबुक, whats aap इ.)आणि त्यामुळे कवी कविता आणि आस्वाद घेणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. एकीकडे वाचन संस्कृती लोप पावली जात आहे काय ! हा सूर आळवत असताना त्या सोशल माध्यमातून नवोदित कवी कविता घेऊन येताहेत आणि रसिकही त्यांना क्रिया प्रतिक्रया दाद देतात. हेही नसे थोडके! सध्या हा पुराचा लोंढा आहे. त्यातला पुरासा बाजूला जावून नितळ पाणी आणि तळठावं निश्चित मिळेल हा आशावाद बाळगायला काय हरकत आहे ! कवितेचा दर्जा , संख्यात्मक, गुणात्मक हे जरा बाजूला सारून कवितेचा एक नवा प्रवाह मराठी साहित्याच्या दालनात समृद्ध होत आहे. त्यांचे स्वागतच करायला हवे. दिवाळी अंकाची मक्तेदारी आणि कविता उलट टपाली परत येणे ह्याला इथं फाटा मिळाला आहे. हे तेव्हढेच खरे. 

       मराठी साहित्याचा कल्पना आणि मनोरंजनाचा ढाचा तसाच ठेवीत काही कवी कवियित्री वर्तमान प्रश्नांची कैफियत आपल्या कविता नि गझल यामधून मांडीत पारंपारिक परिघाला छेद देण्याचे काम करीत आहे. इथे कवितेच्या जाणीवा समृद्ध होताहेत. 

       सुख दुःखाच्या सीमा सरकताहेत. दुःखाची भूमिका जेंव्हा दुय्यम आणि टोकाची ठरते तेंव्हा गळ्यात दाटून आलेला उमाळा बाहेर पडत नाही. आणि डोळ्यातले अश्रूही अतीव दुःखाने आटतात. ‘अक्षरांचा लळा’ यामध्ये कवियित्री हेच टिपते, 

           उमाळा कसा ना फुटे या जिवाला
          किती कोरडा हा नदीचा किनारा (अक्षरांचा लळा पृ.१०) 

       मन आणि मनांतल प्रेम ही जोडगोळी भेटीची अपेक्षा ठेऊन जगत असते. आशा निराशेचं वादळ मनांत रुंजी घालत असतं. जेंव्हा ही गळाभेट होते तेंव्हा नकळत कवियित्री शब्द रेखाटते,

            अशी दूर व्हावी निराश मनाची
            जशी ज्योत अंधार भेदून याव (मैफिलीत पृ. ११)   

       विभक्त कुटुंब पद्धतीची रौंदळीचा इतका विपर्यास झाला आहे की ज्यांनी पोटाला चिमटे घेत आपली पिढी जोपासली ती अडगळ ठरू पाहताहेत. मग कवियित्री मर्मावर बोट ठेवीत म्हणते, 

           सुखाकारणे त्यागतो मायबापा
           कसा धाडतो पुत्र वृद्धाश्रमाला (कोरडे क्षण पृ.१४)

      माणूस हा समाजात वावरताना त्याभोवती आणिक कंगोरे राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रिंगण करून असतात. चालू राजनीतीवर माणूस हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा कसा आहे ते ह्या कवितेत विस्तृतपणे येते,

           राजनीतिच्या नावाखाली
           रोज नवे तो चंग बदलतो

           जेव्हा सोबत नकोच ठरते
           तेव्हा आपण संग बदलतो  (माणसाचे पृ.१६)

       सगळीकडून अंधारून आलं आहे. जीवन जगण्याचा सारा कोंडवाडा होत आहे. जिंदगी डावावर लावली जात आहे. यावर कवियित्री म्हणते, 

          कोंडमारा होत आहे हा किती
          वादळी अंधार आहे जिंदगी  (जिंदगी पृ. २०)

       अत्याचारानं कळस गाठला आहे. याची शिकार होतेयं अबला स्री. तो अन्याय, ती सल ही जुलमी परंपरा कवियित्री इतिहासाचा दाखला देत चितारते, 

          ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे
           पद्मिनी जोहार सुद्धा वाटतो आता नकोसा  (सुद्धा वाटतो आता नकोसा पृ. २३)  

