Followers

Tuesday, 24 December 2024

24 डिसेंबर=


|| जिवेत् शरदः शतम् ||

आघाडीच्या गझलकार, विदुषी चंदना सोमाणी यांचा आज वाढदिवस! अभंग शुभेच्छा!

शब्दांनाही सूर भेटता ..... !
*******************
दुःख कधी केविलवाणे असू शकते का? तर याचे उत्तर बिनदिक्कतपणे, 'होय!' असे द्यायला हरकत नाही. फक्त अट एकच आहे यासाठी आघाडीची गझल लेखिका चंदना सोमाणी यांची एक गझल तुम्हांला ऐकावी लागेल. गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायक, सुरेश वाडकरांच्या तलम आवाजातील ही गझल जरूर ऐका. नेमकी गझल कशी असते वा असायला पाहिजे हे इथे स्पष्टपणे जाणवते. शब्द असे आहेत ... 
'शब्दांनाही सूर भेटता मिठीत हरखे गाणे 
दुःख असे की हसून जाते मधून केविलवाणे' 
दुःखाने लाजिरवाणे होऊन केविलवाणे हसावे असे वाटत असेल तर शब्दांना सूर तितक्याच ताकदीचे भेटायला हवेत! मग, एवढ्यावर भागत नाही तर, हेच शब्दसूर मिठीत हरखून जातात! 

वादळवाटा दूरवर भेटायला येत असतील तर नवल नाही, त्यांच्या वाटांवर सोबतीला सुखदुःखाचे गीत सुद्धा असते, हे विशेष!

राधा sss राधा sss म्हणत शाम हरवत जातो. पाव्यामधून विरह गीत ऐकायला येत असेल तर अशी अवस्था ठरलेली!

रात्रभर सूर्य दिसेनासा होतो. कोण त्याला असे विझवित असेल असा बाळबोध प्रश्न उपस्थित होतो. कदाचित, काळोखाला भेटण्यासाठीची त्याची ही धडपड असावी. शब्द आणि विचार यांचेशी एकरूप झाले की लेखनाची गती वाढत जात असावी. सोबतीला व्यासंग आणि सातत्य असले की मनाला भुरळ घालणारी रचना कागदावर उमटतेच उमटते! चंदना सोमाणी सारख्या तयारीच्या गझलकाराच्या गझलेवर भाष्य करणे मग खूप अवघड होऊन बसते. नुसत्या दोन ओळींचा आशय, व्यापक परीघ खूप काही बोलून जातो, सांगून जातो. नवोदितांच्या लेखनासाठीची ही अशी प्रचंड ऊर्जा निश्चितच असते. 

'धुके धुमसते जेव्हा जेव्हा मनात माझ्या 
प्रभातकाळी शीळ घालतो पहाटवारा' 
इथला पहाटवारा आकर्षित ही करतो व मन मोहून ही घेतो! परिचयाचे सोपे, साधे शब्द नटून थटून असे सामोरे येतात तेव्हा, तयारीच्या रचनाकाराची खूण पटवून देतात. मग तोंडातून आपसूक शब्द बाहेर पडल्याखेरीज राहत नाहीत...
'गझल म्हणाली मला 'चंदना' 
तुझ्यात आहे निवास माझा'

तायडे, तुझा प्रत्येक शेर खूप अप्रतिम असतो. मानाचा मुजरा! शब्दांची विशेष निवड गझलियतची उंची वाढविणारी असते. समज किती आणि कशी असावी याची कार्यशाळा म्हणजे तुझी गझल! मी कायम तुला वाचतो आणि अभ्यासतो ही! माझ्यासाठी ती एक कार्याशाळाच असते. तुझ्या भावी गझल लेखनास सदिच्छा! 
------------------------------ 
-- सुरेश नागले. नवी-मुंबई 
     दि. २५ डिसें. २०२४     
-------------------------------------------------------------------------

काय बोलू... दादा 😊 निशब्द झाले मी ... एका अभ्यासकांनी दिलेला अभिप्राय हा कायम मौल्यवान ठरतो... खूप खूप धन्यवाद या शब्दमोतींसाठी 🙏🏻

Wednesday, 9 October 2024

चंदनाची फुले रसग्रहण - 17

असे म्हणतात "जे न देखे रवी ते देखे कवी" या उक्तीस समर्पक असा...चंदनाची फुले...
रसग्रहण - राजेंद्र महादेव जाधव 
 

चंदनाची फुले...चंदना सोमाणी

असे म्हणतात ,' जे न देखे रवी ते देखे कवी ' 
या उक्तीस समर्पक असा ' चंदनाची फुले ' हा  चंदना सोमाणी यांचा काव्यसंग्रह वाचनात आला. त्यातली काही फुले सामायिक करावीशी वाटतात. तश्या सर्वच कविता आणि गझल मस्तच पण त्यातही काही भावलेल्या....

कसा आवरू मी व्यथेचा पसारा
उधळतो सुखाला इथे रोज वारा

आपले जीवन असेच नाही का?
'सहाण' आणि ' चंदन 'यांचे नाते आपल्या काही नात्यांनाही लागू पडते जे कवयित्रीनी छान मांडलेय...

'कितीही जरी यत्न केला तरीही
सहाणे विना गंध ना चंदनाला
"त्याग समर्पण फक्त चंदनाचेच का?
सहाण पण झिजते सोबत

आयुष्य कसे भरभर निघून जाते कळतच नाही आणि या ओळीही पुरेश्या पटतात...

'थेंबापुरता निवास माझा
मला वाटला प्रवास माझा'

आणि अश्या या जीवन प्रवाहात अशीही कुचंबणा वाटेस येते..

'विवंचना ही कुणास सांगू
माझ्यापुरता समास माझा'

लहानपणी जसजसे समजू लागते, जगरहाटी प्रमाणे मनुष्य वेगवेगळे मुखवटे लाऊन जगू, वावरू लागतो...

'कलेकलेने पुनवेसाठी
चंद्र आपुले अंग बदलतो

समोर दिसता मृत्यू तेव्हा 
माणूस का मग रंग बदलतो

एका कवितेत 'जीवन ' आणि ' 'जिंदगी ' यातही फरक आहे हे चंदना जाणवून देतात.

