Followers
Thursday, 30 November 2023
जगता यायला हवं
Tuesday, 28 November 2023
मराठी गझल - शेवटी काहीच नाही
Monday, 27 November 2023
चंदनाची फुले - रसग्रहण - 11
अलवार उलगडत जाणारा सुंदर कविता संग्रह...
रसग्रहण - निलेश कवडे
'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह पृथ्वीराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केला आहे. कविता संग्रहामध्ये गझल, मुक्तछंद, लावणी आणि गीत अशा वैविध्यपूर्ण कविता आहेत. कवितासंग्रहातील सुरूवातीच्या काही कविता गझल आहेत. एकूण कवितांपैकी गझल जास्त आहेत.
चंदना सोमाणी यांना गझलेची खरी वाट सापडली आहे म्हणूनच त्यांच्या एका गझलेत त्या म्हणतात,
अशा शेराने त्या रसिकांच्या काळजाला साद घालतात. त्यांची गझल भावनांची सुंदर अभिव्यक्ती आहे. ही अशी सुंदर अभिव्यक्ती का झाली याचे उत्तर त्यांच्या गझलेतच रसिकांना मिळते,
त्यांचे जीवन गझलमय झाल्याचा प्रत्यय हा शेर देतो. चुकीच्या वा पर्यायाने आलेल्या शब्दाने शेराला उंची मिळत नाही तर गझल मध्ये चपखल शब्द योजना असली की शेर उंचीवर जातो. त्यांचा पुढील शेर बघा,
अक्षरांचा लळा असल्याशिवाय अर्थ आकाश व्यापत नाही… अक्षरांचा लळा असल्यामुळे त्यांची गझल सहज आहे. समजायला सोपी आहे. ती अलवार भाव घेऊन येते.
म्हणूनच हा शेर किंवा
प्रेम हा भाव गझलेत तरलपणे मांडतानाच चंदना सोमाणी वास्तविकता सुद्धा प्रभावी शब्दात मांडतात...
असे शेर रसिकांना आयुष्याच्या खऱ्या दार्शनिक स्वरूपाची अनुभुती देतात. आयुष्य सुखदुःखाच्या वाटेने पुढे सरकत असते. माणसाला जगताना बरेवाईट अनुभव येतात ते खूप काही शिकवून जातात. परिस्थितीची दाहकता व्यक्तीला जीवनाशी समायोजन करायला भाग पाडते. अशा बिकट परिस्थितीत व्यक्ती तत्वांशी तडजोड न करता खंबीरपणे आयुष्याच्या लढाईला सामोरे जातो. ही लढाऊ वृत्ती चंदना सोमाणी यांची गझल जपते,
त्यांचे असे शेर परिस्थितीची झळ सोसणाऱ्या माणसाचे प्रतीक बनते. सामाजिक बदल सुद्धा चंदना सोमाणी यांची गझल प्रभावीपणे टिपते,
त्यांचे असे शेर समाज जीवनात झालेल्या विलासी जीवनशैलीला अधोरेखित करतात… त्यांच्या मनाची अस्वस्थता त्यांची लेखणी प्रभावीपणे विशद करते.
अशा शेरातून त्यांची गझल 'खुल्या जाणिवांचा कोंडमारा' मांडते. गझल प्रमाणेच त्यांनी कवितेचे इतर प्रकार सशक्तपणे हाताळले आहेत…
'मी पाठवलेले पत्र' या मुक्त छंदातील कवितेमध्ये त्या म्हणतात, "अरे देवा हे काय केले मी तुला लिहायला घेतले पत्र पण कोरेच पाठवून दिले" देवाला हे पत्र पाठवल्यावर त्या विनंती सुद्धा करतात "घे ना समजून माझ्या मनातील मौन" असा संवाद त्या साधतात…त्यांची 'थंडीची भीती' ही कविता थंडीच्या दिवसातील जीवनमान चित्रित करते. भवसागरी या कवितेमधून "त्या दूरदृष्टी असेल ज्याची तोच पार या भवसागरी" हे जीवन विषयक तत्वज्ञान मांडून जातात. त्यांच्या मुक्तछंदातील कविता संवादी आहेत… त्या वाचकांशी हितगुज करतात या कविता वाचताना रसिक या कवितांशी एकरूप होऊन जातात. 'मैत्री' या कवितेमधून त्या खऱ्या मैत्रीचा महिमा सांगतात. कवयित्रीला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. अन्यायाविषयी चीड आहे. म्हणूनच समाजात घडत असलेल्या विघातक गोष्टींवर प्रहार करायला त्यांची लेखणी घाबरत नाही .'स्त्री तुझी अजब कहाणी' या कवितेमधून ते आपल्या व्यवस्थेवर प्रहार करतात महिलांवर होत असलेल्या अत्याचारावर ही कविता मार्मिकपणे भाष्य करते. 'प्रश्नचिन्ह' हे शीर्षक असणारी त्यांची कविता पुरुषी मानसिकतेला प्रश्न विचारून निरुत्तरित करून टाकते.