       ‘आहेरे’ ‘नाहीरे’ हे वास्तव कवयित्रीनं नेमकेपणाने मांडलं आहे. वंचितांची तहान म्हणजे गरीबी श्रीमंताची दरी अधिकच रुंदावते आहे. ती संपवायला इथली व्यवस्था अपुरी पडली आहे. म्हणून ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळ्याची सामाजिक लढाई छेडली ते पाणीही चवदार नाही अशी स्पष्टोक्ती सोमाणी यांनी निर्भीडपणे व्यक्त केली आहे, 

           शमली न वंचितांची पुर्ती तहानही
           पाणी नसे तळ्याचे चवदार फारसे (फारसे पृ. २८)

       आयुष्यातील लेखाजोखा मांडताना चंदना सोमाणी यांनी एक नवीन ताळेबंद चितारला आहे. त्यामध्ये बाकी मोठे शून्य येतच नाही. हा ताळेबंद कधीच टॅली होत नाही. कुशल आणि अकुशल कर्माचा हा हिशोब असं कवियित्री स्पष्टपणे नोंदवतेय,

          सदाचारणी साठव नगद दुराचाराचा कर खर्च
          हाच खरा असेल हिशोब बाकी सारे बेहिशोब (हिशोब/    बेहिशोब पृ.६२)

चंदनाची फुले ह्या कवितासंग्रहात गझल आणि मुक्त छंदातील कवितेचा हा सुरेख आकृतीबंध आहे. कविता कमी व गझल अधिक आहेत. गझलेचा पाढा वाचताना वृत्त, मात्रा आणि  अक्षरी ह्याला हात न लावता भावलेल्या गझलांचा मनाला भिडणारा संवाद इथे मोलाचा वाटतो. तसेच कवितेचं दालन पाहताना मुक्त छंदातील कविताही उत्तम आहेत. शब्दांची ओढाताण न करता सहज भाषेतली मांडणी भावते. त्यामुळे कविता दुर्बोध होत नाही. कवितेत नवखेपण कुठेही आढळत नाही. जगण्याचं समीकरण मांडत जीवनात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या ह्या गझल आणि कविता आहेत. अजूनही कवियित्री चंदना सोमाणी ह्यांना समता विषमतेचा कॅनव्हास व्यक्त व्हायला वाव आहे. भावी वाटचालीला मंगल कामना !  

मधूकर जाधव, सिन्नर

Madhukarjadhav353@gamil.com

चंदनाची फुले 

सौ. चंदना सोमाणी 

पृथ्वीराज प्रकाशन 

३५३, नारायण पेठ, लक्ष्मी रोड, 

पुणे – ४११ ०३० 

किंमत रू. १५०.००

Wednesday, 22 November 2023

मराठी गझल गायन - अश्विन जावडेकर, गझल - चंदना सोमाणी

मराठी गझल - डोळ्यात आसवांच्या
👇🏼


मराठी गझल - वाटतात त्या जरी Live 
👇🏼


   मराठी गझल - वाटतात त्या जरी
👇🏼


सर्व्हर डाऊन...

                        संपादक - संतोष थोरहाते  
सर्व्हर डाउन....

