गझलचे रसग्रहण - विजय बिंदोड
| मराठी गझल - निःश्वास पाकळ्यांचा |
निश्वास पाकळ्यांचा कळलाच ना कधी
अन् हुंदका फुलांना फुटलाच ना कधी
राधेत पाहिला अन् मीरेत पाहिला
पण भाव रुक्मिणीचा दिसलाच ना कधी
निवडू नकोस आता तू रंग वेगळा
जो रंग ओळखीचा विरलाच ना कधी
चकव्यात अडखळे का पाऊल हे पुन्हा
येऊन जर ठिकाणा वळलाच ना कधी
देऊ कसा पुरावा अन् कोणता तुला
जर चंद्र पौर्णिमेचा हसलाच ना कधी
ओवी मधून सजला जो केशरी टिळा
तो गंध चंदनाचा लपलाच ना कधी
चंदना सोमाणी ©®
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
प्रख्यात गझलकारा मान.चंदना सोमाणीजी यांच्या "निश्वास पाकळ्यांचा"
या गझलेचे रसग्रहण ----------------------
माझ्या सर्व गझल प्रेमी साधक साहित्यिकांनो...सप्रेम नमस्कार 🙏
मी गझलेच्या बालवाडीतला विद्यार्थी. या नात्याने मला एवढ्या गझल पारंगत साधकाच्या गझलेवर लिहिणे म्हणजे सुर्याला दिवा दाखविण्या सारखं हास्यास्पद काम वाटते.
मागील एक वर्षांपासून मी मान.विजय जोशी सर आणि आद.उर्मिला माई यांच्याकडे गझलेचं ग,म,भ,न...शिकत आहो...
सदर गझलेवर मन लिहिण्यासाठी अस्वस्थ झालं म्हणून हा शब्द प्रपंच मांडतो..सदर विद्युल्लता वृत्तातल्या गझलेत एक आर्त रीक्ततेचा भाव सर्वच शेरांमधून जाणवतो. आशेच्या किरणांची एक चुणूक दिसतांना अंधार व्हावा.हे अपेक्षाभंगाचे भाव घेऊन सर्व शेर गझलेत उतरलेत.
गझलेत गुंफलेले सर्व कवाफी हे सुट घेऊन चपखल वापरलेले आहेत.
निःश्वास पाकळ्यांचा कळलाच ना कधी
अन् हुंदका फुलांना फुटलाच ना कधी
..या शेरात शायरा चंदनाजींनी स्त्री मन आणि पुरूष मन यांच्या भावनांमधील अव्यक्त द्वंद्व मांडलेले आहे असं मला वाटते.स्त्री मनाच्या पाकळ्याचं आर्त पण हळूवार दुःख पुरूष मनाच्या फुलाला कळलं नाही.आणि त्याचा आवेगही एवढा नाही की फुलाला हुंदका फुटून ते घायाळ, दुःखी होईल. किंवा मुलांच्या/मुलीच्या मनातील खंत,दुःख आईला तेवढ्याच तीव्रतेने कळलेच नाही. असाही संदर्भ गझलकारानी घेतला असू शकते. पण इथे एकाने दुस-या आपल्याचे दुःख समजून घेऊ शकला नाही. हेच नाजूक, तरल अंतर्गत दुःख या शेरात मांडलेले दिसते. किती खोल आणि आशय गर्भ मांडणी केली आहे...
आलेत मेघ काळे तेही अधांतरी
पाऊस मोसमाचा पडलाच ना कधी
माणूस घडणा-या घटना किंवा आपली माणसे यांचे कडून काही अपेक्षा करीत असतोच. परंतु त्यावेळी पुढ्यात येणारी परिस्थिती ही अनपेक्षितच घडते. जसे शेतकरी मृगाच्या भरून आलेल्या ढगांकडे खूप आशेने बघतो. पण ते बरसतच नाही व अपेक्षाभंगाच दुःख पदरात बांधून देते. हे शाश्वत व प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येणारे दुःख गझलकारानी या बंदिस्त शब्दात मांडले. खूपच सुंदर शेर..
राधेत पाहिला अन् मीरेत पाहिला
पण भाव रूक्मिणीचा दिसलाच ना कधी
ऐतिहासिक रुक्मिनी स्वयंवराचा संदर्भ घेऊन मांडलेल्या या शेरात समर्पणाच्या तिव्रतेतील भाव अधोरेखित केला आहे. राधा,मीरा आणि रुक्मिणी ह्या तिघींचेही कृष्णाप्रती प्रेम समर्पण होते. राधेचं समर्पण श्रीकृष्णाच्या गुणांवर होतं. मीरेचं समर्पण विश्वात्मक कृष्णावर होत तर रुक्मिणीचे समर्पण कृष्ण ही व्यक्तीमत्व म्हणून होत. परंतु प्रत्येकीच्या समर्पणाचा भाव,पद्धती आणि तिव्रता यात खूप तफावत होती.समर्पणाच वेगळेपण होतं. या समर्पणाच्या सुक्ष्म व तरल भावनांमधून साकारलेला वाटतो. किती सुक्ष्म भावनांना शब्द रूप दिलं ? हा भव्यत्व धारीत शेर मनाचा कप्पा भारून टाकतो.