'जीवनाला बनवतो चवदार हा
लोणच्याचा खार आहे जिंदगी 

कोरते मृत्यू कपाळी शेवटी
थांबते अनुस्वार आहे जिंदगी 

तुम्हाला या ओळी वाचून राजेश खन्नाचा ' आनंद ' आठवला असेल..
"बाबू मोशाय ,जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं "
 काहीजण उगाच सहानुभूती आणि कीव दाखवतात. खरे तर sympathy पेक्षा empathy जास्त महत्त्वाची आहे हेच ते विसरतात.

मोकळा जर श्वास नाही, कोरडा पान्हा कशाला 
बेगडी उपकार सुद्धा वाटतो आता नकोसा

दुश्मनाला लाज वाटे हादरे ही भिंत जेव्हा 
नाटकी शेजार सुद्धा वाटतो आता नकोसा

कितीदा बघावे नको त्या रुपांना 
ऱ्या दर्पणांचा किती कोंडमारा 

आभाळ,स्वर्ग यांचेही जीवनाशी नाते काही वेगळेच हे काही ओळी सुचवून जातात.

आभाळाला दुःख कशाचे 
कोसळणाऱ्या ढगास ठावुक

फक्त दिखावा नम्र पणाचा
किती 'मी'पणा स्वतःस ठावुक

म्हणतो आपण स्वर्गच गाठू
खरे की खोटे सुतास ठावुक

जगाच्या या मोहमयी पसाऱ्यात असे अडकतो की...

मोहमयी डाव सारा 
उधळता आला नाही कधी
आसक्ती निर्माण होताना 
विरक्ती शिवलीच नाही कधी 

....एक उद्योगपती मरणासन्न... सर्वांस विचारतोय ..कुठे आहात...मुलगा,मुलगी,बायको,नातवंडे,सूना सर्व सांगतात.. जवळ आहोत..उद्यागपती कातर स्वरात " अरे, मग दुकानात कोण आहे? '..अशी अवस्था आहे आपुली..
 नात्यांतील फोलपणा ही चंदना यांच्या काही ओळी सांगून जातात..

त्या काळचा धोबी तो आजही जिवंत आहे 
आजही जनाचे ऐकून राम सीतेस त्यागत आहे 

आणि तरीही कसेही जीवन असो,कसेही लोक असोत/ वागोत  कसेही उतार चढाव ही असो....


सदाचाराची साठव नगद
दुराचाराचा कर खर्च 
हाच खरा असेल हिशोब 
बाकी सारे बेहिशोब 
           
असे चंदनाजी सांगून जातात.

         राजेंद्र महादेव जाधव 
          ०९ /१०/२०२४

Wednesday, 2 October 2024

चंदोळी - १०


 तुझा खरा रंग तर..
आकाशातून उतरतो 
अन् 
समुद्रात सामावतो 
कृष्णाची निळाई 
व्यापून
माझ्यात उरतो 
तो 
रंग 
म्हणजेच तर 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

चंदोळी - ९


 भूप रागातील 
वर्ज सूर इथे हवाय कुणाला 
माझ्यासाठी तर 
तार सप्तकातील 
कोमल गंधार 
आहेस 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

Friday, 27 September 2024

मराठी गझल - जणू

 

गझल - जणू 


नजारा छानसा दिसला जणू...
सुखाने वाफसा धरला जणू...

चला सुरुवात झाली चांगली
मला मिसरा उला सुचला जणू...

जसा हातात आला आरसा
भ्रमाचा भोपळा फुटला जणू...

खरे बोलायचे होते जिथे
तिथे खोटेपणा डसला जणू...

जरा पाणावले डोळे तिचे
मखर अश्रूंमधे सजला जणू...

खरा उरला कुठे हा कायदा
इथेही न्याय तर हरला जणू...

तसा तर भास की आभास हा
अहम् माझ्यातला गळला जणू...

चंदना सोमाणी ©®

Saturday, 21 September 2024

तानापिहिनिपाजा...



रंगधनुष्याच्या रंगांशी खेळताना किती मज्जा येते माहीत आहे का? हा अनुभव मला रांगोळी काढतांना येतो. हे रंग जीवनात असेच उतरत असतात सुख दुःखाच्या माध्यमातून, आणि रंगाने खेळताना ते आपल्या जीवनात उतरवताना नितांतसुंदर सुख देऊन जातात....
प्रत्येक रंगाला जीवनात एक वेगळंच स्थान असतं
जसे आपल्याला माहीतच आहे...
धवल रंग म्हणजे पावित्र्याचा...
& आकाशी निळा....शांतीचा....
आकाश आणि सागर......अथांग 
तसेच आपला सर्वांचा आवडता गुलाबी रंग म्हणजे प्रेमाचा प्रतीक
पिवळा रंग मैत्रीचा म्हणूनच मजबुतीचा...
हिरवा निसर्गाचा.....जो मनाला सुखावून जातो...
लाल म्हणजेच तांबडा शुभ....म्हणून तर तो स्त्रियांच्या माथी असतो आपल्या जोडीदाराच्या शुभचिंनासाठी, सौभाग्याचे लेणे म्हणून....
नारंगी रंग तेजस्वी.....जसा सुर्य, जो आपल्या तेजाने संपूर्ण सृष्टी व्यापून टाकतो....
असे हे विविध रंग...
आपल्या आयुष्यात "तानापिहिनिपाजा" इंद्रधनुषी रंग सुखाची उधळण करत असतात. फक्त ते सुख आपल्याला आपल्या जीवनात उतरवण्याची कला आत्मसात पाहिजे....मग जगातले सर्व सुख आपलेच....नाही का..?

चंदना सोमाणी ©®  

Monday, 16 September 2024

चार ओळी - २०


 घरंगळलेला पहिला अश्रू 
अन् रडू नकोस खूणावणारे बोट
कळले मला तेव्हाच
तुझ्या मिठीत नव्हती रे खोटं

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - १९


 मनसोक्त भिजलेल्या क्षणाने
मला येऊन विचारले
हे चित्र आपल्या आठवणींचे 
मनात कसे चितारले

चंदना सोमाणी ©®

Sunday, 15 September 2024

मराठी गझल - एकेक पाकळी

गझल - एकेक पाकळी 

एकेक पाकळी गळणार शेवटी
मृत्यो तुझ्या खुणा दिसणार शेवटी 

बांधून घेतली लेणी सुबक जरी
कोरीव दुःखही हसणार शेवटी

किंतू मनातला काढून टाकला
पण वाद हा जुना उरणार शेवटी

वेचू नकोस तू कण कण मनातले
अंदाजही तुझे चुकणार शेवटी

हा चेहरा नको अन् आरसा नको
प्रतिमाच आपली फसणार शेवटी

हेतू न चांगला तू हे म्हणू नको
तो मर्म त्यातला कळणार शेवटी

हा देह जाळला मी चंदनापरी
राखेतही फुले फुलणार शेवटी

चंदना सोमाणी ©®

Tuesday, 3 September 2024

मराठी गझल - हो ना..?

