गझलेचे रसग्रहण - रवींद्र सोनवणे
मराठी गझल - या मनाचे त्या मनाला
या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही
जीत होती हार होती काय होते काय सांगू
जिंकणे सोपे खरे तर हारताही येत नाही
कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही
दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला
आतला आईपणा नाकारताही येत नाही
थांबलेला क्षण म्हणाला, कोण आहे यातला तू
हा भला की तो भला हे ताडताही येत नाही
संपले ना पर्व इथले जायचे तर जा अता तू
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही
घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित
वेदना जख्मी मनाच्या मोजताही येत नाही
चंदना सोमाणी, पुणे
आदरणीय गझलकारा सौ.चंदना सोमाणी. एक असं नाव ज्यांनी अल्पावधीतच गझल विश्वात आपलं स्वतःचं एक वलय निर्माण केलेलं आहे. त्यांच्या बहुसंख्य गझला ध्वनिमुद्रित, चित्रफीत मुद्रीत झालेल्या आहेत. त्यांच्या गझलेचे वेगळे पण श्रोत्यांना भावते. त्यांची स्वतःची अशी एक शैली आहे, जिच्यात कुणाच्याही लिखाणाची छाप सापडत नाही. जे काही आहे ते फक्त आणि फक्त चंदना सोमाणीच आहे. हे त्यांच्या गझल लेखनाचे वैशिष्ट्य आहे. खयालांची विविधता आणि मांडणीचे नेमकेपण हे त्यांच्या गझलेचे विशेष गुण आहेत. आज मला त्यांच्या अशाच एका सुंदरशा गझलेचे रसग्रहण करण्याची संधी मिळाली याबद्दल मला आत्मिक आनंद होत आहे. चला तर गझलेच्या रसग्रहणाकडे वळूयात...
गझलेचा मतला बघुयात...
या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही
वरील मतल्याला अनेक पैलू आहेत. मानवी मनाची दोन प्रकारची अभिव्यक्ती असते. एक सुप्त मनाची आणि दुसरी जागरूक मनाची. सुप्त मन आपल्या नकळत काही विशिष्ट घटनांची नोंद करत असते तर जागरुक मन सभोवताली घडणाऱ्या घटनांच्या जाणिवा अधोरेखित करत जात असते. अशावेळी सुप्त मन आणि जागरूक मन यांच्यातल्या प्रसंगांची एकमेकावर प्रभावी संघर्षमय उद्विग्नता आपल्या मनस्थितीवर परिणाम करत असते. आणि या द्वंद्वात होणारी आपली भावनिक घालमेल भावनांचा कोंडमारा आपण कुठेच व्यक्त करू शकत नसतो. ही अव्यक्त घुसमट माणसाला खूप अस्वस्थ करून सोडते. खूपदा जवळची व्यक्ती आपल्या जवळ असते पण तिलाही हा कोंडमारा आणि ही घुसमट आपण सांगू शकत नसतो. अशी काहीशी मनाची अवस्था होऊन जाते. त्या अशा अवस्थेबद्दल वरील मतला अतिशय समर्पकपणे भाष्य करतो.
आता दुसरा शेर बघुयात...
जीत होती हार होती काय होते काय सांगू
जिंकणे सोपे खरे तर हारताही येत नाही
वरील शेर खूप बोलका आहे. खूपदा आपल्याला मनासारखे यश मिळते. पण ते यश साजरे करताना काहीतरी सल मनाला खात असते. नेमका आनंद साजरा करावा की दुःख व्यक्त करावे हेच माणसाला उमजत नसते. कदाचित जो विजय मिळवला गेला आहे तो बहुधा आपल्याच आप्त स्वकियांवर मिळवला गेलेला असेल आणि ज्याच्यामुळे काही सुंदरशी नाती दुरावल्याचे दुःख मनाला खात असेल. अशा वेळी जिंकून सुद्धा हारल्यासारखेच वाटत असते. त्यावेळी आनंद आणि दुःख ह्या दोन्हीही भावना मनाला कोणतंच समाधान देऊ शकत नसतात. जिंकायचे तर असते पण इतर कुणाला हरवणे मनाला मान्य नसते अशा वेळी धड जिंकता सुद्धा येत नाही. हार पत्करायची म्हटल्यावर कुठेतरी अस्तित्वाचा प्रश्न सतावत राहतो अशी ही द्विधा अवस्था, मनाचे मनाशी चालणारे द्वंद वरील शेर सांगतो आहे. कदाचित हा हारजितीचा प्रश्न हा स्वतःशीच स्वतःवर विजय मिळवण्याचा संघर्ष असेल असेही वाटते कारण मनाचे खेळ कुणालाही उलगडणे कठीण असते. यावरून मला एका मराठी गाण्यांच्या ओळी आठवतात.
मागते मन एक काही, दैव दुसरे घडविते
उमलण्या आधी कळीचे, फुल पाई तुडविते
दैव दुसरे घडविते
असेच असते मानवाच्या जीवनाचे. एखादी गोष्ट नशिबात असते परंतु दैवाला काही वेगळेच मंजूर असते. असा हा शक्याशक्यतेचा संघर्ष म्हणजेच वरील शेर आहे.
