Followers

Thursday, 9 November 2023

चंदनाची फुले - रसग्रहण - 6

प्रतिभेचं आणि अलंकारिक शब्दसौंदर्याचं प्रतिबिंब 

 
रसग्रहण - राजू गारमाडे 

प्रतिभेचं आणि अलंकारिक शब्दसौंदर्याचं प्रतिबिंब पडलेलं चंदनाची फुले कविता आणि गजल संग्रह प्रतिभावंत कवयित्री, लेखिका चंदना सोमनाथ सोमाणी { पुणे } यांनी लिहिलेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये कवितांचा आणि गजलचा सुंदर असा भावअविष्कार वाचकांना अनुभवयाला मिळतो . मी हा काव्यसंग्रह नुकताच वाचला. काव्यसंग्रहामधील कविता आणि गजल वाचून कवियित्रीच्या प्रतिभेची,सखोल अशी निरीक्षणाची, दुरदृष्टीची आणि शब्दांवरील प्रेमाची वाचकांना अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
कवियिञीनी मनोगतामध्ये लिहिलंय, मी फक्त लिहिते.शब्द शब्द जोडता जोडता अनेक नाती जुळत गेली.
कवियित्रीचं हे मनोगत वाचून शब्दावर भरभरून प्रेम करणारी शब्दवेडी कवियिञी अस वाचकांच्या मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही.
शिवाय,कवितासंग्रहाचं मुखपृष्ठही सुंदर आणि मनोवेधक झालेलं आहे.पाण्यात तरंगणारी तेजोमय फुलांची आरास. फुले आपल्याला सुगंधमय करून टाकत असतात. वातावरण दरवळून टाकत असतात. तर तिमिरातून प्रकाशाकडे नेणारी ही ज्योत आपलं मानवी जीवन तेजोमय करून टाकीत असतात. कविता आणि गजल वाचता वाचता आपणही अगदी नकळतपणे शब्दांच्या विश्वामध्ये रमून जातो आणि कविताही आपल्याशी संवाद साधू लागतात.
चंदनाची फुले म्हणजेच भावनांच, विचारांच सुंदर असं रूप आहे. विविध विषयांना स्पर्श करणारी कविता आणि गजल आपल्याही आणि आपल्या जीवनालाही वैचारिकतेने समृद्ध करुन जाते. लिहिलेली प्रत्येक ओळ भावना आणि आशय यांनी परिपुर्ण आहे. शब्दांना सजवून साजश्रृंगारीत करून भावनेची जोड देऊन कवियित्रीनी कवितांना वाचकांसमोर ठेवलेले आहे. एकुण ५७ कविता आणि गजल या काव्यसंग्रहामध्ये आहे.
आपल्या पहिल्याच कवितेत त्या लिहितात,

चांदण्यांच्या घरी चंदनाची फुले
चंदनाच्या परी चंदनाची फुले 

या ओळींमधुन कवियित्रीला हेच सुचवायचं आहे की, या जगामध्ये जे जे चांगल आहे, उदात्त आहे, शाश्वत आहे ते ते निरंतर टिकून राहणार आहे. याच मुळे मानवी मुल्य आणि विचारांना महत्व आहे.ज्याप्रकारे नभमंडळ चांदण्यांनी सुशोभित दिसत असते त्याचप्रकारे कवियित्रीलाही आपल जीवन या चंदनाची फुले या काव्यसंग्रहानी उजळून निघालेले आहे अस वाटत आहे.
अक्षरांचा लळा या कवितेत त्या लिहितात 

असा अक्षरांचा लळा चंदनाला 
जसा व्यापतो अर्थ आकाश सारा

शब्दांच वैभव आणि श्रीमंती लाभलेल्या कवियित्रीला शब्द हेच सर्वस्व आहे आणि याच शब्दांनी आपल्याला एक ओळख मिळालेली आहे ही मनोमन भावना मनी वसलेली आहे.आकाश जस अवघ्या सृष्टीला व्यापुन टाकत असते त्याचप्रकारे याच शब्दांनी आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त झालेला आहे अस कवियित्रीला या ओळींमधून सुचवायचे आहे.
शब्दमैफील या कवितेत त्या लिहितात,

