सुगंधी - चंदनाची फुले...
रसग्रहण - ऄ. के. शेख
पुण्याच्या प्रसिद्ध कवियत्री चंदना सोमनाथ सोमाणी यांचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह 'चंदनाची फुले' आज आपल्याकडे आला आहे. या कवितासंग्रहात काही कविता मुक्तछंदात काही गेय तर काही गजलाही आहेत. सुरवातीलाच त्या म्हणतात-
चांदण्यांच्या घरी चंदनाची फुले
चंदनाच्या परी चंदनाची फुले
या संग्रहात तुम्हाला चंदन, चांदण्या, चंद्र, कोजागिरी, कळ्या, फुले, ज्योत, गंध, रातराणी, सांजवारा, कंकण, तारका, कवडसा, पारिजात, श्रावण, पौर्णिमा, अशा फुलांसारख्या अगणित शब्दांची रेलचेल आढळेल व नवनवीन शब्दही तुम्हाला भेटतील. पाहा...
गुलमोहरेल बघ तू सोसून झळ उन्हाची
आता तुझ्या विना मी शोधू कुठे निवारा
अशा छान छान शब्दांची, आशय, विषय, आणि फुलांची पखरण पुस्तकभर आहे. लोकप्रिय गझलकार म. भा. चव्हाण उर्फ म. भा. म्हणतात-
चांदण्यांने धाडलेले पत्र आहे चंदना
हासणारे लाडके नक्षत्र आहे चंदना
कवीची स्वभाव वैशिष्टे, त्याच्या व्यासंग, बहुश्रुतता, काव्यप्रवृती इ. चा परिचय त्यांच्या काव्यातून होत असतो. चंदनाचे जीवन, भावना तिच्या विचारांनी समृध्द आहे. त्यांची कविता अंतर्मुखतेकडे वळते आणि ती आत्मप्रत्यातून आलेली दिसते. शब्दांवर त्यांचे प्रेम आहे. पाहा...
भावना व्यक्त करायला लागतात शब्द
अल्लाहकी इबादतकी तरह पाक असतात हे शब्द
जीवनाविषयीची श्रद्धा, उत्कटता आणि निष्ठा यातून त्यांची कविता अद्भूत झाली आहे. त्यांच्या कवितेतील शब्द म्हणजे पारिजातकाच्या फुलांचा सडाच. पाहा...
आभाळाची शाल पांघरुनी अलगद कुशीत शिरावे
अलगद कुशीत शिरता मन चांदण चांदण व्हावे
संग्रह इतका देखणा आहे की त्याचा कागद, मुखपृष्ट, बांधणी, छपाई सर्वच दृष्टीने उत्कृष्ट..
चंदनाने हा शब्दांच्या पारिजातकाचा सडा आता गजलेसाठी घालावा. स्वागत आणि शुभेच्छा...
ऄ. के. शेख
9869202650
जेव्हा अशा उंचीवरच्या माणसांची कौतुकांची फुले आपल्या झोळीत पडतात...बोलायला शब्द उरतातच कुठे...मनापासून धन्यवाद सर...
तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे माझे पुढचे पुस्तक फक्त गझलेचेच असेल....


No comments:
Post a Comment