टीव्हीवर सर्व्हर डाऊन बातमी वाचली आणि दुनिया अचानक थांबल्याचा भास झाला... माझ्यापुरता तरी. 
पहिल्यांदा विचार आला तो स्वातीचा, तिचे विश्वच फेसबुक आणि व्हाट्सअप भवती... तिची फिरकी घ्यावी म्हणून तिचा नंबर डायल केला तर बाईसाहेब पार्टी एन्जॉय करत होत्या. या गोष्टीचा त्यांना पत्ताच नव्हता. " काय बोलतेस काय? अरे माझ्या फेसबुक पोस्ट, माझ्या कविता, माझे फोटोज्..." अरे स्वाती तू ते काय घेऊन बसलीस सूत्रांकडून तर मला असे समजले आहे की, उद्यापासून आपले सर्व फोन कॉल्स पण बंद...
तिचा माझ्यावर विश्वास न बसल्याने तिने नेट ऑन करून पाहिला "नेट तर सुरूच आहे" थांब म्हणता म्हणताच...
फोन कट. कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक झाले की काय, असा विचार करत मी देखील किमान दहा वेळा तरी फोन ऑन-ऑफ करून पाहिला. तिही तेच करत असेल बहुदा..
तिकडे जाऊबाई हातावर फोन आपटून आपटून पाहत असल्याचे पाहून पन्नास हजाराचा मोबाईल रिमोट सारखा हातावर काय आपटून आपटून पाहतेस म्हणत तिलाच आता आपटायचे बाकी ठेवले होते भाऊजींनी. तुम्हीसुद्धा सर्व्हर डाऊन असल्याकारणानेच मोबाईल मधून डोकं वर काढून तिच्याकडे पाहिले, त्यांचा राग पाहता सांगणार कोण ?
 मुलांच्या मोबाईलने घरातील कोपरान् कोपरा पालथा घातला. या समाज माध्यमांनी आपल्या मनावर एवढे गारुड घातले आहे की, त्यांनी आपल्या आनंदाचा सर्व्हर डाऊन केला काही काळापुरता...
हे पुन्हा सुरू होईल की नाही, मी देखील मुलांना चार-चार वेळा जाऊन विचारले. तुझे काय मम्मा! मुलांनी ऐकल्या न ऐकल्यासारखं केले, फारच फोन ॲडिक्ट झालीस असं अहो पण म्हणाले...
नाही, बरोबर आहे... "पण तुम्हाला कसे कळणार घरात एकटे असताना हे फेसबुक, व्हाट्सअप, फोन कॉल्स हेच आमच्या करमणुकीचे साधन, आणि जनसंपर्क सुद्धा... तुम्ही बाहेर पडल्यावर चार लोकांना भेटता, जितका वेळ बाहेर असता कामानिमित्त का असेना पण संवाद असतोच ना, जनसंपर्क येतोच ना... पण; आम्हाला मात्र किती बोलतेस  फोनवर असे बोलून रिकामे.  विरंगुळ्यासाठी, काही वाचनासाठी ऑनलाइन असलो की विचारणारे भरपूर... आमच्या आनंदाचा सर्व्हर डाऊन झाला तरी चालेल पण; तुमचा नको. रहा ना काही दिवस घरात ...
नेटवर्कसाठी कोपरान् कोपरा धुंडाळणारी मुले, रागावलेले भाऊजी, आमचे अहो हे ऐकताच जवळ आले आणि सर्व्हर डाऊन असो वा नसो यापुढे रविवार सोबतच रात्री दहा ते अकरा ही वेळ कायम घरातल्यांसाठीच असणार असे म्हणताच मोबाईलने सर्व्हर पकडो न  पकडो पण आनंदाने मात्र पुन्हा सर्व्हर पकडला...

चंदना सोमाणी पुणे 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



मराठी गझल गायन - स्वरसाज - गायत्री गायकवाड, गझल - चंदना सोमाणी

मराठी गझल - पुन्हा पावसाळा
👇🏼

                
                  मराठी गझल - सोबतीने रात सारी...
                                          👇🏼


मराठी गझल - जराशी निराळी
👇🏼


मराठी गझल - जाणता अजाणता
👇🏼


मराठी गझल - अडथळ्यांना मात दे
👇🏼


 

मराठी गझल आणि सादरीकरण - चंदना सोमाणी


 

Friday, 17 November 2023

मराठी गझल - बघू नंतर

मराठी गझल - बघू नंतर...

कुठे धरती कुठे अंबर..बघू नंतर
किती दोघातले अंतर.. बघू नंतर

कुणाला लागली घरघर.. बघू नंतर
कुणाची चालली मरमर.. बघू नंतर

कुणी भरली इथे घागर... बघू नंतर
कुणाचा आटला सागर... बघू नंतर

इथे झाले कुणी बेघर.. बघू नंतर
कुण्या दारी किती झुंबर..बघू नंतर

मला ना भेटला आदर.. बघू नंतर
कुणाची केवढी चादर... बघू नंतर

जरी झालेच मन जर्जर.. बघू नंतर
स्मृतींचे साचलेले थर... बघू नंतर

चंदना सोमाणी ©®                      

मराठी गझल आणि सादरीकरण - चंदना सोमाणी


 

Tuesday, 14 November 2023

लहानपण देगा देवा...

                             संपादक - संतोष थोरहाते

लहान पण देगा देवा.....