गझल - हो ना..?

आतल्या कोलाहला तू शांत होना
पाहिजे आहे तुला एकांत.. हो ना ?

मेणबत्ती आणि रस्ता.. ह्याच गोष्टी 
वासनेला अंत ना सीमांत.. हो ना ?

घर जळाले तर जळू दे.. काय जाते 
फक्त आपण वाचतो वृत्तांत..हो ना ?

ढग जमा झालेच आहे जर मनावर
हाच अश्रूंचा खरा सिध्दांत.. हो ना ?

प्रेम करतो आणि म्हणतो प्रेम नाही
बोलतो खोटे किती धादांत.. हो ना ?

वाळवंटातून जातो मार्ग माझा
हा तसा नाही फुलांचा प्रांत..हो ना ?

जर सुखांचा पाहिजे गोतावळा तर
दांभिकांचा अंत कर कृतांत होना

चंदना सोमाणी ©®

Monday, 2 September 2024

चार ओळी - १८


एक निशांत कातरवेळ 
आणि दाटून आलेले ढग 
मनातल्या कोरड्या भावनाही 
अवचित भिजून जातात मग 

चंदना सोमाणी ©®

Sunday, 1 September 2024

मराठी गझल - दिवा

गझल - दिवा

मिट्ट काळोखात सुद्धा तेवतो आहे दिवा
अन् स्वतःच्या भोवती अंधारतो आहे दिवा

पेटला होता निखारा काजळीच्या आतही
शेवटी विझला तरीही धुमसतो आहे दिवा

घात केला आपल्यांनी आणि आली संकटे
पांगळ्या पायांसवे तेजाळतो आहे दिवा

लुप्त झालेल्या दिशांची एक काळी रेघ तू
हे असे म्हणता क्षणी आभाळतो आहे दिवा

धूळ चढलेल्या क्षणांचा मागतो आहे ठसा
ह्या कुण्या गावात आता हरवतो आहे दिवा

वादळे आली किती अन् वादळे गेली किती
पण युगांचा वारसा सांभाळतो आहे दिवा

चंदना सोमाणी ©®

Saturday, 31 August 2024

चार ओळी - १७


 सांजवेळी माझी 
पापणी का ओलावली 
राधेला कसली झाली बाधा 
आज मज उमगली 

चंदना सोमाणी ©®

Saturday, 24 August 2024

मराठी गझल - शेवटी गर्दीच ही

गझल - शेवटी गर्दीच ही 


 हे असे झाले कसे
का पुढे गेले ससे

भेटले होते मला 
फार आधी कवडसे 

दे... मला तू आग दे
अन् भरीला कोळसे

प्रेम हे माझे तुझे
ठेव तू आहे तसे

पाहिले डोळ्यात मी
हासणारे आरसे

चार भिंतींना पुन्हा 
नाव सुचले छानसे 

शेवटी गर्दीच ही
कोणती ही माणसे 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 22 August 2024

चार ओळी - १६


 प्रेम करतानाही माणसं 
ते करतात राखून अंतर 
जर दुरावलीच मनं तर
मध्ये भिंत बांधतात नंतर 

चंदना सोमाणी ©®

Monday, 19 August 2024

चार ओळी - १५


 पानगळ ही निराशेची 
जी शिशिरात गेली होऊन 
आशा उद्याच्या बहरण्याची 
वसंत येईल फुलून 

चंदना सोमाणी ©®

Saturday, 17 August 2024

चंदोळी - ८


 भूतकाळाच्या अंधारातून 
भविष्यातील 
उजेडाचं सामर्थ्य 
दाखवणारा 
माझा वर्तमान आहेस 
तू...😊

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - १४


 तुळशीकडे पाहिलं 
मंजिरी होती फुललेली 
सुखी संसाराची साक्ष जणू 
अंगणी माझ्या बहरलेली 

चंदना सोमाणी ©®

Saturday, 10 August 2024

चंदोळी - ७


 श्रावण सरींचं 
सोड रे...
पण मन,
पाऊस होऊन 
उतरशील 
या डोळ्यात 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

Thursday, 8 August 2024

चंदोळी - ६


 काठापर्यंत जाऊन परतलेल्या 
तिला,
पुन्हा एकदा सामावून घेतले 
त्याने,
त्याच्या निळ्याशार बाहुपाशात..
तीही निःसंकोचपणे एकरूप झाली,
या अथांगतेचं रूप 
म्हणजेच 
तर 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

Friday, 2 August 2024

चार ओळी - १३


 ओंजळ भरून घेतला तरी 
ओघळून जातोच हा पाऊस 
ओघळेल का कधी असाच 
मनातील किल्मिषांचा पाऊस 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 1 August 2024

मराठी गझल - सांजवेळी ही उदासी

गझल - सांजवेळी ही उदासी 


काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी 
का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी 

याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम केले 
तेच क्षण उधळीत येते सांजवेळी ही उदासी 

का मला दिसलेच नाही ते झिरपणेही ढगांचे
आसवे भिजवीत येते सांजवेळी ही उदासी 

भासला होता तुझा तो स्पर्श तेव्हाचा मिडासी 
अन् तुला गुंफीत येते सांजवेळी ही उदासी 

साहिला आजन्म सारा मी दुरावा आपल्यांचा
दाह गोंजारीत येते सांजवेळी ही उदासी 

चंद्रही झाकोळला अन् चांदण्याही लुप्त झाल्या 
पौर्णिमा कोरीत येते सांजवेळी ही उदासी 

ठेवले उश्वास काही मी उशाशी सांजवेळी 
त्याच चाकोरीत येते सांजवेळी ही उदासी 

चंदना सोमाणी ©® 


Wednesday, 31 July 2024

चंदोळी - ५


 माझ्या 
व्यक्त अव्यक्त भावनांचा 
निचरा करणारा 
कोरा फळा 
आहेस 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - उगा छळते

