दोन शब्द ---
अशोक सोनवणे सर, आपली कौतुकाची थाप पाठीवर पडली आणि अत्यानंद झाला...कारण पुढचे पाऊल टाकण्यासाठी ही थाप फार महत्वाची......💐🙏
चंदनाची फुले
~~~~~~~
दोन शब्द.....
कवितेची अनवट वाट चालताना अडखळणारी कवयित्री चंदना सोमाणी चं नवं पुस्तक "चंदनाची फुले "वाचलं आणि जाणवलं की ती आता लीलया काव्य पथावर दमदार पावलं आत्मविश्वासाने टाकते आहे.
गझल आणि कवितांचा सुरेख संगम असणारी ही कविता सशक्त अभिव्यक्ती सादर करते. समर्थ प्रतिमा आणि संपन्न प्रतिभा यांचा सुंदर मेळ इथे आढळतो.
नवनवीन काव्य-विभ्रम दर्शवणारी ही कविता म्हणजे मनातले भाव कागदावर अविरत वाहणाऱ्या झऱ्या/नदीगत उमटत राहते.
कधी विरहिणी, कधी प्रेयसी तर कधी मंतरलेल्या लेखणीची सखी होते. म्हणून ती मनाच्या को-या पानावर चांदणे कोरते असे कवयित्रीला वाटत राहते.
चंदनाची फुले शायरी सांडते. कधी गझल स्वप्न कक्षेस लांघून जाते. कंकणांचा नाद मनाला दाद वाटते. वातीने कापसाला जाळावे, जसा घरातला भेदीच, हळव्या फुलाला वा-यानं छळावं तसा स्वप्नात भावनांचा कोंडमारा होतो, इ.इ.अनेकविध प्रतिमा मन वेधून घेतात.
गझलकार म.भा.चव्हाण यांनी पाठराखण करताना म्हटले आहे की, चंदनाचं शब्दांचं उद्यान समृद्ध आहे. जीवन जगणं ही एक कला आहे. त्याचं कवितेत रूपांतर करण्याची कला तिला साधली आहे. हे संग्रह वाचताना जाणवत राहतं.
काही तत्वज्ञानसदृष विधानं ही इथं भेटतात.
उदा. जिंदगी बेजार आहे, बाजार आहे, टांगती तलवार आहे. ओळखीची माणसेही वागती 'खिल्जी'प्रमाणे. पाखरूही भीत नाही गोफणीला, भावकीची ओढ नाही भावकीला. गंध नाही पण तरी तो-यात बहरे टणटणी, चलनात आज शिक्के खोटे जिथे तिथे..शोधून सापडेना कलदार फारसे, लेखणी जन्मास आली तरी का आयुष्याचं कोरं पान ?
सदाचाराची साठव नगद, दुराचाराचा कर खर्च. आणि त्याग,समर्पण फक्त चंदनाचेच का?सहाण पण झिजते सोबत....
अशा लक्षणीय ओळीं सोबत गझलेसह मुक्त छंदातल्याही छान कविता "चंदनाची फुले"या संग्रहात आढळलतात.
काही प्रेम या सदाबहार विषयावर कविता करण्याचं वय आणि नाद कवयित्रीला लिहितं ठेवतो. त्याचा आस्वाद प्रत्यक्ष वाचूनच वाचक/रसिक यांनी घ्यावा...
एकूणच कवयित्री चंदना सोमाणी याचा हा संग्रह वाचनीय आहे. तसेच भावी लेखनाचा चढता आलेख दाखवणारा नक्की आहे. म्हणून कवयित्रीला अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करीत आहे.....
-अशोक नीलकंठ सोनवणे

No comments:
Post a Comment