भाद्रपद महिना लागला की बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. गणपती उत्सव म्हटले की मनाचे पाखरू उडतच बालपणात जाते. बाप्पाच्या ज्या आठवणी  तिथे विराजमान असतात ना त्या पुसणे केवळ अशक्यच, त्या तिथेच निरागसपणे वाट पाहत असतात, आपल्या मनाच्या एका कोपऱ्यातून, असंख्य आठवणीच्या कवडश्यातून आजमधे डोकावत.. 
आजही मला आत्ता पेक्षा लहान असतानाचे ते गणेश उत्सवाचे १० दिवस आठवतात, आकर्षित करतात.. तिथेच गुंतवून ठेवतात. आत्ता पेक्षा मनाचे पावित्र्य हे बालपणी जास्त असते, भावना निरागस असतात. सोवळे असण्यापेक्षा श्रध्दा अपार असते. ते भावच वेगळे असतात....
माझ्या लहानपणी आमच्या घरी गणपती बसवत नसायचे, काही कारणास्तव....
पण गणपतीची ती व्रक सोंड व रेखीव, सुंदर, बोलके डोळे आम्हा भावंडांना  भुरळ पाडायचे. आम्ही भावंडे प्रेमात पडायचो बाप्पाच्या त्या रूपाच्या. त्यामुळे त्या प्रेमापोटी आम्ही भावंडे मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी एक प्लास्टिकचा गणपती विकत आणायचो अर्थातच खाऊसाठी मिळालेल्या पैशातून. अंगणापासून ते घरापर्यंत वाजतगाजत आणायचो आणि वाजतगाजत म्हणजे काय तर ताट व चमचा हाच आमचा ढोल ताशा असायचा मात्र भन्नाट मजा यायची. मग सजावटीसाठी घरातील खेळणी असायचीच. शिवाय माती, वाळू आणून डोंगर किंवा किल्ला बनवायचा व त्या वर खेळण्यातील पाट, लाल-हिरव्या रेबीन वापरून छान सजवून बाप्पाला विराजमान करायचो. आजूबाजूच्या झाडा-वेलींची फुले आणणे, हार बनवणे, आरती करणे ह्या कार्यात कधी १० दिवस निघून जायचे ते कळायचे देखील नाही. खरच हौसेला मोल नसते... 
पण ज्या दिवशी विसर्जनाची घटिका जवळ यायची त्या दिवशी काळजाचा ठोका चुकायचा. जड अंतःकरणाने अश्रू भरलेल्या नेत्रांनी घराजवळच असलेल्या विहीरीत बाप्पाचे विसर्जन करायचो. पण नंतरचे 2-3 दिवस करमायचे नाही. 
आज आपण मोठे झाल्यावर गणपती बसवतो भाव भक्तीने आरती करतो, मोदक करतो, पंचपकवान्नाचा भोग दाखवतो, दुर्वा, आघाडा, कमळ, केवडा अगदी सगळी पत्री आणून अर्पण करतो, फुलवाती सुध्दा अगदी शुध्द  तुपातील....पण हे सगळे करतांना भक्तीपेक्षा कर्तव्य जास्त जाणवते बालपणीची ती भावनामय भक्ती कुठेतरी हरवलीय, बदललीय असे जाणवते...
सगळीच पुजा अर्चा सोवळ्यात करूनही ती बालपणीची भक्ती मनाला आजही  खूप सुखावून जाते...आजही मी हे लिहताना ते बालपण पुन्हा एकदा जगले असे वाटून त्या निरागस भक्तीत डोळ्याच्या कडा ओलावल्या...
त्याच बालपणीच्या निरागस भक्तीने बाप्पाकडे पाहताना बालपण  डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे झरझर चितरले. आणि पुन्हा थोड्यावेळापुरते का असेना पण बालपण जगून घेतले,  खूप खूप छान वाटले हे लिहितांना आणि ते बालपण आठवणींच्या रूपाने पुन्हा एकदा जगतांना ......

 चंदना सोमाणी पुणे

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


Monday, 13 November 2023

मराठी गझल आणि रसग्रहण - पाखरूही भीत नाही..‌

गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण 

                    मराठी गझल - पाखरूही भीत नाही...

