Followers

Thursday, 9 November 2023

चंदनाची फुले - रसग्रहण - 4

      दरवळणारी चंदनाची फुले -


रसग्रहण - किरण पिंपळशेंडे 

'चंदनाची फुले' गझल आणि कवितांचा सुरेख संगम म्हणजे लेखिका, कवयित्री तसेच गझलकारा सौ. चंदना सोमनाथ सोमाणी यांचा काव्यसंग्रह. सर्वप्रथम आकर्षक मुखपृष्ठ बघताक्षणीच त्याच्या प्रेमात पडावे असेच, दुरवर पसरलेली फुले म्हणजेच तिच्या शब्दांचा प्रतिबिंबित दरवळच जणू. प्रथमदर्शनीच मनोगतातील तिच्या मनातल्या शब्दांनी माझ्या मनाला मोहिनी घातली. आणि ती म्हणते मी फक्त लिहिते आणि मी म्हणते तुला फक्त वाचते. 
अनुबंधापासून ते शेवटपर्यंत एक एक शब्द वेड लावणारे. 

पाकळी पाकळी शब्दवेडी कळी
सांडते शायरी चंदनाची फुले...! 

शब्दा शब्दातून कवयित्री चे शब्दवेड दाखवून देणारा हा शेर विषेश आवडला .....

आजकालच्या कोरड्या मनाची भावना दर्शवणारा हा शेर 

उमाळा कसा ना फुटे या जिवाला
किती कोरडा हा नदीचा किनारा...!

माणूस माणसाचा ही कल्पनाच किती भारी आहे ना कवयित्री च्या मते 

माणूस माणसाचा का हे कुणा कळेना 
संकल्पना सुखाची सोपीच पण रुजेना...!

एवढी सोपी सुखाची संकल्पना हे सांगणारा हा शेर मनाला भावून जातो ...

आपले दुःख आपल्यापुरतेच सिमीत असते ते कुणालाही सांगुन उपयोग नाही

विवंचना ही कुणास सांगू
माझ्या पुरता समास माझा...!

ह्या शेरातील भाव हेच सांगून जातात.

क्षणाक्षणाला माणसाचे रंग कसे आणि केव्हा बदलतात हे तर किती चपखलपणे लिहीलेल्या 'रंग माणसाचे' ह्या गझलेत तर.....  
हळव्या भावना.... पुन्हा पावसाळा....पाऊसवेडा थेंब...तुझी आठवण... यातुन मनातल्या हळव्या भावना अलगद उलगडत जातात. 

जिंदगी ही प्रत्येकाची वेगवेगळी असली तरी ती जगावीच लागते मग ती कशीही असली तरी...पण त्यातले चढ उतार दर्शवणारी गझल अख्खी जिंदगीच व्यापून टाकते आणि चढ उतार असतानाही गझलकारा म्हणते की, मुरलेल्या लोणच्याच्या खारे सारखी तिला जिंदगी चवदार वाटते तोच हा शेर....

जीवनाला बनवतो चवदार हा
लोणच्याचा खार आहे जिंदगी...!

अख्खा जिंदगीचा सार ज्यात उतरला ती साकार जिंदगी गझलकारा स्वतःलाच दाखवताना हा मक्त्याचा शेर आपल्याला ही जिंदगी दाखवतो....

सार हा घे जीवनाचा 'चंदना'
बघ कशी साकार आहे जिंदगी...!
 
स्त्री मनाची खंत दाखवणारी 'तरी जन्म हासला' ही गझल मनाला भेदून जाते 

जरी श्वास थांबला कुणी ना विचारले
तरी चंदनापरी उभा जन्म घासला...!

किती विवंचना ही स्त्री जन्माची

मक्त्याचे शेर फार कमी लिहीलेत पण जे लिहिले आहे ते समर्थपणे पेलले आहे. 

सुद्धा वाटतो आता नकोसा, लेखणीचा रंग, चांदणे उतरून आले, फारसे....तसेच कोंडमारा हा फक्त मनाचाच होत नसतो तर तो कळ्या फुलांचा, पावलांचा, दिशांचा, झाडांचा, आरशाचा, जाणिवा नेणिवांचा आणि आसवांचा ही होतो सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीचा कोंडमारा अधोरेखित झाला आहे. 
ह्या सारख्या सामाजिक गझला आशयबद्ध शब्दात लिहिल्या आहेत त्यांच्या प्रत्येक गझलेवर काय आणि किती लिहावे कमीच आहे. 

