Followers

Thursday, 9 November 2023

मराठी गझल आणि रसग्रहण - गेला कुठे फुलांचा

            गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण तिराणकर

 मराठी गझल - गेला कुठे फुलांचा 

गेला कुठे फुलांचा बहर हा
अद्याप का रिकामा मखर हा

मी पाहिलेच नाही परंतू
आला तसाच गेला प्रहर हा

ठेवू कशात आता फुलांना
जर फाटका निघाला पदर हा

झाल्यात भावना ही अनावर
वाटे हवाहवासा असर हा

आभाळ टेकलेले छताला
दारात पावसाचा कहर हा

शोधू कुठे तुला रातराणी
डोळ्यासमोर माझ्या तगर हा

चंदना सोमाणी ©®

चंदना जी ! रसिक वाचक हा त्रयस्थ प्रेक्षक असतो.आदरणीय राम शेवाळकर सर नेहमी म्हणायचे की रसिक हा मुका कवी नि कवी हा मुका रसिक असतो,ते खरेच आहे.गजलकारा म्हणून तुम्ही नेहमीच मधुगंधाळ लिहीता.तरल नि नितळ तरीही व्यामिश्र भावनांची मुक्त उधळण,लयबद्ध पखरण वाचक रसिकांना मोहवून टाकते. हे तुम्हाला लाभलेले निसर्गदत्त वरदान
तुमच्या प्राणकोषात गंधाळत तुमचे अंगभूत गुणवैशिष्ट्य बनून तुमच्या तरल भावनाविष्कारात फुलातील गंधासारखं अद्वैत धारण करतं. आम्ही वाचक रसिक अनुभवतो तो फुलाचा सुगंध.फुलातील पराग कणांचे भौमितिक रंगबावरे वैविध्य,पण ती रचना लिहीतांना तुमचा तो भावसमाधीचा तरलतम फार थोडा काल असतो तो निसर्गाशी तादात्म्य पावलेला असतो,तुमच्या बाबतीत तरी.
            तुमच्या गजलांच्या गंधकोषातील वेदना-संवेदनांचा पट निश्चितपणे निराळा असणार,पण एक रसिक वाचक म्हणून मी जे लिहीणार आहे ते तुमच्या तरल संकल्पनांहून वेगळे वाटले तरी नाराज होऊ नका,कारण आपण सर्जक आहात,तुमच्या मनातील अन्वयार्थापर्यंत पोहचणे कसे जमणार ? तरीही एक तोकडा प्रयत्न करतो.
            चंदना जी ! आपण निसर्गकन्या आहात.परीसारखं सुगंधी फुलांच्या ताटव्यावरून हळुवार झुळूके सारखं अलवार विहरत प्राणकोषाच्या रंध्रात गंध संप्रेषित करण्याचं कसब नियतीने दान स्वरुपात तुमच्या पदरात टाकलं.
            स्रुष्टीतलं सौंदर्य हे तुमचे निधान,अनोखे संचित.धरेचं ओकेबोकेपण हा तुमच्या नावडीचा विषय.अवघी अवनी नित-निरंतर रंगगंधभारलीच असावी हे तुमचं भारावलेपणअवनीचा मखर नित सजलेलाच असावा ही गोड प्राणांतिक अभिप्सा तुमच्या अंगावर अस्वस्थ शहारा आणते नि तुमची प्रतिभा झरते नि शब्द पाझरते...
गेला कुठे फुलांचा बहर हा
अद्याप का रिकामा मखर हा
            मुठीतील वाळूचे कण सरसर झरझर झरावेत नि काही क्षणात मुठ रिकामी व्हावी तसा काळाचा एकेक क्षण माणसाच्या हातून निसटत जातो.एक भानातीत अवस्था प्राप्त होते नि मग आलेले ,गेलेले क्षणही कालातीत विस्म्रुतीत जातात नि नाईलाजाने शब्द उमटतात.....
मी पाहिलेच नाही परंतू
आला तसाच गेला प्रहर हा
           माणसाच्या आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते की नियती आपल्याला हवं ते अलगद आपल्या पदरात टाकायला हात पुढे करते,नेमका त्यावेळी आपला पदर फाटका निघतो.
ठेवू कशात आता फुलांना
जर फाटका निघाला पदर हा
        भावनांचा कोंंडमारा संपावा नि भावना अनावर व्हाव्यात ते लडिवाळ क्षण हवेहवेसे वाटतात हा कशाचा प्रभाव असावा !
          आभाळ नि आपणात असणारा क्षितीजाचा अडसर सारून आभाळ आपल्या घराच्या छताला येऊन टेकतं.
रात्रभर रातवा बरसत राहतो.दार पावसाचा कहर अनुभवतं.
          आपल्याला जे हवं असतं तेच नेमकं मिळत नाही वा मिळालं तरी निसटून जातं.एखाद्या हव्याहव्याशा गोष्टीचा शोध घ्यायचा मनाला ध्यास लागतो.मात्र पुढ्यात
ठाकलेलं असतं अवांछित प्राक्तन.या अन्वयार्थाने आपण लिहीलं असावं....
शोधू कुठे तुला रातराणी
डोळ्यासमोर माझ्या तगर हा
      माणसाच्या आयुष्यातील घटीत अघटितांचं प्रतिभेच्या परिप्रेक्ष्याातून संवेदनशिल निरीक्षण नि तदनुषंगाने आरोपीत लाक्षनिक भावनांचे आविष्करण मग अशा गंधाळ गजलांना जन्म देते.तसा गजलेचा रंगगंध बावरा निवारा आपणच तर आहात.
आमेन. शुभ आशिष ! आमच्या सारख्या रसिकांच्या
काव्य त्रुष्णेसाठी निरंतर लिहीत रहा....

बाळकृष्ण तिराणकर 🙏🏻🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



No comments:

Post a Comment

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...