'वेगळे रंग' या कवितेमध्ये ऐहिक सुखा पलीकडचे खरे प्रेम त्या मांडतांना म्हणतात, "चल एक नवीन आकाश शोधूया तुझ्या न माझ्या वेगळ्या अशा इंद्रधनुषी रंगासाठी" अशा शब्दांत त्यांनी प्रेम या भावनेला अधिक व्यापक बनवले आहे.
बाईला पुरुषाकडून किंबहुना तिच्या जोडीदाराकडून भावनिक आधाराची जास्त गरज असते असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हाच भाव 'मनातल्या कविता' या कवितेमधून त्या अधोरेखित करतात. त्यांच्या पुढील ओळी बघा,
अशा शब्दात कवयित्री चंदना सोमाणी असंख्य स्त्रियांच्या अव्यक्त भावना त्या बोलक्या करतात… 'क्षण' या कवितेत त्या एखाद्या कळी प्रमाणे हळुवार उलगडत जातात...
अशा शब्दात स्त्री सुलभ भाव हळुवारपणे सुरेख मांडतात… 'भिजलेले क्षण' या कवितेमधून त्या थेट पावसाला साद घालतात. लावणी हा प्रकार सुद्धा त्यांनी सुंदर हाताळला आहे.
'नवं पान' या कवितेत त्या जीवनविषयक आशावाद मांडतांना त्या व्यक्तीच्या थेट वर्मावर बोट ठेवतात…
किती सुंदर शब्दांत त्यांनी दुःखाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यात ओढाताण वाढली की तणाव वाढतो. म्हणूनच ओढ कायम ठेवण्यासाठी व्यक्तीने सतत प्रयत्न करत राहायला हवे. एकमेकां मधला जिव्हाळा आपण जपला पाहिजे. नात्यांमध्ये ओलावा कायम राहिला तर ओढाताण होत नाही. आजच्या या काळात हा ओलावाच जगण्याचा खरा आधार आहे.
'चंदनाची फुले' या कविता संग्रहाला सुप्रसिद्ध जेष्ठ गझलकार आदरणीय म. भा. चव्हाण सर यांची पाठराखण लाभली आहे. कविता संग्रहाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे. मुखपृष्ठावर कवितासंग्रहाचे नाव सुंदर पद्धतीने लिहिले गेले आहे. त्यामुळे मुखपृष्ठ आकर्षक झाले आहे. कवितासंग्रहातील तांत्रिक बाबी चांगल्या हाताळल्या गेल्या आहेत. चंदना सोमाणी यांची कविता लिहिण्याची स्वतःची शैली आहे. त्यांच्या कविता सहज आणि अलवार असतात. त्या उस्फुर्त भावना मांडतात. त्यांच्या कवितांमध्ये लय आहे. रसिक वाचता वाचता त्या गुणगुणायला लागतात ही त्यांच्या लिखाणाची खरी ताकद आहे. चक्रव्यूह, पोकळी, चौफुली आणि ओंजळीतली भाव फुले या कविता वाचकांना वेगळीच अनुभूती देतात. इतरही कविता आपल्या वेगळेपण जपतात.
'आस' या कवितेमध्ये चंदना सोमाणी यांनी मांडलेला विचार माणसाला चिंतन करायला लावतो. खरे जगणे म्हणजे काय याचे उत्तरच ही कविता वाटते. त्या या कवितेमधून एक आस व्यक्त करतात ती मला खूप महत्त्वाची वाटते,
अशा शब्दात त्या माणसाला जगायला प्रवृत्त करतात. 'चंदनाची फुले' हा कवयित्री चंदना सोमाणी यांनी रसिकांना एक सुंदर कविता संग्रह दिल्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन… त्यांच्या पुढील लिखाणास माझ्या मनापासून शुभेच्छा…
………निलेश कवडे अकोला
मो. ९८२२३६७७०६
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Sunday, 26 November 2023
गाऊ विठ्ठल विठ्ठल
Saturday, 25 November 2023
खुळी आस...