फक्त गझलेसाठी गृप वरचा Balkrishna Tirankar काकांचा नितांतसुंदर अभिप्राय 🙏🌹 मनापासून धन्यवाद काका 😊


अगदी बरोबर चंदना  !
आज जग दिखाव्याचे झाले आहे. साधेपणा जो आमची संस्कृती जपतो,तो आपल्या रक्तात अंगभूत आहे.रंगढंग यात जो निष्णात तो पुढारलेला समजतात. साधेपणा हा प्राणातून अवतरीत होतो तर दिखाऊपणा हा तनाचा बेगडी आविष्कार असतो.
ज्याची नजर आरस्पानी तोच पाहू शकतो साधेपणा पलीकडील सौंदर्याच्या निरभ्र नभाचा अवकाश. आपण सारे,काही अपवाद वगळता,ओंडक्याचे प्रवाहपतीत वारस आहोत. प्रवाह नेईल त्या दिशेने वाहत जायचे.थोर लेखकमराठी गझल - पाखरूही भीत नाही... स्व.गजानन  जहागीरदारांचं 50 वर्षा पुर्वी मी वाचलेलं वाक्य आठवलं..
"जे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहतात नि आकाशाला आयुष्याचा अर्थ विचारतात,त्यांच्या तळहातावरील रेषाही बदलतात." साधेपणाही असाच एक मुळ प्रवाह आहे,जो गंगोत्री, यमुनोत्रीशी नाते सांगतो. जे मुळातून येते नि शेवटपर्यंतही तसेच राहते ती शुचिर्भुतता, ते पावित्र्य अपूर्व असते. त्याला कोणतेही अपावित्र्य स्पर्शही करू शकत नाही, कारण प्रवाहातील वाहत्या पाण्याला तुम्ही ओझरता जरी स्पर्श केलात तरी पुन्हा त्याच थेंबाला तुम्ही कधीच स्पर्शू शकत नाही.तसेच साधेपणाचेही आहे. हे साधेपण गजलकारा चंदनाजींना प्राणांतिक आक्रंदाने भावले म्हणून त्यांच्या प्राणकोषातून या शेराचा उद्गम झाला.  साधी रचना, साधेच शब्द शेरात बांधून अन्वयार्थाचा सागरतळ गाठणाऱ्या नि नभाला स्पर्शणाऱ्या त्यांच्या सर्वच रचना या त्यांचा बहुआयामी तरीही नितळ, निर्मळ, आरस्पानी साधेपणा हा त्यांच्या व्यक्तीमत्वातील अंगभूत गुणांचा परिपाक आहे. त्यांच्या गजलेतील साधेपणा वर बेतलेला शेर हा तसाच अर्थामागील अन्वयार्थाचे अनेक पदर उलगडणारा आहे. मग मला वाटून जाते....महात्मा फुले, महात्मा गांधी, रमाबाई, सावित्रीमाई, या महामानवांची निखालस साधी वेषभुशा "साधेपणातील सौंदर्याचा" परमोच्च बिंदू गाठते. जगदगुरू तुकारामांची बाराकशी नि धोतर मनप्राणाला भावते. त्यांचा साधेपणा निरंतर पाझरत राहतो त्यांची अभंगवाणी.
मन निर्मळ झाले की हा साधेपणा साधतो नि मग कोणतीही पाश्चात्यता आमचा विचारभेद करू शकत नाही.

      याच गजलेतील शेवटचा भावकीवरील एक शेर भावला नि मन हेलावून गेले. काळ बदलला. जग बदलले.
पुर्वीचे संस्कार कधीचेच अडगळीत गेले. मग परिपाक....
भाऊभाऊ रामभरत राहिले नाही. स्वार्थामुळे नातेसंबंध आपल्याच रेशीमकोषात स्वत: भोवतीच कोष गुंडाळत म्रुत झाले. आईबाप हे व्रुद्धाश्रमाच्या नवसंस्कृतीचे शरणागत झाले. सणाच्या दिवशी दुसऱ्या भावाकडे राहणाऱ्या मायबापांना जेवणाचे निमंत्रण देऊन बोलावले नि दुसऱ्या भावाला दोघांच्या जेवणाचे बिल पाठवले. 15-15 दिवस भावांनी आईसाठी वाटून घेतले.
31 दिवसांचा महिना आला तेव्हा आईने तक्रार न करता देवाचा उपास करणे आरंभले. बापलेक, भाऊभाऊ नातेसंबंधांची पक्की भिंत बांधत आयुष्यभर आकसाने जगत राहिले. ना आनंद ना जगणे.एकमेकात पडलेले हे अंतरातले अंतर पाहून हळवे मन नि कनवाळू काळजाच्या निसर्गकन्या व्यथीत न होत्या तरच नवल. हसत खेळत काळजाला पिळ  पाडणाऱ्या त्यांच्या गजला म्हणूनच मला प्रचंड आवडतात, भावतात. या ही गजलेचे तसेच. आमेन !
चंदना शुभाशिष ! नितळ प्रवाहासारख्या निरंतर लिहीत रहा......