गझल - उगा छळते 


उगा छळते कुठे काही
मला कळते कुठे काही

जरी कळतेच सारे, पण..
तरी वळते कुठे काही 

तुझी ओंजळ फुलांची..मग
तुला फळते कुठे काही 

इथे तर टाळता येते
तिथे टळते कुठे काही 

सुरू झालीच टिप टिप ही
बघू खळते कुठे काही 

निखारे शांत झालेले 
पुन्हा जळते कुठे काही

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - पुन्हा पावसाळा

गझल - पुन्हा पावसाळा 

तुझ्या आठवांचा पुन्हा पावसाळा
टपोऱ्या दवांचा पुन्हा पावसाळा

ऋतू हा फुलांचा फुलारून येता 
सुगंधी क्षणांचा पुन्हा पावसाळा 

बरसतात धारा कशा वाळवंटी 
दिलासा जिवांचा पुन्हा पावसाळा 

लपंडाव खेळे उगा आज श्रावण 
उन्हासावल्यांचा पुन्हा पावसाळा 

उडे पंख लेऊन क्षण हे भरारा
थवा पाखरांचा पुन्हा पावसाळा 

हवासा हवासा मला वाटणारा 
कवडसा मनांचा पुन्हा पावसाळा 

लुटावे किती क्षण असे पावसाळी 
असा आठवांचा पुन्हा पावसाळा 

चंदना सोमाणी ©®

Monday, 29 July 2024

मराठी गझल - वाटतात त्या जरी



वाटतात त्या जरी श्रावणातल्या तरी...
भिजवतात पापण्या चांदण्यातल्या सरी

पंख छाटले तरी... विहरतात भावना 
जाहल्या खुल्या दिशा त्या नभातल्या परी

घाव घातलेत हे सांग वादळा कुणी 
की उगीच जाणवे काळजातल्या घरी

पूर ओसरेच ना... दाटल्या उरी नद्या 
आसवात डुंबल्या सागरातल्या भरी

मोक्ष लाभतो कसा काकस्पर्श दाउनी
फक्त रागवू नको वाद घातल्यावरी 

झोपलास काय तू वेद वाचुनी तुझे
जागशील रे कधी देवळातल्या हरी

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 24 July 2024

चंदोळी - ४


 पंढरीच्या वारीचं
पाहू 
नंतर
तशी तर रोजच 
चालत असते
तुझ्यासोबत 
संसारवारी
आणि 
माझा विठ्ठल 
आहेसच की
कायम 
तू...😊

चंदना सोमाणी ©®

Sunday, 21 July 2024

मराठी गझल आणि रसग्रहण - या मनाचे त्या मनाला


*रसग्रहण*

  *सौ. सविता सामंत*

          *गोवा*

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    चला तर आपण आजच्या रसग्रहणाकडे वळूया!!

     आदरणीय गझलकारा सौ.चंदनाताई सोमाणी यांची व्योमगंगा वृत्तातली एक दमदार गझल आणि तिचे रसगग्रहण यांचा आस्वाद घेऊया!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *मतला* -0️⃣1️⃣

या मनाचे त्या मनाला सांगताही येत नाही 
खंत ही की पण मनाला कोंडताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

      *मन चिंती ते वैरी न चिंती*

या उक्तीनुसार मानवी मन हे अनाकलनीय आणि गूढ आहे. कधी कधी दोन व्यक्ती खूप जवळचे मित्र असतात.पण काही तात्विक वादांमुळे कटुता निर्माण होते. आता यात दोघांना किंवा कुणा एकट्याला जरी वाटले की आत्ता मला त्याच्याशी बोलायचं आहे.पण मग मनात विचार येतो की वादामुळे आधीच मनात कटुता आहे. मी परत बोलल्याने जर ती कटुता आणखीनच वाढली तर!....असा विचार करून त्या व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट आपल्या प्रिय व्यक्तीला सांगताही येत नाही.

    एकमेकांना एकमेकांची सवय झालेली असते. दोन मित्र असो  मैत्रिणी असोत वा प्रियकर-प्रेयसी...! छोट्या छोट्या गोष्टी एकमेकांशी बोलण्याची सवय असते. एखादी नविन गोष्ट आवडली.नविन गोष्ट पाहिली तर ती कधी एकदा त्याला किंवा तिला सांगेन अशी मनाची अवस्था होते. आणि मग अशा स्थितीत ती गोष्ट मनात कोंडून ठेवावी लागते.मग मनाची तगमग, मनाची अस्वस्थता वाढते. या मनाच्या अवस्थेत *धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं* ही उक्ती लागू होते. अश्या मनाच्या अवस्थेचं नेमकं वर्णन गझलकारांनी केलं आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣2️⃣

जीत होती हार होती काय होते काय सांगू
जिंकणे सोपे खरे तर हारता ही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️

  काही नाती इतकी विलक्षण असतात की काय बोलावं!
एखाद्या गोड नात्यात वाद झाला... किंवा कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अपरिहार्य कारणाने दुरावा आला,तरी दोघांनाही ते नाते तोडायचे नसते.त्यांचा मन आणि आत्मा एकमेकांशी इतके गुंतलेले असतात की कोणीही त्यांना वेगळे करू शकत नाही. वाद झाला, भांडण झाले तरी कुणी कुणाला दोष देत नाही. दोघेही पुढच्या क्षणाला माघार घ्यायला तयार असतात. इथे स्वतःची हार वा जीत याला  महत्व नसते. दोघेही स्वतः वर दोष घ्यायला तयार असतात. इथे दोघेही दुसरा जिंकावा म्हणून प्रयत्नशील असताना हारणं कठीण आहे.आणि आपण सारेच जाणतो....प्यार में जो हारा वही तो दिल जित लेता है!असंच काहीसं....!
हो ना...!
हा अनुभव या शेरात गझलकारांनी उत्तम रितीने यात मांडला आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣3️⃣

कालच्या एका क्षणाला आज मी फिरुनी म्हणाले 
दे परत तो क्षण परंतू मागताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

इक बार वक्त से लम्हा गिरा कहीं....
देखा तो नहीं है....ढुॅंडा तो नहीं है...
पल जो ये जानेवाला है...!
हे आठवलं ना तुम्हांला.....! मलाही हेच आठवलं नेमकं....!
वेळेला पकडून ठेवू शकतो का ...? नाहीच....पण मग गेलेला क्षण फिरुन परत मागून मिळावा एवढी माफक अपेक्षा ठेवू शकतो का....? मुळीच नाही!!