*खुळी आस*
आज तो तिला भेटून गेला, वीस वर्षानंतर...
आलेला हुंदका तिने मोठ्या निग्रहाने परतवला. दाटलेल्या कंठाने व भरलेल्या नेत्रांनी नेत्रा घराकडे परतली, मनातील विचारांची श्रृंखला तुटत नव्हती. एकामागोमाग एक विचारचक्र सुरूच...
असे काय घडले की श्रीधर मुंबईहून नांदेड इतके लांब अंतर कापून तिला भेटायला आलेला असतांना फक्त दोन शब्दांसाठी काही मिनिटे वेळ देऊ शकला नाही. चहाचा आग्रह देखील यासाठीच की अजून काही क्षण त्याच्या सोबत घालवता यावे पण आल्या पावली का माघारी फिरला असावा....?
सारेच समजण्यापलीकडे...
असे काय कारण असेल, मान्य; त्रिवार मान्य आता आपल्या वाटा भिन्न असतील पण एक मैत्रीच्या बंधाखातर तरी बोलू शकत होताच की तो...
गतकालीन स्मृतींच्या गजबजलेल्या कोलाहलातून मन बाहेर पडायला तयार नव्हते. एक एक दृश्य चित्रपटातील चलचित्राप्रमाणे फेर धरू लागले आणि मन पुन्हा मागे गतकाळात जाऊन विसावले.
नेत्राचे घर ज्या गल्लीत होते त्याच गल्लीत श्रीधरचे असल्याने, तो खेळतानाचा पहिला स्पर्श, ती पहिली नजरानजर, त्यानंतरची ती आंतरिक ओढ, भेटी-गाठी सारे सारे आठवून कशातच मन लागेना. पुन्हा पुन्हा एकच प्रश्न समोर उभा राहत होता, का ? तो का असा वागला असावा...? हा प्रश्न फारच जीवघेणा ठरत होता. काही काहीच कळत नव्हते नेत्राला आणि जाणून घ्यायची तर ओढ लागलेली म्हणून दुसऱ्या दिवशी कारण विचारण्यासाठी तिने फोन लावला.
रिंग जात राहिली पण समोरून काहीच प्रतिसाद येत नव्हता. खूप वेळा प्रयत्न करून एकदाही फोन उचलला न जावा, जाऊ देत, काही कामात गर्क असेल नंबर पाहून वेळ मिळाल्यावर तोच पुन्हा लावेल फोन असा विचार तिच्या मनात डोकावला. परंतू असे काहीच घडले नाही उलट कितीतरी दिवस नियमितपणे फोन करून देखील उचलला गेला नाही.
काही केल्या कोडे उलगडत नव्हते...
आणि एक दिवस अचानक श्रीधरने फोन उचलला, पुन्हा फोन करू नकोस इतकेच सांगण्यापुरता...
अरे पण कारण तरी समजू दे ना?
दोन मिनिटांच्या भेटीत असे काय घडले की गेल्या सहा महिन्यात फोनवर तास तास बोलणारा तू, अचानक फोन करू नकोस असे बोलतोस...??
नंतरचे काही वेळ ती फक्त ऐकत होती आणि तिचे डोळे मृग नक्षत्राप्रमाणे बरसत होते...
ती आपले मन व्यक्त करणार तरी कसे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने फोन ठेवला सुद्धा...
आभाळ भरून आल्यावर ढग बरसल्याने आकाश निरभ्र होते तसेच मन भरून आल्यावर मोकळे होण्यासाठी शब्द रुपाने बरसणे अनिवार्य होते पण लग्नानंतर नवऱ्याच्या संशयी स्वभावामुळे शेजारीपाजारी बोलण्याची चोरी तर मित्रमैत्रिणींचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
पतिपत्नीचं नातं जोपर्यंत मनाने एकजीव होत नाही तोपर्यंत गतकालीन स्मृती पुसल्या जाणे अशक्यप्राय होते, असेच काहीसे नेत्राच्या बाबतीत घडतं होते. सततचा अविश्वास तिला श्रीधरला विस्मृतीत जाऊ देत नव्हता. त्याचे ते प्रेम तिच्या मनाला रुंजी घालायचे.