https://m.facebook.com/story.php?story_fbid=734602770048060&id=100004950309672


                     

चंदनाची फुले - रसग्रहण - 9

शब्दांची हजारो फुले -     
                               
   रसग्रहण - चंद्रकांत वानखेडे 

***चंदना सोमाणी***

कवयित्री-गझलकारा मा. चंदना सोमाणी यांचा 'चंदनाची फुले' हा गझल आणि कविता संग्रह वाचनात आला. निर्मळ मनाची माझी ही पोरगी जसे जगते तसेच लिहिते...जगण्याच्या परिघात येणारी सुख-दुःखे, आसू-हसू समंजसपणे स्वीकारत पुढे जाणारा तिचा प्रगल्भ प्रवास या संग्रहात प्रत्येक ओळीत दिसून येतो. या प्रवासाची नश्वरता तटस्थपणे पाहणे आणि सहज स्वीकार करणे फारसे सोपे नसते. जेव्हा एखाद्या संवेदनशील मनाला ते सहज जमून जाते तेव्हा समर्थ शब्दातून ते अभिव्यक्त होते.

ती लिहिते :-

थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा

या आणि यासारख्या बहारदार शब्दातून जगण्याचे तत्वज्ञान या कविता सांगत राहतात. असे जगत असताना वाट्याला येणारी उपेक्षा, वंचना आणि शोषण कवयित्रीला अस्वस्थ करते. परिस्थितीचे तौलनिक आकलन करून या विषमतेवर नेमके बोट ठेवणारी तिची कविता समानतेचे महत्व अधोरेखित करते. उतू जाणारी श्रीमंती आणि तेलाच्या थेंबासाठी तडफडणारे जगणे हा विरोधाभास कसा कमी होईल हा सनातन प्रश्न तिची कविता मांडत राहते.

पोराबाळांच्या तोंडातील घास काढून
फोडणीसाठी वाचवलेल्या तेलातून 
लावलेला दिवा
वाट पाहतेय
पुरातन काळापासून चालत आलेल्या
त्या लक्ष्मीची...

        एकूणच, मनाला भुरळ घालणाऱ्या शब्दांची हजारो फुले चंदनाच्या या संग्रहात आपल्याला दिसून येतात...त्याच्या सुगंधाने रसिक धुंद होऊन जातो...

बेटा, मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐

चंद्रकांत वानखेडे 

मराठी गझल - क्षण एखादा...

 मराठी गझल - क्षण एखादा...

आयुष्याला पुरुन उरतो क्षण एखादा
होत्याचेही नव्हते करतो क्षण एखादा

फाटत जातो बुरखा टरटर सत्याचा अन्
म्हणता म्हणता खोटा ठरतो क्षण एखादा

कोरी पाने उलटत गेली...भरली नव्हती   
शेवट सारी पाने भरतो क्षण एखादा

माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
क्षणात एका गफलत करतो क्षण एखादा

किती वंचना, किती वेदना, किती यातना
हसरी फुंकर घालत सरतो क्षण एखादा

काळालाही कळला आहे कधी कुठे तो
हसतो, रडतो अन् बावरतो क्षण एखादा

पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
ऐलतटावर मग मोहरतो क्षण एखादा

मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
तशाच केवळ भ्रमात हरतो क्षण एखादा

चंदना सोमाणी ©®

Saturday, 11 November 2023

मराठी गझल - तुझ्यामाझ्यातले अंतर...

मराठी गझल - तुझ्यामाझ्यातले अंतर...

