लहान पण देगा देवा.....
भाद्रपद महिना लागला की बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागते. गणपती उत्सव म्हटले की मनाचे पाखरू उडतच बालपणात जाते. बाप्पाच्या ज्या आठवणी तिथे विराजमान असतात ना त्या पुसणे केवळ अशक्यच, त्या तिथेच निरागसपणे वाट पाहत असतात, आपल्या मनाच्या एका कोपऱ्यातून, असंख्य आठवणीच्या कवडश्यातून आजमधे डोकावत..
आजही मला आत्ता पेक्षा लहान असतानाचे ते गणेश उत्सवाचे १० दिवस आठवतात, आकर्षित करतात.. तिथेच गुंतवून ठेवतात. आत्ता पेक्षा मनाचे पावित्र्य हे बालपणी जास्त असते, भावना निरागस असतात. सोवळे असण्यापेक्षा श्रध्दा अपार असते. ते भावच वेगळे असतात....
माझ्या लहानपणी आमच्या घरी गणपती बसवत नसायचे, काही कारणास्तव....
पण गणपतीची ती व्रक सोंड व रेखीव, सुंदर, बोलके डोळे आम्हा भावंडांना भुरळ पाडायचे. आम्ही भावंडे प्रेमात पडायचो बाप्पाच्या त्या रूपाच्या. त्यामुळे त्या प्रेमापोटी आम्ही भावंडे मात्र गणेश चतुर्थीच्या दिवशी एक प्लास्टिकचा गणपती विकत आणायचो अर्थातच खाऊसाठी मिळालेल्या पैशातून. अंगणापासून ते घरापर्यंत वाजतगाजत आणायचो आणि वाजतगाजत म्हणजे काय तर ताट व चमचा हाच आमचा ढोल ताशा असायचा मात्र भन्नाट मजा यायची. मग सजावटीसाठी घरातील खेळणी असायचीच. शिवाय माती, वाळू आणून डोंगर किंवा किल्ला बनवायचा व त्या वर खेळण्यातील पाट, लाल-हिरव्या रेबीन वापरून छान सजवून बाप्पाला विराजमान करायचो. आजूबाजूच्या झाडा-वेलींची फुले आणणे, हार बनवणे, आरती करणे ह्या कार्यात कधी १० दिवस निघून जायचे ते कळायचे देखील नाही. खरच हौसेला मोल नसते...
पण ज्या दिवशी विसर्जनाची घटिका जवळ यायची त्या दिवशी काळजाचा ठोका चुकायचा. जड अंतःकरणाने अश्रू भरलेल्या नेत्रांनी घराजवळच असलेल्या विहीरीत बाप्पाचे विसर्जन करायचो. पण नंतरचे 2-3 दिवस करमायचे नाही.
आज आपण मोठे झाल्यावर गणपती बसवतो भाव भक्तीने आरती करतो, मोदक करतो, पंचपकवान्नाचा भोग दाखवतो, दुर्वा, आघाडा, कमळ, केवडा अगदी सगळी पत्री आणून अर्पण करतो, फुलवाती सुध्दा अगदी शुध्द तुपातील....पण हे सगळे करतांना भक्तीपेक्षा कर्तव्य जास्त जाणवते बालपणीची ती भावनामय भक्ती कुठेतरी हरवलीय, बदललीय असे जाणवते...
सगळीच पुजा अर्चा सोवळ्यात करूनही ती बालपणीची भक्ती मनाला आजही खूप सुखावून जाते...आजही मी हे लिहताना ते बालपण पुन्हा एकदा जगले असे वाटून त्या निरागस भक्तीत डोळ्याच्या कडा ओलावल्या...
त्याच बालपणीच्या निरागस भक्तीने बाप्पाकडे पाहताना बालपण डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे झरझर चितरले. आणि पुन्हा थोड्यावेळापुरते का असेना पण बालपण जगून घेतले, खूप खूप छान वाटले हे लिहितांना आणि ते बालपण आठवणींच्या रूपाने पुन्हा एकदा जगतांना ......
चंदना सोमाणी पुणे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:
Post a Comment