आनंदा नेत्राचा नवरा, नेत्राच्या वयाच्या दुप्पट वय तर होतेच पण दोन मुलांच्या बापाबरोबर वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे लग्न ठरले त्याच रात्री तिने श्रीधरला घरात विचारायला सांगितले पण त्याने भितीपोटी नकार दिल्याने शेवटी बोहल्यावर उभे राहण्यापलीकडे नेत्राकडे काहीच पर्याय शिल्लक नव्हता...
लग्नानंतर जे प्रेम, माया, आपुलकीची एखाद्या जोडीदाराला गरज भासते ते सुख नेत्राच्या वाट्याला आनंदाकडून न आल्याने श्रीधर तिच्या मनातून बाहेर पडलाच नाही कधी व एकदा तिच्या मैत्रिणीने लग्नाच्या वीस वर्षानंतर फोनवर श्रीधर बद्दल सांगितले व तिचे मन पुन्हा त्याच्याकडे ओढले जाऊ लागले अनैतिकतेच्या भावनेतून नव्हे तर फक्त भावनिक प्रेमापोटी, जिव्हाळ्याचे दोन शब्द ऐकण्यासाठी...
ते शब्द म्हणजे, तू कशी आहेस? तू सुखी आहेस ना तुझ्या संसारात...??
पण छे, नियती एखाद्यावर इतकी कशी रूष्ठ असू शकते कोणास ठाऊक?
नेत्राची होणारी कुचंबणा, मानसिक तसाच शारीरिक छळ, त्यांच्या वयातील अंतर, त्यात दबल्या जाणाऱ्या तिच्या भावना आणि पहिल्या प्रियकरासाठीची तिची उचल खाल्लेली भेटीची ओढ, किमान श्रीधर भेटल्यानंतर मनाचा एक नाजूक कप्पा, भावनिक प्रेमाचा रितेपणा भरून येईल असे तिला वाटत होते, भेटीनंतर या गोष्टींचा पुरता भ्रमनिरास झाला.
मन घायाळ झाले तर जखम भरून काढण्यासाठी किती वेळ जाईल सांगणे अशक्य, मारलेले घाव जातात पण मनावरील शब्दांचा ओरखडा माणसाचे खच्चीकरण करतो असेच त्या झालेल्या फोनवरील संवादाने तिचे मन खचून गेले होते. काही केल्या मनातून विचार जायला तयार नव्हते.
दिवसामागून दिवस जात होते आणि मोठ्या भावाच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने तिला माहेरी जाण्याची संधी मिळाली. बाल मित्रमैत्रिणींना भेटता येईल, जीवनातील काही क्षण पुन्हा आनंदाने घालवता येईल, माहेरची ओढ जणू अंधारात एक सुखाचा कवडसा असेच काहीसे तिच्या मनाला वाटून गेले.
आयुष्यात काही गोष्टी हव्या-नको असल्या तरी जशा आहेत तशाच स्वीकाराव्या लागतात...
काही क्षणातच तिची ट्रेन स्टेशनवर पोहोचणारच होती....
माहेरच्या सुमधूर आठवणी तिच्या मनात रुंजी घालू लागल्या. त्याचप्रमाणे तिचे मन नकळत श्रीधरच्या आत्ताच्या आणि आधीच्या वागण्यातील तुलनात्मक बदल आठवता नैराश्याच्या दरीत खोल लोटलं जात होतं. मनाची नुसती घुसमट होत होती, बोजड घुसमट. हलकं होण्यासाठी मन मोकळं होणं गरजेच होतं आणि स्टेशनवर उतरताच तिला तिची बालमैत्रीण वसुधा दृष्टीस पडली, त्या रखरखत्या उन्हातही एक मंद वाऱ्याची झुळूक तिला सुखावून गेली...
श्रीधर भेटून गेल्यानंतरचा आजपर्यंतचा दाबून धरलेला हुंदका वसुधाच्या मिठीत तिने मोकळा केला.
काय गं, असे काय झाले रडायला...? वसुधाने विचारले.
ह्रदयात साठलेल्या वेदनेला सांत्वनाचा वारे लागताच अश्रू बनून ओघळू लागले.