हासणारी पाहिली की अंबरी ताराफुले
वाटते केली कुणी ही साखरेची पेरणी

अहाहा... किती गोड आहे हा शेर जणू काही साखरेचीच पेरणी केल्या सारखे...... 

चांगली वाईट आठवण प्रत्येकाच्या आयुष्यात असते परंतू त्या आठवणी निसर्गाला धरून अतिशय सुरेख हळव्या भावनेतून गुंफल्या आहे  'तुझी आठवण'
गझलेत ......निसर्गाला काव्यात गुंफून शब्दबद्ध करण्यात तर निसर्ग कन्येचा हातखंडाच आहे, निसर्गाने जणू काही वरदानच दिले आहे कवयित्रीला. म्हणूनच त्यांची लेखनशैली निराळी आहे. 
'जराशी निराळी ' ह्या गझलेतील ओळी प्रमाणेच...

दिला जन्म हा मज नवा लेखणीने 
कथा गुंफली मी जराशी निराळी...!

कुणास ठावुक, काही केल्या, प्रश्न आयुष्याचे, ह्या सारख्या विचार करायला भाग पाडणाऱ्या गझल तेवढ्याच ताकदीने दमदार शब्दात लिहिल्या आहेत. 
आयुष्यात अनेक प्रश्न सर्वांनाच पडतात पण कवियित्रीला प्रश्न आयुष्याचे पडले आहे आणि तेही मानवी मनाचे...

मृत्यू सोबत जन्म घेतला धावत होते तरी निरंतर
दोनच क्षण ते जपता जपता आयुष्याचे लक्तर होते...!

जितकी गझलेने मनाला भुरळ घातली तितकीच कविताही मनाला स्पर्शून जाते. मुक्तछंद वाचताना वाचतच राहावेसे वाटते अगदी सुरवातीपासून ते शेवटपर्यंत सर्वच. मनाला खोल खोल भिडणारे 
स्रियांवरील अत्याचारांवर व्यक्त होताना, मी शिकलेच नसते तर हा प्रश्न 'माझीच दशा आणि वाचायला मीच' ही आपण शिकल्याची खंत दर्शवणारा आहे. 
I Love words शब्दांवरचे प्रेम दाखविणारी इंग्रजी, मराठी, हिंदी ह्या तीन भाषेचा संगम घडवणारी कविता तर.... 
?... चिन्हावर स्त्री चे अस्तित्व अधोरेखित करणारी कविता, मी पाठवलेले पत्र, इच्छा, सांजवेळ, मैत्री, ह्यासारखे मुक्तछंद सोबतच मधेच एखादी अष्टाक्षरी, दशाक्षरी मधेच एखादी लावणीही डोकावते. एकच लावणी पण ठसकेबाज.... वाचताक्षणीच जीव जडावा अशीच....
समर्पित ही ओंजळीतील भावफुले रसिकांना अर्पण केली आहे. 

शब्दांवरची माया
पुस्तकाची छाया
उजळून निघाली
चंदनाची काया

खरंच अशीच आहे चंदना सतत शब्दांत रमणारी, जे लिहीते ते अगदी मनापासून आणि बहुतेक म्हणूनच शब्दही टाकतात तिच्या ओंजळीत नक्षत्राचे दान भरभरून.... एक मैत्रीण म्हणून नाही तर एक वाचक म्हणून ती मला आधी आवडते आणि म्हणून मला पडलेला प्रश्न आहे, चंदनाची गझल का गझल चंदनाची...?

कवितासंग्रह एकंदरीतच वाचनीय आणि संग्रही ठेवण्याजोगाच आहे. मला तर आवडलाच पण सर्वांनाच आवडेल ही खात्रीच तसेच...

                 चांदण्याने धाडलेले पत्र आहे चंदना
               हासणारे, लाडके नक्षत्र आहे चंदना...!

असंच जिच्यासाठी म्हणावसं वाटतं, हीच ती चंदना आणि ही 'चंदनाची फुले'
चंदनाची फुले हे म. भा चव्हाण सरांनी दिलेलं पुस्तकाचं नाव व त्यांनी तिच्यासाठी लिहिलेल्या  मलपृष्ठावरील या ओळी किती सार्थ आहे याचा प्रत्यय आतील गझल असो वा कविता वा मुक्तछंद वाचताना वेळोवेळी येत जातो...
पुढील लेखन प्रवास असाच शब्द सुगंधाने बहरत राहो फुलत राहो हीच सदिच्छा.... 

सौ. किरण पिंपळशेंडे 🙏🏻


No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...