*काल मी माझ्या सर्व मैत्रिणींना भेटले खूप धमाल केली*

*काल सगळे कुटुंबिय एकत्र फिरायला गेलो होतो मस्त गप्पा रंगल्या* 
ही वाक्य ऐकतो आपण, कधी आपणही म्हणतो.
    खूप आनंदाचे, सुखासमाधानाचे क्षण येतात जीवनात!तेव्हा ते आठवून कितीदा तरी आपण पुन्हा आनंदून जातो. तेच क्षण फिरुन परत आपल्याला अनुभवता यावे असं अगदी मनापासून वाटतं. वाटतं ना...! पण ते आनंदी क्षण कुणाकडे मागूनही पुन्हा मिळणार नाहीत. *क्षणापाठोपाठ क्षण येतो, पण आधीचा क्षण हरवून जातो* म्हणून आनंदाच्या क्षणी त्यांचा भरभरून आनंद घ्या.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣4️⃣

दोष मी देऊ कसा माझ्यातल्या बाईपणाला 
आतला आईपणा नाकारताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     *स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता आहे*

     या उक्तीप्रमाणे एका वाक्यात प्रस्तुत शेराचा आशय आहे. स्त्रीला तिच्या जीवनात अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात.त्यात महत्वाच्या दोन भूमिका म्हणजे पत्नी किंवा प्रेयसी आणि दुसरी आई!  आपल्या सहचराबरोबर पत्नीचं नातं ती सुरूवातीला जेवढे समरसून निभावते तेवढं ती आई झाल्यावर निभावू शकत नाही.माया, जिव्हाळा हा स्त्रीचा स्थायीभाव आहे.आई-बाळाचं नातं जगातील सर्वात नि:स्वार्थी नातं आहे. ज्याला  नऊ महिने उदरात मायेने वाढवलं आहे, तो बाळ हा आईचाच एक भाग आहे.इतके दिवस बाळाशी तिचा मूक संवाद होता. ती आई झाल्यावर तिचं जास्तीत जास्त लक्ष,तिचा ओढा आणि तिचं ममत्व हे साहजिकच बाळाकडे आहे.

    या शेरात गझलकारांनी याची प्रांजळपणे कबुली दिली आहे, की मी एक बाई असले तरी, आईची भूमिका मला नात्याच्या बाबतीत अधिक श्रीमंत करते.  ही भूमिका आता मी अधिक तन्मयतेने निभावते आहे.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣5️⃣

थांबलेला क्षण म्हणाला कोण आहे यातला तू
 हा भला की तो भला हे ताडताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

     आनंदाचे,सुखाचे जे प्रसंग   आपल्या जीवनात येतात, कालांतराने त्या रम्य आठवणी बनून मनात घर करतात. कधी निवांत वेळी सारे प्रसंग डोळ्यासमोर तरळतात.किंबहुना त्या गोड आठवणींना उजाळा देणं ही मानवी मनासाठी त्या प्रसंगाइतकंच आनंददायी असतं. त्या सुखाच्या प्रसंगातील नेमका कोणता क्षण मला सुखी करुन गेला...!आधीचा क्षण चांगला होता की नंतरचा चांगला होता याचा शोध घेण्याचा मनाला छंदच जडतो. पण नेमका कोणता क्षण चांगला वाटला हे सापडत नाही.

  आनंदात आणि सुखातही माणसाची तुलना करण्याची सवय काही संपत नाही. मानवी मन सुखाचा पुर्नप्रत्यय आठवणीतून घेत असतं....पण त्यातही अधिक सुखाचा शोध चालू असतो!!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* -0️⃣6️⃣

संपलेला पर्व इथले जायचे तर जा आता तू 
काळवेड्या पावलांना रोखताही येत नाही

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

    सण किंवा उत्सव पर्व हे आपल्यासाठी आनंदाने क्षण घेऊन येतात. पण आनंद आणि सुख घेऊन येणाऱ्या क्षणांनाही आपण उत्सव पर्व का म्हणू नये? आनंद ओसरल्यावर आनंदी क्षण निघून गेले तरी मन मात्र त्या क्षणांभोवती रेंगाळत असतं.

      पण हे झालं सामान्य माणसांविषयी. विशिष्ट ध्येयाने प्रेरीत माणसे त्या क्षणांमध्ये काही क्षण रमतात. पुन्हा आपल्या ध्येयपथावर चालायला सुरुवात करतात.

      काळाची पावले ओळखून काळाच्या किनाऱ्यावर आपलं नाव कोरणारी माणसं, कितीही आनंदाचे क्षण असले तरी भुलून जात नाही. त्यांचे प्रयत्न सतत आपल्या ध्येयाच्या दिशेने सुरूच असतात. जगाच्या कल्याणासाठी आगळं वेगळं काम करत असतात. लोकहिताचा ध्यास त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सैनिक, शास्त्रज्ञ, नर्स, डाॅक्टर, समाजसेवक अंतराळवीर.....ही काही उदाहरणे आहेत.अशा अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असतात.....अविरतपणे.....न थांबता!!

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

 *शेर* - 0️⃣7️⃣

घाव नव्हते ते नवे जे देत आला तू सदोदित 
वेदना जख्मी मनाच्या मोजता ही येत नाही

 〰️〰️〰️〰️〰️〰️

    तुला कधीतरी कळेल का...तुझ्या बोलण्याने माझ्या मनावर किती घाव करत असतोस. मी तुझ्याकडून नेहमीच प्रेमाची आणि सरळ बोलण्याची साधी अपेक्षा करत आले. पण तुला मात्र माझी एवढी माफक अपेक्षा पूर्ण करता आली नाही.

     तू सदोदीत उपेक्षा करत आलास. तुझ्या निष्काळजी वागण्या बोलण्याने मनावर रोज नविन घाव करत आलास. आता या मनावर जखमांचे अनेक चरे पडले आहेत.हे काही आजचं नाही.हे तुझं रोजचंच आहे. आता मनाला वेदनेची आणि जखमांची इतकी सवय झाली आहेकी त्यांची मोजदाद करणेही मला कठीण झाले आहे.

       सहजीवनात पती -पत्नी दोघांनी एकमेकांचा आदर करावा.एकमेकांना वेळ द्यावा.भावना जाणून घ्यावा.मतांचा आदर करावा.या सर्वांच्याच अपेक्षा असतात.

    आजची स्त्री घरदार,नोकरी-धंदा, मुलांचं संगोपन, कुटुंबातील सर्वांची

काळजी या सर्व आघाड्या व्यवस्थित सांभाळते, तेव्हा पुरुषाने... पतीने तिला या सर्व गोष्टीत सहाय्य करायलाच हवे.