असा नव्हता ना गं श्रीधर? नेत्रा बोलता बोलता रडू लागली. तू नंबर दिल्यानंतर गेले सहा महिने फोनवर बोलतांना म्हणायचा, तुझा तो रेखीव गोरापान चेहरा माझ्या मनात आजही तसाच त्या वहीतील गुलाबासारखा जपून ठेवलाय मी. किती सहन करतेस गं तू मला तुझे दुःख पाहवत नाही, हा खरंच त्याचा नाटकीपणा होता का गं? की फक्त प्रेमाचा मुखवटा धारण केला होता तो त्या भेटीत गळून पडला. जीवनाच्या काटेरी वाटेवर चालतांना फक्त एक त्याच्या भेटीची आस मला रोज नवजीवन जगायला भाग पाडत होती ते त्याचे प्रेम आठवून अन् त्याने असे वागावे, तुला आठवतो तो दिवस बाबा निवर्तलेला. तो दिवस माझ्यासाठी अतिशय कठीण परंतू त्याने मला दुःखातून उभारले. त्याच्या निस्सीम प्रेमाने भेटीच्या दिवसापर्यंत जगण्यास उभारी दिली. तो येणार असा फोन येताच मला स्वर्ग दोन बोट उरलेला. अतिशय आतूरतेने मी त्या दिवसाची वाट पाहिली. तो कसा असेल? कसा दिसत असेल त्यात देखील माझ्यासारखाच बदल झाला असेल का? की आजही तो पुर्वीइतकाच रूबाबदार दिसत असेल ?
परंतू भेटून गेल्यानंतरचा तो फोनवरील संवाद जीवघेणा ठरला.
मला काही आयुष्यभर त्याच्या खांद्यावर ओझे बनून राहायचे नव्हते तर जिव्हाळ्याच्या दोन बोलाची अपेक्षा बाळगली होती मी, हाच का तो श्रीधर जो माझ्यावर जिवापाड प्रेम करायचा की फक्त माझ्या तारूण्यातील देखणेपणावर...???
श्रीधरच्या एका भेटीसाठी आसूसलेली मी, आजपर्यंतच्या वेदनादायी आयुष्यातून त्याची एक वासनारहीत प्रेमळ मिठी सुखाच्या क्षणाचा एक कवडसा देईल, ह्या एका क्षणासाठी मी सारे आयुष्य वेचले. अन्याय सहन करून देखील जगले, मनात एक खुळी आस घेऊन...
आणि तो म्हणाला की तू आता पूर्वीप्रमाणे दिसत नाहीस, तुझा तो अवतार पाहून मला किळस वाटली.
मनापासून प्रेम करणारा श्रीधर कधीकाळी फक्त तिच्या सौंदर्यावर प्रेम करत होता ही गोष्ट तिच्यासाठी त्रासदायक ठरत होती. कोणीतरी आपल्यावर प्रेम करते ही भावना जशी सुखावणारी असते तसेच बाह्य सौंदर्य संपुष्टात आल्यावर ती व्यक्ती आपला द्वेष करते ही भावना क्लेशदायी ठरते. कथा, कादंबरीतून स्त्री सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की; तिच्या शारीरिक सौंदर्यापुढे आंतरिक सौंदर्य दुर्लक्षित होते.
जगात शारीरिक सौंदर्याचे आकर्षण हीच सर्वात मोठी गोष्ट आहे का? शारीरिक प्रेमापुढे भावनिक प्रेम दर्जाहीन का ठरवले जाते...?
बाह्य सौंदर्याला इतके महत्त्व दिले जाते की मनातील कोमल भावना यापुढे अर्थहीन ठरल्या जाव्या...??
आज ना उद्या जे सौंदर्य लुप्त होणार ते शारीरिक मग चिरकाल टिकणाऱ्या अंतरंगातील मृदु-कोमल भावना, आंतरिक सौंदर्याला काहीच महत्त्व नाही का?
नात्यांची श्रृंखला स्वभावावर जोडली जावी न की बाह्य सौंदर्यावर...
वेलींवरील फुलांचा टवटवीतपणा त्याच्या पोषक तत्वांवर अवलंबून असतो, कसदार माती, पुरेसा सुर्यप्रकाश, खत व पाणी मिळाल्यावर त्याचे निर्माल्य होईपर्यंत ते टिकते, नाहीतर अकाली गळून पडते...
असाच काट्यांनी वेढलेला गुलाब होती ती...
झाकोळलेले आभाळ बरसून स्वच्छ, नितळ, निरभ्र झाले होते...
जसे तिचे मन मोकळं होऊन.......!!!