तुझी आठवण गंध माळून यावी
जशी रातराणी फुलारून यावी
            किंवा 
अशी चंदनाने लिहावी गझल की
जशी स्वप्न कक्षेस लांघून यावी 

अगदी सांजवेळी सुखद अशा गार वातावरणामध्ये रातराणी फुलारून यावी त्याचप्रकारे तुझ्याही आठवणी मनामध्ये दरवळत याव्या आणि शरीराचा कण नी कण मोहरून यावा, गंधाळून यावा अस या ओळींमधून कवियित्रीला सुचवायचे आहे.
मानवी जीवनप्रवृत्तीवर भाष्य करताना रंग माणसाचे या गझल मध्ये त्या लिहितात,

चुटकीसरशी रंग बदलतो
तो जगण्याचे ढंग बदलतो

माणूस आपल्या स्वार्थासाठी आपले विचार, आचार आणि नीती बदलवित असतो आणि आपलंच कसं भलं झालं पाहिजे यांचाच विचार तो करीत असतो.
त्यांच्या सर्वच कविता वाचनीय झालेल्या आहेत. आपल्यालाही त्या विचार करायला भाग पाडतात. आपलं अनुभव विश्व विस्तारून टाकतात.
काही कवितांचा उल्लेख करावासा झाल्यास लेखनीचा रंग, कुणास ठाऊक, प्रश्न आयुष्याचे, मनातील सल, क्षण, स्ञी तुझी अजब कहाणी, इच्छा, ओंजळीतील भावफुले या कविता आपल्या भावरूपी विचारांना विचार करण्यास बाध्य करतात.
म.भा.चव्हाण सरांनी कवियित्रीबद्दल किती सुंदर लिहिलंय,

चांदण्यांने धाडलेले पत्र आहे चंदना
हासणारे लाडके नक्षत्र आहे चंदना...!

असा हा सुंदर,भावस्पर्शी,वाचनीय असा काव्यसंग्रह आपल्या संग्रही असावा.हा काव्यसंग्रह तुमच्या विचारांना,भावनांना आणि जगण्याच्या पद्धतीलाही बदलवून टाकेल. वाचकवर्गानी या काव्यसंग्रहाचं भरभरून स्वागत केलेले आहे.
खर तर,तुमच्या चंदनाची फुले या काव्यसंग्रहाचा दरवळ आमच्यापर्यंतच काय सगळीकडे पोहोचलेला आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचण्याची उत्सुकता मला होतीच. त्यामुळेच मी हा काव्यसंग्रह तुमच्याकडून मागवून घेतला. या काव्यसंग्रहामधील कविता आणि गजल वाचुन मी धन्य झालो. तुमची प्रतिभा आणि तुमच्या सर्जनशीलतेचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच.
मानवी जीवन, नातेसंबंध, मानवी प्रवृत्ती आणि विचारधारा, व्यथा, वेदना, सुख दुःख यावरही तुम्ही छान लिहिले आहे. त्यामुळेच सामान्य वाचकही या काव्यसंग्रहाकडे आकर्षित झाला असल्यास नवल वाटणार नाही. एक चांगला, दर्जेदार काव्यसंग्रह वाचण्याचे समाधान मिळालं ते वेगळंच. मानवी जीवनाच्या आशा, आंकाक्षाचं प्रतिबिंब पडलेल आणि तुमच्या कल्पकतेनी आणि प्रगल्भतेनी, कल्पनाशक्तीनी हा काव्यसंग्रह आणखीनच सुंदर आणि वाचनीय झालेला आहे.
धन्यवाद चंदनाजी एक चांगला आणि वाचनीय काव्यसंग्रह तुमच्या लेखणीतून, विचारातून साकारल्याबद्दल. 
पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेछा. हा स्नेह, लोभ असाच वृद्धींगत होत जावो हीच मनोकामना.
कवियिञी चंदनाजींचे मी सुंदर असा काव्यसंग्रह लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेछा व्यक्त करतो.

राजू गारमाडे 🙏🏻
काव्यसंग्रह : चंदनाची फुले
कवियित्री : चंदना सोमनाथ सोमाणी
प्रथम आवृत्ती : डिसेंबर २०१८
प्रकाशक : पृथ्वीराज प्रकाशन पुणे
पृष्ठे : ८०
मुल्य : ₹ १५०

No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...