हे करताना तिचे मनही जपायला हवे.ती आपलं घर सोडून आली आहे आणि या घराला ती आपलं समजून सतत कार्यशील राहाते आहे, याची जाणीव घरातील प्रत्येकाला असायला हवी, पण पतीला ही जाणीव अधिक दृढतेने असायला हवी.तरच दोघांतील विश्वासाचं नातं अधिक घट्ट आणि समृद्ध होईल....खरं ना!!

    या गझलेतील मला उलगडलेला आशय मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.या गझलेतील आशयसौंदर्य हे पूर्णपणे गझलकारांचे आहे.

धन्यवाद!🙏🏻

©® सविता सामंत, गोवा.

दि. 26/01/20

Friday, 19 July 2024

चार ओळी - १२


 संततधार बरसणे हा
पावसाचा अन् आसवांचा नियम 
पावसाची ऋतूनंतर विश्रांती
पण आसवांचे बरसणे कायम 

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - त्याला

गझल त्याला 

झोपडी तर फक्त ती आधार त्याला
पावसा केले उगी बेजार त्याला 

भाकरी डोळ्यात दिसते लेकरांच्या 
तीच तर करते किती लाचार त्याला

तो अताशा भीत नाही संकटांना 
वादळांनी बनवले झुंजार त्याला 

वेस ओलांडून आला आत वारा 
आठवे ते आजही घरदार त्याला 

माणसे उरलीच कोठे पण तरीही 
भेटणारे भेटती दिलदार त्याला 

लाख त्याने जमवला गोतावळा पण 
शेवटी कामास आले चार त्याला 

जो प्रसंगी देत गेला सर्व काही
कोण देते ते पुन्हा साभार त्याला 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 18 July 2024

चार ओळी - ११


देवासारखी नको माणसे
माणसासारखी मिळू दे
जीवनाच्या रित्या ओंजळीत 
माणुसकीचे दान पडू दे

चंदना सोमाणी ©®

 

मराठी गझल - प्रश्न हजारो

मराठी गझल - प्रश्न हजारो 

घुटमळलेले प्रश्न हजारो 
अन् दबलेले प्रश्न हजारो

याला सुद्धा, त्याला सुद्धा 
सतावलेले प्रश्न हजारो 

नवीन कोडी सोडवताना
उलगडलेले प्रश्न हजारो

अडकित्त्याच्या मधे सुपारी 
अवघडलेले प्रश्न हजारो

अन्यायाच्या वाटेवरती
थरथरलेले प्रश्न हजारो

पुन्हा भेटले नव्या दमाने 
भरकटलेले प्रश्न हजारो

एकाचेही उत्तर नाही
गोंधळलेले प्रश्न हजारो

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - १०

 


तरंग उठती पाण्यावरती 
तुषारांची जुळवत नक्षी 
धुक्यातून गिरवत रेषा 
भिरभिरले प्रभात पक्षी 

चंदना सोमाणी ©®

Tuesday, 16 July 2024

चार ओळी - ९

 


किती अन् कसं ना
मनाला झुलवत ठेवायचं 
सारे क्षण ओळखीचे तरी 
अनोळखी असल्याचं भासवायचं

चंदना सोमाणी ©®

पन्नो पर...



ये आंसू जब भी गिरते हैं पन्नो पर
मानों के फूल खिलते हैं पन्नो पर

कई क़िस्से बनते हैं बिगड़ते हैं 
कई क़िस्से संवरते हैं पन्नों पर

ये कैसी नाराज़गी है फूलों से, के
दास्तां कांटों से लिखते हैं पन्नों पर

उजाड़ दिये हैं जिनके घर रातों ने
ख़्वाब उनके भी सजते हैं पन्नों पर

कुछ अलग है उनका अंदाज़-ए-बयां
वो एहसास छोड़ते हैं पन्नों पर

चंदना सोमाणी ©®

Sunday, 14 July 2024

मराठी गझल - किती कोंडमारा

गझल - किती कोंडमारा 

मुक्या भावनांचा किती कोंडमारा
कळ्यांचा फुलांचा किती कोंडमारा

कधी उंबरा जो न ओलांडला त्या
लुळ्या पावलांचा किती कोंडमारा

जुन्या त्या दिशा शोधताना नव्याने
निनावी दिशांचा किती कोंडमारा

जिथे फास घेतोस कृषका, अरे त्या
तरूंच्या मनांचा किती कोंडमारा 

कितीदा बघावे नको त्या रुपांना
खऱ्या दर्पणांचा किती कोंडमारा

घरंदाज आहे बहाणा व्यथेचा 
द्विधा आसवांचा किती कोंडमारा 

गजांआड झाल्या जरी नेणिवा ह्या
खुल्या जाणिवांचा किती कोंडमारा

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - ८


 पाऊस सुरू झाला अन् 
भावना उचंबळून येऊ लागल्या
कधी शब्द तर कधी चित्र बनून 
कागदावर उतरू लागल्या 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 11 July 2024

चार ओळी - ७

 

कोरडी माती पाहूनही
पावसा का रे बरसत नाही 
का तुझे मन धरतीच्या 
मिलनासाठी तरसत नाही?

चंदना सोमाणी ©®

Sunday, 7 July 2024

चार ओळी - ६

 

मी खिडकीत असते 
पण मन भिजत असतं 
कारण त्या चिंब आठवात 
ते सतत ओलं असतं 

चंदना सोमाणी ©®

Saturday, 6 July 2024

चंदोळी - ३

 


त्याच्या बासरीला अधरापासून 
अलगद दूर करत 
मिश्कीलपणे हसत 
राधा म्हणाली 
एक तर मी
नाही तर ही तुझी बासरी 
आता बघं तुझं 
तू...🙂

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 26 June 2024

मराठी गझल - जाणता अजाणता

गझल - जाणता अजाणता

रात्र चालली निघून जाणता अजाणता 
चंद्र जागतो अजून जाणता अजाणता 

लाजली कळी अबोल धुंद जाहल्यावरी 
सांज थांबली भिजून जाणता अजाणता 

रंग ओततो वरूण, लाजली वसुंधरा 
वीज हासली वरून जाणता अजाणता 

हासणे तुझे तसेच भासते असे जसे 
आज पावसात ऊन जाणता अजाणता 

लागता निशा ढळू, उजाडल्या दिशा दिशा
दीप चालला विझून जाणता अजाणता 

तोच एक प्रश्न का सतावतो पुन्हा मला 
का कसा कधी कुठून जाणता अजाणता 

वेड लावते गझल अशी मला पुन्हा पुन्हा 
तीच भेटते हसून जाणता अजाणता 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 20 June 2024