.....# चंदना सोमाणी ©® पुणे
Friday, 24 November 2023
मराठी गझल आणि रसग्रहण - या मनाचे त्या मनाला
गझलेचे रसग्रहण - रवींद्र सोनवणे
मराठी गझल - नको सारखे रे...
Thursday, 23 November 2023
मराठी गझल आणि रसग्रहण - क्षण एखादा
गझलेचे रसग्रहण - बाळकृष्ण तिराणकर
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आदरणीय पै. इलाही सरांच्या आरशाहून मराठी गझल विश्वाला दुःखभारीत आरशाचे दुःख धुंद तरीही गंधाळ नि वेगळा आरसा दाखवणारी चंदना व माणसाच्या आयुष्यातील क्षणाक्षणावर ज्याची पकड आहे असा काळ, असा एखादा क्षण सौगात म्हणून आपल्या झोळीत टाकतो की आयुष्याला अनोखे वळण मिळते.
कालाय तस्मै नमः काळ हाच सर्वश्रेष्ठ आहे काळाने रावाला रंक नि रंकाला राव केले आहे..
या मातीने काळाला कवेत घेऊन असे अनेक आकाश स्वतःच्या कालपटात नि काळ पोटात गिळंकृत केली आहेत. तो निर्मम काळ ज्याला कुणाची तमा नाही, काळाला काळीज नाही, तो पूर्णतः नि:संग आहे. देहहीन आहे. त्याला मानवी अवयव नाहीत. तो सार्वकालीक व सर्वजयी आहे. त्याचा देह बनला क्षणाक्षणाच्या कणाकणांनी. अवघ्या ब्रम्हांडाला तो व्यापून आहे. मात्र त्याचा कालातीत अदृश्य देह हा क्षण क्षण जुळवून सरकत जातो, काळाचं हे अनभिज्ञ अजेय तत्त्वज्ञान सौ. चंदना सोमाणी गझलेत बांधू शकतात. काळाचा महिमा सांगण्यात संत महंतांनी, विचारवंत तत्त्वज्ञांनी आयुष्ये रिक्त केली समाज प्रबोधनासाठी. एवढा गोवर्धन चंदना कृष्णासारखी काही शेरांनी एका करंगळीवर पेलते, जे सहज साध्य नाही. त्याला चिंतनाचा आवाका मोठा असावा लागतो.
निरव शांततेचा भंग करीत अकस्मात चर्चच्या कळसावरून घनगंभीर चर्चबेल निनादते तेव्हा येशूच्या सुळावरील यातनांचा नि त्याच्या खिळे ठोकलेल्या जखमातून वाहून साकळलेल्या रक्त कणांच्या वेदनांचा दर्दभरा वास्तव-भास मन विदीर्ण करून जावा, एवढी एखाद्याची चिंतनशीलता ही प्रज्ञेच्या पलिकडील "तथाता"
या स्थितप्रज्ञ-समानुभूतीची असावी लागते, तेव्हाच काळाचा वेध घेता येतो. त्याच्या अंतरंगात अंमळ डोकावता येतं.
मानवी आयुष्य व देह हा पळ, क्षण नि श्वास निश्वास यांनी युक्त आहे. हे सारं संपृक्त होतं तेव्हा सारं संपून जातं.
आज सर्वांना माहीत असणारं वास्तव माणसे नजरेआड करतात. जीवनाची आपापली वाट चोखाळत राजमार्ग शोधत असतानाच संपून जातात. वाटेवर झडलेल्या फुलांच्या पायघड्या असतात, तर पुढे संपूर्ण मार्ग बाभूळबनातील कंटकांनी व्यापलेला असतो. कभी खुशी कभी गम.
अवघं आयुष्य सोसताना, पोसताना, सांभाळताना असा एखादा क्षण येतो की ज्याची अपूर्वाई कालातीत असते. तो क्षण वर्तमान नि भावी आयुष्य व्यापूनही उरतोच. हा अनुभव सर्वकालिक आहे आणि याच्या अगदी उलट, असा एखादा क्षण येऊन जातो की अवघ्या जिंदगीची माती करून जातो. अस्तित्व संपवून टाकतो. यापूर्वीचा गंधित दरवळ तो समर्थ बलवान क्षण एका वादळ फुंकरीत संपवून टाकतो. होत्याचं नव्हतं करून जातो म्हणून चंदनाची प्रज्ञा शेर पाझरते ---
आयुष्याला पुरून उरतो क्षण एखादा
काळ कधीच खोटे वागत नाही. फक्त तो सरतो, सरकतो तसा असत्याचे आवरण फाडीत जातो. अन त्याचेच अभिन्न अंग असलेला एखादा चुकार व टूकार क्षण खोटा ठरतो. पण त्यालाही दोष देता येणार नाही कारण त्यामागेही मानवी कृत्याचा सम्यक कार्यकारण भाव असतो.