पुढचा शेर बघुयात...
कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही
वरील शेरा साठी एका हिंदी गाण्यातल्या ओळी अतिशय चपखल बसतात
आनेवाला पल जानेवाला है,
हो सके तो इस्मे जिंदगी बिता दो
पल जो ये जानेवला है !!
जीवनात जे क्षण हातून निसटून जातात ते पुन्हा कितीही मागितले तर कोणालाच ते पुन्हा फिरून लाभत नसतात. जे जगायचे आहे ते आताच ह्याच क्षणात जगायचे आहे. कारण पुन्हा हा क्षण पुन्हा फिरून आयुष्यात कधीच येणारा नसतो. म्हणून जे आहे ते आताच आहे. जे जगायचे आहे ते आताच जगुन घ्या. कारण पुन्हा हे क्षण जगायला मिळणार नाहीयेत. कित्येकदा आयुष्याचा उलटा प्रवास करताना आठवणींच्या जगात सुंदर सुंदरसे क्षण हाताला लागतात. ज्या ठिकाणी मन युगांपासून आजही थांबलेले असते. ते क्षण माणसाला पुन्हा जसेच्या तसे हवे असतात. पण आज ह्या क्षणाला त्या वेळी असलेल्या जवळच्या गोष्टी, व्यक्ती, काळ आणि वास्तवाचे स्वरूप आता पूर्णपणे बदललेले असते. ना तो काळ राहिलेला असतो ना त्या गोष्टी आजच्या घडीला जवळ असतात. असतात फक्त हव्या हव्याशा वाटणाऱ्या त्या जुन्या क्षणातील जगलेल्या आठवणी. पण त्याही कालानुरूप धूसर धूसर होत जाताना दिसत असतात. अशी ही मानवी मनाची खंत वरील शेरातून व्यक्त होताना दिसते.
पुढचा शेर बघुयात...
दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला
आतला आईपणा नाकारताही येत नाही
प्रत्येक पुरुषात दोन अभिव्यक्ती असतात. एक स्त्रीसुलभ भावना आणि दुसरी पुरुषी भावना. ह्या नैसर्गिक जाणिवांना कोणीही अपवाद नसतो. प्रसंगानुरुप प्रत्येक स्त्री पुरुषातील ह्या दोन्ही अभिव्यक्ती होत जातात. वरील शेर दोन गोष्टी इथे सांगतो एक स्त्री मधली आई आणि दुसरी पुरुषाच्या आत असलेल्या स्त्री मनाची ग्वाही. ह्या दोन गोष्टींबद्दल वरील शेर बोलत असतो.
आधी एका स्त्री मना विषयी हा शेर काय सांगतो ते बघुयात, वरील शेरा मध्ये असणारी स्त्री सांगते आहे की मी स्त्री आहे म्हणूनच आज मी आई होऊ शकले आहे. ही माझी नैसर्गिक आई म्हणून जी अनुभूती आहे ही निसर्ग दत्त देणगी आहे. जी मी कितीही नाकारण्याचा प्रयत्न केला तरी ती मी नाकारू शकत नाही. कारण मी एक स्त्री आहे अर्थात मादी आहे म्हणून आज मी आईपणाचे सुख उपभोगू शकते आहे. कदाचित मी मादीच नसती तर ह्या आईपणाच्या भावना मला अनुभवता आल्या नसत्या. म्हणून माझ्यातल्या स्त्रीला आईपण अनुभवायला मिळाले हा मी माझा सन्मानच समजते. तो काही माझा कोणता दोष नाहीये. असा विचार वरील शेर मांडतो.
दुसऱ्या अंगाने विचार केल्यास असे म्हणता येईल की एखादा पुरुष काही अपरिहार्य कारणाने एखाद्या अपत्याचा सांभाळ आई प्रमाणे करत असेल. यात त्यावेळी त्याच्यातील मातृत्व आपोआप जागे होते. त्याच्यातील मातृत्व पुरुषपणावर हावी होऊन नैसर्गिक रित्या त्याच्या मनात त्या बाळा विजयी वात्सल्य, प्रेम, जिव्हाळा, कणव, ओढ आणि अगतिकता आपोआप तीव्रपणे निर्माण होत जाते आणि पुरुषांमधील एका स्त्री मनाचा त्या ठिकाणी उदय होऊन त्याच्याठायी पुरूषतली एक आई जिवंत होते. जी तितक्याच उत्कटतेने त्या बाळावर प्रेम करते जेवढी बाळाला जन्म देणारी एक स्त्री करत असते.
अशा दोन अंगांनी विचार करायला लावणारा हा शेर आहे
पुढचा शेर बघुयात...
