गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण
मराठी गझल - पाखरूही भीत नाही...
फक्त गझलेसाठी गृप वरचा Balkrishna Tirankar काकांचा नितांतसुंदर अभिप्राय 🙏🌹 मनापासून धन्यवाद काका 😊
अगदी बरोबर चंदना !
आज जग दिखाव्याचे झाले आहे. साधेपणा जो आमची संस्कृती जपतो,तो आपल्या रक्तात अंगभूत आहे.रंगढंग यात जो निष्णात तो पुढारलेला समजतात. साधेपणा हा प्राणातून अवतरीत होतो तर दिखाऊपणा हा तनाचा बेगडी आविष्कार असतो.
ज्याची नजर आरस्पानी तोच पाहू शकतो साधेपणा पलीकडील सौंदर्याच्या निरभ्र नभाचा अवकाश. आपण सारे,काही अपवाद वगळता,ओंडक्याचे प्रवाहपतीत वारस आहोत. प्रवाह नेईल त्या दिशेने वाहत जायचे.थोर लेखकमराठी गझल - पाखरूही भीत नाही... स्व.गजानन जहागीरदारांचं 50 वर्षा पुर्वी मी वाचलेलं वाक्य आठवलं..
"जे प्रवाहाच्या विरूद्ध दिशेने पोहतात नि आकाशाला आयुष्याचा अर्थ विचारतात,त्यांच्या तळहातावरील रेषाही बदलतात." साधेपणाही असाच एक मुळ प्रवाह आहे,जो गंगोत्री, यमुनोत्रीशी नाते सांगतो. जे मुळातून येते नि शेवटपर्यंतही तसेच राहते ती शुचिर्भुतता, ते पावित्र्य अपूर्व असते. त्याला कोणतेही अपावित्र्य स्पर्शही करू शकत नाही, कारण प्रवाहातील वाहत्या पाण्याला तुम्ही ओझरता जरी स्पर्श केलात तरी पुन्हा त्याच थेंबाला तुम्ही कधीच स्पर्शू शकत नाही.तसेच साधेपणाचेही आहे. हे साधेपण गजलकारा चंदनाजींना प्राणांतिक आक्रंदाने भावले म्हणून त्यांच्या प्राणकोषातून या शेराचा उद्गम झाला. साधी रचना, साधेच शब्द शेरात बांधून अन्वयार्थाचा सागरतळ गाठणाऱ्या नि नभाला स्पर्शणाऱ्या त्यांच्या सर्वच रचना या त्यांचा बहुआयामी तरीही नितळ, निर्मळ, आरस्पानी साधेपणा हा त्यांच्या व्यक्तीमत्वातील अंगभूत गुणांचा परिपाक आहे. त्यांच्या गजलेतील साधेपणा वर बेतलेला शेर हा तसाच अर्थामागील अन्वयार्थाचे अनेक पदर उलगडणारा आहे. मग मला वाटून जाते....महात्मा फुले, महात्मा गांधी, रमाबाई, सावित्रीमाई, या महामानवांची निखालस साधी वेषभुशा "साधेपणातील सौंदर्याचा" परमोच्च बिंदू गाठते. जगदगुरू तुकारामांची बाराकशी नि धोतर मनप्राणाला भावते. त्यांचा साधेपणा निरंतर पाझरत राहतो त्यांची अभंगवाणी.
मन निर्मळ झाले की हा साधेपणा साधतो नि मग कोणतीही पाश्चात्यता आमचा विचारभेद करू शकत नाही.
याच गजलेतील शेवटचा भावकीवरील एक शेर भावला नि मन हेलावून गेले. काळ बदलला. जग बदलले.
पुर्वीचे संस्कार कधीचेच अडगळीत गेले. मग परिपाक....
भाऊभाऊ रामभरत राहिले नाही. स्वार्थामुळे नातेसंबंध आपल्याच रेशीमकोषात स्वत: भोवतीच कोष गुंडाळत म्रुत झाले. आईबाप हे व्रुद्धाश्रमाच्या नवसंस्कृतीचे शरणागत झाले. सणाच्या दिवशी दुसऱ्या भावाकडे राहणाऱ्या मायबापांना जेवणाचे निमंत्रण देऊन बोलावले नि दुसऱ्या भावाला दोघांच्या जेवणाचे बिल पाठवले. 15-15 दिवस भावांनी आईसाठी वाटून घेतले.
31 दिवसांचा महिना आला तेव्हा आईने तक्रार न करता देवाचा उपास करणे आरंभले. बापलेक, भाऊभाऊ नातेसंबंधांची पक्की भिंत बांधत आयुष्यभर आकसाने जगत राहिले. ना आनंद ना जगणे.एकमेकात पडलेले हे अंतरातले अंतर पाहून हळवे मन नि कनवाळू काळजाच्या निसर्गकन्या व्यथीत न होत्या तरच नवल. हसत खेळत काळजाला पिळ पाडणाऱ्या त्यांच्या गजला म्हणूनच मला प्रचंड आवडतात, भावतात. या ही गजलेचे तसेच. आमेन !
चंदना शुभाशिष ! नितळ प्रवाहासारख्या निरंतर लिहीत रहा......
https://m.facebook.com/story.php?story_fbid=734602770048060&id=100004950309672

No comments:
Post a Comment