मराठी गझल - तरी जन्म हासला

गझल - तरी जन्म हासला
 

किती डंख सोसले किती जीव त्रासला
किती खंत जाहली तरी जन्म हासला 

तुझी सावलीच ती तरी भेद हा कसा 
असे पौर्णिमा जरी नभी चंद्र ग्रासला

नको श्रावणा तुझी इथे कोरडी हवा 
बरसल्याविनाच तो पयोधर प्रवासला 

असे चंद्रमा जरी तुझ्या अंतरातला 
खरा आरसाच तो समाजास भासला 

जरी श्वास थांबला कुणी ना विचारले 
तरी चंदनापरी उभा जन्म घासला 

चंदना सोमाणी ©®

Thursday, 13 June 2024

मराठी गझल - जिंदगी

गझल - जिंदगी 

सोसवेना भार आहे जिंदगी
टांगती तलवार आहे जिंदगी 

सोबतीला चांदणे आहे तरी 
पेटता अंगार आहे जिंदगी 

कोंडमारा होत आहे हा किती 
वादळी अंधार आहे जिंदगी 

राहिले नात्यास नाही मोल ही
भावना बाजार आहे जिंदगी 

यातनाही साहते नात्यातली 
हा कसा संसार आहे जिंदगी 

जीवनाला बनवतो चवदार हा
लोणच्याचा खार आहे जिंदगी 

कैकदा वाटे मला ही तर हवी
कैकदा बेजार आहे जिंदगी 

सार हा घे जीवनाचा चंदना 
बघ कशी साकार आहे जिंदगी 

अंतरिक्षा घालते ही गवसणी 
देहधारी घार आहे जिंदगी 

कोरते मृत्यू कपाळी शेवटी 
थांबते अनुस्वार आहे जिंदगी 

चंदना सोमाणी ©®

Tuesday, 11 June 2024

मी पाठवलेले पत्र...

मी पाठवलेले पत्र...

मी पाठवलेले पत्र....

.............................
.............................

अरे देवा हे काय केले मी 
तुला लिहायला घेतले पत्र 
अन् कोरेच पाठवून दिले न लिहिताच जीवनाचे सुत्र

माहीत होते तुला मी त्यात काय लिहिणार  
म्हणून तर जाणून बुजून केले मी हे 

भावना समजायला लागते मन
जे आहे तुझ्या कडे 
सारे कसे समजवावे मी तुला गडे 

मौनाचा अर्थ असतो गहरा
समजेल ज्याला तोच जोहरी पारखणारा
काही हिरे, माणके, पाचू अशा रत्नांनी लगडलेली मने 
का लावावी मग उगाच कोणाला दुषणे 

कोर्‍याच पानावर मी पाठवलेय मन
घे ना तू समजून, माझ्या मनातील मौन 
कारण शब्दांच्या बाबतीत मी आहे अजाण अजून

लागलाच एखादा शब्द माझा जिव्हारी 
तर तुला गमवायची नाही माझ्या मनाची तयारी

म्हणून तर पत्र मी कोरेच पाठवले 
तुझे माझे एकच मन 
इतकेच संदर्भ यातून उलगडले

चंदना सोमाणी ©®

 

Sunday, 9 June 2024

मराठी गझल - जर तुझा तर...

गझल - जर तुझा तर 

बोलका होता सहारा जर तुझा तर...
भास ना आभास सारा जर तुझा तर...

अन् कशी माझ्या मनाला सावरू मी 
आतही सारा पसारा जर तुझा तर...

मी कशी जाऊ समोरी आरशाला 
पारखा झाला इशारा जर तुझा तर...

टाळताही येत नाही मग छबी ती
भोवती दाटे नजारा जर तुझा तर...

मौन मी ठेवू कसे तू सांग आता 
वेढतो आहे पुकारा जर तुझा तर...

बोल तू लावू नको मग कोणताही 
घेत नाही मी इजारा जर तुझा तर...

सोड ना सारे बहाणे टाळण्याचे 
शब्दही देई चुकारा जर तुझा तर...

चंदना सोमाणी ©®

Wednesday, 29 May 2024

चार ओळी - ५


स्तब्ध माझे शब्द सारे 
मौन शांत अंतरंगात 
अबोल बोल चांदण्यांचे
मज मनीच्या अंतराळात 
 
चंदना सोमाणी ©®

Sunday, 26 May 2024

माझे दोन शब्द - मी आस्तिक मी नास्तिक


देव आहे की नाही..? भुत-प्रेत आहे की नाही..? स्वर्ग नर्क हे अस्तित्वात आहेत की या कल्पना..? हे, ते, असे अनेक प्रश्न..???????????????

बापरे मनाला किती प्रश्न पडतात नाही...?

मला नाहीत तर जवळपास सर्वांनाच ही प्रश्न पडतात ज्याची उत्तरे अधांतरीच......

यांचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण कधी केला का ? किंवा करतो का..? 

पण समजा आपल्या हाती असाच प्रश्न उत्तरांचा उहापोह असलेला वैचारिक ग्रंथ हाती आला तर आवडेलच ना वाचायला...?

हो नक्कीच! कुणाला नको आहे शंकांचे निरसन...!

अशाच सर्व मनातील प्रश्नांचा उहापोह करणारे दुकान म्हणजेच लेखक पुष्कराज गावंडे दादांचा वैचारिक ग्रंथ " मी आस्तिक मी नास्तिक "....

सहज, सोपी, ओघवती भाषा शैली तसेच मधेच येणारी सुंदर वर्‍हाडी भाषा मनाचा ताबा घेत गेली आणि पुस्तकाचा फडशा एका  दमात पाडला...

देव आहे तर तो कसा आहे..?

कुठे आहे..? 

तो आपल्याला दिसत का नाही...? 

अशीच प्रश्ने मलाही नेहमीच पडत, मला पुस्तक वाचायच्या आधी वाटायचे की जगात आपण एक वेडे आहोत की काय पण इथे तर हे सारेच प्रश्न लेखकालाही पडलेले दिसतात. देवाचे अस्तित्व नाकारावे की स्वीकारावे लेखकासोबतच प्रत्येकाला पडलेला प्रश्न...? 

देवाला मानावे तर आस्तिक नाही मानावे तर नास्तिक असा हा सामाजिक दृष्टिकोनाचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो यातून लेखकही सुटलेला नाही याचा प्रत्यय आपल्याला वाचताना येतो...