थांबलेला क्षण म्हणाला कोण आहे यातला तू
हा भला की तो भला हे ताडताही येत नाही
प्रत्येक क्षणाक्षणाला माणसाच्या मनाची अवस्था बदलत जात असते. ह्या क्षणाला एखादी व्यक्ती जर खूप प्रेमळ वागली असेल तर पुढच्याच क्षणाला हीच व्यक्ती वेगळी वागेल, वेगळीच भासेल. मनाची स्थित्यंतरे ही अनाकलनीय असतात. त्यांचा उलगडा करणे हे एक दिव्यच असते. प्रत्येक क्षणाला माणूस आपलीच वेगळी वेगळी छाप मागे सोडून जात असतो. एकच व्यक्ती एखाद्याशी खूपच प्रेमळ वागत असेल तर तीच व्यक्ती एखाद्या दुसऱ्या माणसा बरोबर अतिशय वाईट वागली असेल. याचाच अर्थ असा की जशी सभोवतालची भौगोलिक तसेच वास्तविक परिस्थिती बदलते तशी मानवाच्या मनाची अवस्था बदलत जाते. अशा वेळी एकाच व्यक्ती बद्दल दोन वेगवेगळे भिन्न मतप्रवाह उदयाला येतात. आणि मग आपल्याला त्या बद्दल बोलताना नेमका हा असा आहे का तसा आहे? हे ठरवणे कठीण जाते. असेच काहीसे वरील शेर सांगतो आहे.
पुढचा शेर बघुयात...
संपले ना पर्व इथले जायचे तर जा अता तू
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही
वरील शेर अगदी काळाला उद्देशून लिहिलेला शेर आहे. काळ अव्याहतपणे चालत असतो. तो ना काल कोणासाठी थांबला होता ना आज कुणासाठी थांबणार आहे. त्याच्या या प्रवासामध्ये मात्र तो असंख्य अशा खुणा माणसाच्या जीवनावर उमटवून जातो. असंख्य अशा आठवणी मागे ठेवून जातो. जिथे फक्त माणसालाच वाटते की या इथे काळ थांबला होता. पण तो केवळ एक भास असतो. आठवणींचा मनाला हुलकावणी देणारा आभास असतो. माणसाने कितीही म्हटले की मृत्यू तू आलास तसा आल्यापावली निघून जा मला अजून थांबायचे आहे. पण तो काळ असतो. तो कुणाचे ऐकतही नाही आणि कुणासाठी थांबत सुद्धा नाही तुम्हाला जेव्हा न्यायचे आहे तेव्हा तो घेऊनच जाईल असा काळाचा महिमा असतो. प्रत्येकाचे बालपण रम्य असते, प्रत्येकाचे तारुण्य सुंदर असते. आणि त्या त्या काळातल्या आठवणी खूप सुंदर आणि मनाला मोहरून टाकणाऱ्या असतात. तरीही आपले बालपण किंवा तारुण्य माणसाला पुन्हा फिरून नव्याने मिळत नसते. कारण ते काळासोबत मागे पडलेले असते वाहून गेलेले असते. म्हणून तुम्ही काळाला कितीही सांगितले की तुझे कार्य संपले आहे तू आता इथून जा. पण तो कुणाच्या सांगण्यानुसार कधीही वागत नसतो
काळ आला देहाशी खाऊ,
असे तुकोबाचे वचन आहे..ते आजही सत्य आहे आणि उद्याचेही सत्यच आहे.
अशा रीतीने वरील शेर वाचकाला अभिप्रेत होतो
आता गझलेचा शेवटचा शेर पाहू
घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित
वेदना जख्मी मनाच्या मोजताही येत नाही
वरील शेराचा साधा सरळ विचार केला यार एखाद्या प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रेमात असंख्य घाव दिले आहेत ज्याच्या जखमा तिच्या मनावर अगणित झालेल्या आहेत. ज्या मोजणे केवळ अशक्य आहे. असा एक साधा सरळ विचार अभिप्रेत होतो. परंतू तात्विक विचार केल्यावर ह्या शेराची व्याप्ती खूप वाढते. एखादा माणूस जन्माला आल्यापासून ते जगण्याचा शेवट होई पर्यंत असंख्य अशा चढ उतारावरून जात असतो. आणि ह्या प्रवासात त्याला खूप काही दुःख हाल अपेष्टा तर मिळतातच त्याच बरोबर मानअपमानही सहन करावा लागलेला असतो. ह्या प्रवासात बऱ्याच गोष्टी हाती लागतात तर बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी हातातून निसटून गेलेल्या असतात. जेव्हा हा पीडित जीव ह्या सर्व कालचक्रातील जीवन घटनांचा एकांतात विचार करतो त्यावेळी काय मिळवले काय गमावले याचा हिशोब करताना काय जगलो याचा विचार मनाला विकल करून जातो. आणि ते दुःख सहन होत नाही कुणाला सांगणे तर अगदीच दुरापास्त असते. असा हा जीवनाचा प्रवास आपल्या दोन ओळीच्या शेरा मध्ये गझलकारा अतिशय समर्थपणे मांडतात.
एका सुंदर गझलेचे रसग्रहण करण्याचा एक आत्मिक आनंद लाभत आहे.
रवींद्र सोनवणे
9096873678

No comments:
Post a Comment