निवडू नकोस आता तू रंग वेगळा
जो रंग ओळखीचा विरलाच ना कधी
मानवी प्रवृत्ती, स्वभाव, मनाची जडण घडण ह्या शेरात उकलून पाहण्याचा एक प्रयत्न यातून केला गेला दिसतो....
मानवी मनाला सदोदित नावीन्याची ओढ असते. तेव्हा तो जेव्हा आपल्या मुळ स्वभावात न बसणारं काही करायला जातो, तेव्हा त्यातूनही त्याचं मुख्य व्यक्तीमत्व डोकावतं. तेव्हा गझलकारा या शेरातून एक संदेश देतात, तू वेगळ्या वाटा, वेगळे काही करण्याचा वा स्वभावात नसलेलं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस.कारण तुझा मूळ स्वभाव, स्वरूप, अंतरंग हे अजूनपर्यंत कायम आहेच. ते बदलणार नाहीच.खूप अर्थ गर्भ शेर...
चकव्यात अडखळे का पाऊल हे पुन्हा
येऊन जर ठिकाणा वळलाच ना कधी
या शेरातून गझलकाराने मानवी अज्ञान,सवयी,वृत्ती यांचा स्थायीभाव मांडला आहे असे भासते.माणसाला कर्तव्य करतांना,प्रयत्न करतांना आपण यशाच्या, धेय्याच्या जवळपास आहोत हे कळते. पण स्वभाव, वृत्ती,अज्ञान यामुळे तो यशप्राप्ती पासून, धेय्यपूर्ती पासून दूर राहतो. अडखळतो, किंवा बरेचदा आपल्या हिताच्या गोष्टी मानसाला कळतात पण आपल्या स्वभाव वश माणूस त्या करण्यास असमर्थ ठरतो.अश्या अव्यक्त व व्यवहारातील प्रत्येकाच्या वाट्याला आलेल्या भावना गझलकारांने मोठ्या खुबीने मांडल्या असे मला वाटते.
देऊ कसा पुरावा अन् कोणता तुला
जर चंद्र पौर्णिमेचा हसलाच ना कधी
या शेरातून गझलकाराने स्वतःचे मन व जग किंवा लोकसमज, जनभावना, गैरसमज यातील अदृश्य संघर्षावर झोत टाकला दिसतो. सर्वत्र पौर्णिमेचे सुखी, आनंदी चांदणे पसरलेले सर्वांनाच दिसते.परतु तो चंद्र माझ्यासाठी हसलाच नाही,मला आनंद, सुख देऊन गेलाच नाही.लोकांचा/तुमचा हा गैरसमज आहे
की मला पौर्णिमेचा चंद्र सुखावून गेला आहे. पण वास्तव असे आहे की तो मला आनंद देऊ शकला नाही.माझ्या पदरात तो आनंदात टाकून गेलाच नाही.तुमचा हा भ्रम कसा दूर करू ? मी याचा कोणता व कसा पुरावा देऊ.? मी पुरावाही देऊ शकत नाही. लोकसमज व स्व मनोवृत्तीतले अदृश्य द्वंद्व येथे खूपच कौशल्याने मांडले आहे असं मला वाटते.
ओवी मधून सजला जो केशरी टिळा
तो गंध चंदनाचा लपलाच ना कधी
ओवी गातांना तल्लीन झालेला भक्त ऐहिकातून थोडा वेळ तरी विरक्ती अनुभवतो. केशरी रंग हे विरक्तीच प्रतीक आहे.आणि हा अनुभव चंदनाच्या सुगंधा सम असतो. हे अढळ सत्य आहे.
आंतरिक आनंद, समृद्धी,सुख हे कुणापासून कितीही लपविले तरी ढगा आडून उगवलेला सूर्य ढगांना झाकताच येत नाही. ते त्याचे स्वयंभू तेज प्रकट होतेच. तसेच मानसिक तृप्तीचा आनंद, समाधान हे लपवता येत नाहीत. हा शाश्वत विचार सदर शेरातून प्रभावी पणे व्यक्त झालेला दिसतो. तसेच गझलकारांनी "चंदना" या शब्दाचा मक्ता म्हणूनही वापर बेमालूम व खूपच कुशलतेने केला आहे....वा..मान गये उस्ताद .
एकंदरीत खूपच आशय संपन्न,भावनांची तरलता व सुक्ष्मता मोजणारी सुंदर गझल गझलकारांच्या लेखणीतून प्रसवली .
माझ्या नवख्या लेखणीतून उतरलेले हे रसग्रहण कितपत योग्य आहे. हे मला नाही माहीत...तरीही एक प्रयत्न केला. तो गोड मानून घ्यावा. धन्यवाद..
आपलाच.
*विजय बिन्दोड*. पांढरकवडा यवतमाळ

कोमेजलेल्या फुलांमध्ये जीव ओतणारी देखणी गझल..... मलिका -ए- गझल.... ❤️😘😘😘🥰🥰🥰🫡🫡🫡🫡🫡
ReplyDeleteरसग्रहण अप्रतिम...👌👌👌