जरा मिटवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले  अंतर
जरा समजून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर

मला तू भेटतो तेव्हा, दिलासा देत जातो तू
जरा चकवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर 

कुणाला वाटु दे इर्षा, कुणाला वाटु दे हेवा
जरा उजळून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर

नको नुसतेच लावू तू मधाचे बोट ओठांना
जरा उमजून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर 

नभाला हाक देऊ चल, उन्हाला साथ देऊ चल
जरा वळवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर

नभाने झाकले आहे तुला काही मला काही
जरा हरवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर

किती तू लांब गेला बघ, पुन्हा परतून येतो का ?
जरा मिळवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले  अंतर

चंदना सोमाणी ©®

चंदनाची फुले - रसग्रहण - 8

सुगंधी - चंदनाची फुले...


     रसग्रहण - ऄ. के. शेख 

पुण्याच्या प्रसिद्ध कवियत्री चंदना सोमनाथ सोमाणी यांचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह 'चंदनाची फुले' आज आपल्याकडे आला आहे. या कवितासंग्रहात काही कविता मुक्तछंदात काही गेय तर काही गजलाही आहेत. सुरवातीलाच त्या म्हणतात-

चांदण्यांच्या घरी चंदनाची फुले
चंदनाच्या परी चंदनाची फुले 

या संग्रहात तुम्हाला चंदन, चांदण्या, चंद्र, कोजागिरी, कळ्या, फुले, ज्योत, गंध, रातराणी, सांजवारा, कंकण, तारका, कवडसा, पारिजात, श्रावण, पौर्णिमा, अशा फुलांसारख्या अगणित शब्दांची रेलचेल आढळेल व नवनवीन शब्दही तुम्हाला भेटतील. पाहा...

गुलमोहरेल बघ तू सोसून झळ उन्हाची
आता तुझ्या विना मी शोधू कुठे निवारा

अशा छान छान शब्दांची, आशय, विषय, आणि फुलांची पखरण पुस्तकभर आहे. लोकप्रिय गझलकार म. भा. चव्हाण उर्फ म. भा. म्हणतात-

चांदण्यांने धाडलेले पत्र आहे चंदना
हासणारे लाडके नक्षत्र आहे चंदना 

कवीची स्वभाव वैशिष्टे, त्याच्या व्यासंग, बहुश्रुतता, काव्यप्रवृती इ. चा परिचय त्यांच्या काव्यातून होत  असतो. चंदनाचे जीवन, भावना तिच्या विचारांनी समृध्द आहे. त्यांची कविता अंतर्मुखतेकडे वळते आणि ती आत्मप्रत्यातून आलेली दिसते. शब्दांवर त्यांचे प्रेम आहे. पाहा...

भावना व्यक्त करायला लागतात शब्द
अल्लाहकी इबादतकी तरह पाक असतात हे शब्द 

जीवनाविषयीची श्रद्धा, उत्कटता आणि निष्ठा यातून त्यांची कविता अद्भूत झाली आहे. त्यांच्या कवितेतील शब्द म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा सडाच. पाहा...

आभाळाची शाल पांघरुनी अलगद कुशीत शिरावे
अलगद कुशीत शिरता मन चांदण चांदण व्हावे 
 
संग्रह इतका देखणा आहे की त्याचा कागद, मुखपृष्ट, बांधणी, छपाई सर्वच दृष्टीने उत्कृष्ट..
चंदनाने हा शब्दांच्या पारिजातकाचा सडा आता गजलेसाठी घालावा. स्वागत आणि शुभेच्छा...

ऄ. के. शेख
9869202650

जेव्हा अशा उंचीवरच्या माणसांची कौतुकांची फुले आपल्या झोळीत पडतात...बोलायला शब्द उरतातच कुठे...मनापासून धन्यवाद सर...
तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे माझे पुढचे पुस्तक फक्त गझलेचेच असेल....


चंदनाची फुले - रसग्रहण - 7

गझल आणि कवितांचा सुरेख संगम


   
  रसग्रहण - वनिता कोराटकर 

प्रतिभावंत लेखिका कवयित्री सौ. चंदना सोमाणी यांच्या चंदनाची फुले या गझल संग्रहास आज एक वर्ष पूर्ण झाले.आज वर्षपुर्ती निमित्त मैत्रीण म्हणून या अप्रतिम संग्रहास शुभेच्छारूपी दोन शब्द.........!!!!