जेव्हा लेखकाचे मित्र लेखकाला नास्तिक, " बेअक्कल हाय लेकाचा" असे हिणवतात...

देवाचे अस्तित्व आपण स्वीकारावे की नाही ह्या स्वतःला उद्भवलेल्या प्रश्नामुळे " मी आस्तिक मी नास्तिक" हे या वैचारिक ग्रंथाचे नाव अगदी समर्पक ठरते...तसेच त्या नावाला साजेसे मुखपृष्ठ व मलपृष्ठावर असणारी दादाची सदरील ग्रंथाला साजेशी छबी...सर्वच उत्तम...!

या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लेखकाने गौतम बुद्धांच्या पासून ते आज पर्यंतच्या भोंदू  साधू बाबांपर्यंत बराच वैचारिक उहापोह केलेला दिसून आला...!

हा जरी वैचारिक ग्रंथ असला तरी वाचतांना लेखकाची मिश्किल शैली गंभीरपणा जाणवून देत नाही त्यामुळेच वाचतांना हसे आवरत नाही.  प्रकरण 30 आणि 35 प्रकरण वाचतांना हास्याची तर खसखसच पिकते...

इथे लेखकाने अनेक पडणाऱ्या प्रश्नाची उत्तरे मागताना सर्व देवा- धर्माप्रती संत महात्म्यांचा आदर करून त्यांच्या प्रश्नांमुळे जर कोणाची मने दुखावली गेली असतील तर मोठ्या मनाने माफी देखील मागितली आहे. यात जे प्रश्न लेखकाचे आहेत तेच प्रश्न तुमचे, माझे, सर्वांचेच आहेत. हे प्रश्न कोणी विचारतात तर कोणी मनातच पडताळून पाहतात कारण देवाधर्माविषयी अशा प्रश्नांची कुठे वाच्यता केली तर समाज काय म्हणेल..? हा प्रश्न समोर उभा राहतो...

लेखनातून शेतकऱ्यांविषयीचा कळवळा सुंदररित्या मांडण्यात लेखक यशस्वी झाले आहेत आणि भ्रष्टाचारावरही कोरडे ओढण्यात लेखकाने काहीच कसर ठेवली नाही...

जातीभेद पाळणे चांगले की वाईट यावर लेखक म्हणतो, की माझ्यामते जाती पाळाव्यात पण फक्त उच्चनीच भेदभाव पाळू नये तो वाईट! जाती वा 'आपला समाज' ही गोष्ट तुमच्यासाठी एक संरक्षण आहे. एक कवच आहे. ती तुमची कुंडले आहेत. ती गळून पडली तर तर तुम्ही तगू शकणार नाही. तुमचा कर्ण होईल....

एकंदरीत लेखकाने सदर ग्रंथात सर्व विषयांचा कट्टा-चिट्टा स्पष्ट व समर्पक शब्दात पेलला आहे...

माणूस कितीही नास्तिक असण्याचा आव आणत असला तरी त्याच्या मनात एक कोपरा हा श्रध्देचा असतोच, पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी-परंपराचा पगडा हा मानवी जीवनावर कितीही नाही म्हटले तरी असतोच...एकप्रकारची अनामिक भिती ही त्याठिकाणी असतेच म्हणून जो देवाला मानत नसल्याचे आव आणतो तो देखील देवाला भितो...तसे पाहिले तर देव अस्तित्वात आहे नाही हा विषय लांबच परंतू एक अज्ञात शक्ती असते जिला आपण श्रद्धा असे म्हणतो...

 सदरील ग्रंथात मी कुठेही माझं ज्ञान पाजळलेलं नाही, तर मी, माझं अज्ञान प्रकट केलेलं आहे! कुठलाही अहंभाव नसलेलं मलपृष्ठावरील हे वाक्य लेखकाच्या मनाच्या महानतेची खोली सांगून जातं

स्वतः लिहून झाले रिकामे पण आमच्या विचारांचे मात्र चक्र सुरू करून....

शेवटी प्रश्न हे प्रश्नच राहतात...

तसे पाहिले तर एखाद्या पुस्तकाविषयी ही माझी पहिलीच समीक्षा ते घरचा आहेर म्हणजे माझा दादा त्यामुळेच मी समीक्षा करावयास धजले....

तरीही जर चुकून काही अधिक उणे असल्यास माफी असावी 

चुक भुल देणे घेणे.... 

चंदना सोमाणी ©®

चार ओळी - ४


 आभाळातून ओघळलेला एक एक मोती 
माझ्या हातातून गेला निसटून 
तसेच जीवनातील क्षण एक एक 
परत कधीच नाही आले पलटून 

चंदना सोमाणी ©®

मराठी गझल - डोळ्यात आसवांचा

गझल - डोळ्यात आसवांच्या 

डोळ्यात आसवांचा हा कोणता पहारा 
रोमांचितो ऋतू अन् अंगावरी शहारा

बरसून घे अरे तू प्रेमात आज माझ्या 
चाहूल पावसाची की हा तुझा इशारा 

भुलले अशी कशी मी त्या लाघवी स्मिताला 
दुरस्थ तारकांचा मज वाटला सहारा 

गुलमोहरेल बघ तू सोसून झळ उन्हाची
आता तुझ्या विना मी शोधू कुठे निवारा

बघ मंद मंद वाहे आता उनाड वारा 
क्षण हाय आज माझे उडती कसे भरारा

छळतोय आज वारा हळव्या क्षणास कैसा 
स्वप्नात भावनांचा होतोय कोंडमारा 

चंदना सोमाणी ©®

Saturday, 25 May 2024

मराठी गझल - पहाटवारा

       
गझल - पहाटवारा

आभाळाच्या उरी दाटतो पहाटवारा
सरींप्रमाणे कुठे बरसतो पहाटवारा

कालिंदीच्या डोहाकाठी अबोल होतो 
घुटमळतो अन् पुन्हा वाहतो पहाटवारा

पैज लावतो कोणासोबत माहित नाही 
क्षितिजाच्याही पुढे धावतो पहाटवारा

धुके धुमसते जेव्हा जेव्हा मनात माझ्या 
प्रभातकाळी शीळ घालतो पहाटवारा

थकल्यावरती रात फुलांची...हळूच सारे
नभातले मग दीप विझवतो पहाटवारा 

चंदना सोमाणी ©®

कितनी बातें...

कितनी बातें...  हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...