    गझल आणि कवितांचा सुरेख संगम असणारा हा काव्यसंग्रह  पुणे येथील  पृथ्वीराज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे . मुखपृष्ट व मलपृष्ठ आकर्षक असून पुस्तकाची  मांडणी  व क्वालिटी सर्वोत्तम आहे. काव्यसंग्रहास समर्पक  असेच शीर्षक व म.भा चव्हाण यांनी केलेली पाठराखण कवयित्रीच्या व्यक्तीरेखास अनुरूप अशीच आहे. या संग्रहामध्ये आशयगर्भ दर्जेदार गझला पहायला मिळतात. निसर्ग, सद्य परिस्थिती, प्रासंगिक, सामाजिक, वैचारिक, तसेच मानवी भावनांचे विविध रंग आढळून येतात. कवयित्रीचे शब्दांवरील प्रेम, संवेदनशीलता, वेगळेपणा, सर्वोत्तम लेखन कौशल्य शब्दातीत आहे. निसर्गाचे वर्णन  किती  वेगळेपणाने गझलेतून मांडता  येते  हे चंदनाच्या  गझल वाचल्यावर  लक्षात येते.  या संग्रहात  पयोधर, ओठांगुणी, लांघून यासारख्या  शब्दांचा वापर केलेला आढळून येतो.  गुलमोहर मोहरेल हा शब्द गझलेत पुर्णपणे बसवायचा होता  पण न बसल्याने या शब्दांची संधी करून  "गुलमोहरेल" हा नवीन शब्द तयार कसा झाला हे गप्पांच्या ओघात तिच्या तोंडून छान वाटले, दुर्दुःख, सुमनपाखरू यांसारखे काही नवीन शब्दही आढळतात. संग्रहातील गझल असो वा मुक्तछंद त्यांची लय नकळत वाचकांच्या मनात /ह्रदयात झिरपते. यातील काही गझला संकेत नागपूरकर यांनी  संगीतबद्ध केल्या आहेत ही आपल्यासाठी अत्यानंदाची बाब...     

          संग्रहातील  सर्वच  गझल अप्रतिम आणि उल्लेखनीय आहेत. ओघवत्या भाषेतील मुक्तछंदही सुंदर आणि दखलपात्र आहेत. शेवटी असणारी  एकच खट्याळ  लावणी भाव खाऊन जाते. अनेक पुरस्कारांसाठी दखलपात्र  ठरलेला हा काव्यसंग्रह  वाचकांच्या  पसंतीस उतरला नाही तर नवलच........   

    एकुणच प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच हा काव्यसंग्रह आहे. कवयित्रीच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून अशाच दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी व उत्तरोत्तर आपल्या यशाचा आलेख चढता असावा या सदिच्छासह...........!!!💐💐

   संग्रहातील  मला भावलेल्या काही गझल व मुक्तछंद म्हणजे..............      

 *गझल*                                                  

    1) निवास माझा -

गझल म्हणाली मला चंदना

तुझ्यात आहे निवास माझा

    2) सुध्दा  वाटतो आता  नकोसा......   

ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे 

पद्मिनी जोहार सुद्धा वाटतो आता नकोसा 

    3) कोंडमारा  :-

जिथे फास घेतोस कृषका अरे त्या

तरूंच्या मनांचा किती कोंडमारा      

  *कविता* :- हिशोब, बेहिशोब ,प्रश्नचिन्ह, स्त्री तुझी अजब कहाणी, मैत्री, इत्यादी इत्यादी इत्यादी.........

            💐💐💐💐💐💐💐                       

शब्दांकन:- ✍ सौ. वनिता कोराटकर 

Friday, 10 November 2023

मराठी गझल - मरणाचा होणार सोहळा

  
     मराठी गझल - मरणाचा होणार सोहळा...

मरणाचा होणार सोहळा फार फार तर
असेल माझा जन्म वेगळा फार फार तर

रंग लागला या देहाचा त्या देहाला..
राधेलाही रंग सावळा फार फार तर

एकच असते गोष्ट नव्याने सांगत सुटतो
दारापुढचा एक भोपळा फार फार तर

उलटी गंगा वाहत आहे...हेच सांगण्या
एक पराचा हवा कावळा फार फार तर

हेही माझे... तेही माझे... सारे माझे
जन्मभराचा सोस पांगळा फार फार तर

नातू होतो त्यानंतर मग पणतू साठी
पुन्हा गुंततो पाय मोकळा फार फार तर

जन्म देऊन मृत्यू साठी जो अडकवतो 
तोच लावतो इथे सापळा फार फार तर

चंदना सोमाणी ©®

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...