आयुष्याच्या ग्रंथात आपल्याच नोंदी असतात आपल्याच पाऊलखुणा उमटत जातात. काही चटोर, काही कठोर , काही कमी, काही जास्त, काही छोटी, काही मोठी, काही लिहूनही कोरी, काही पानांवर व्यथा, काहींवर कथा, काही वेदना, काही संवेदना , काही सुखाने भारलेली तर काही दुःखाने घेरलेली अक्षरे उमटत जातात. काही पाने व्यवधानाने तर काही अनावधानाने कोरी राहतात. कधीकधी मागील सारी पाने भरून गेली असावी असे वाटते पण आज वरचा आपला अवघा ग्रंथ कोरा राहिला हे नंतर जाणवतं. वाघावर आरूढ होऊन येणाऱ्या चौदाशे वर्षे वयाच्या चांगदेवांनी दिलेला कोरा कागद पाहून त्यांच्या ज्ञानाचा कोरेपण दाखवून देणारी मुक्ताई मला चंदनाच्या रूपात दिसते. असा एक क्षण येऊन धडकतो की आयुष्याचा अवघा ग्रंथ क्षणात भरून जातो. हा अनुभूतीचा नि समानुभूतीचा प्रकार आहे हे सुज्ञास सांगणे न लगे.
कोरी पाने उलटत गेली भरली नव्हती
एकट्या दुकट्यालाच नाही तर कधीकधी सकल जगाला अचंबित करणारा एखादा क्षण येऊन जातो. क्षणात सुरू झालेले वादळाचे विप्लवी तांडव सारे काही नेस्तनाबूत करून जाते क्षणात आलेल्या एका त्सुनामीने. ज्याची स्वप्नातही कल्पना नसावी असे काहीतरी घडून जाते क्षणात आयुष्य वळण घेते निर्धाराचे नि नरेंद्रातून विवेकानंदांचा जन्म होतो. निर्णयाचा एकच क्षण, दुःख मुक्तीच्या विवंचनेने भारलेला कुणी राजकुमार सिद्धार्थ "तथाता" मार्गावर क्रमण करतो. मोहाचा एकच क्षण निर्धाराने टाळतो आणि गौतमाचा बुद्ध होतो. झाडाला वाटलेही नव्हते असे घडेल पण ते घडले. हे सारे ज्यात अंतर्भूत आहे तो शेर चंदना लिहिते---
माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
कळीकाळालाही त्याचेच एक अभिन्न अंग असलेला एखादा क्षण किती हळवा आहे हे कळत नाही त्याच्याच अंतरात तो सामावलेला असूनही. ज्यावर मानवी गुणांचे आरोपण झाल्यासारखा सुखात हसतो, दु:खात रडतो नि काही वेगळे दिसताच बावरतोही, एखादा क्षण असाही बावरतो हे काळालाही कधी कधी कळत नाही ही गंमत. त्याचं तप्त मन मानवी मनावर फुंकर घालणंही नियतीच नियोजन.
शेवटी शेवटी अंताची चाहूल लागते माणसाला. आता आपला प्रवास संपायला आला, मुक्कामाचे ठिकाण आल्याचा वास्तव- भास अनामिक भीतीने घेरून टाकतो माणसाचे अवघे अस्तित्व. डोळे ताठरतात, मन अनंताचा वेध घेते. मेंदू जागा आहे आठवांचे रसायन मेंदूला पुरवणार्या पेशींची अस्तित्वगामी घाबरी पळापळ सुरू आहे, काय आवरावे ? नि काय सावरावे कळत नाही. मन:पटलावर एकेक घटना चलचित्रासारख्या सरकत आहेत. माणसे, घटना, मान-अपमान, पैसा, कीर्ती, यातना, विवंचना, वंचना, फसगत, दगे देणारे सगे सारं सारं आठवतं जातं माणसाला अंतिम क्षणी निमिषार्धात. तो एकच क्षण. कदाचित शेवटच्या श्वासाचा अमूर्त अंतिम साक्षीदार. तो अंतिम क्षण पैलतटीच्या मोहक मुक्तीच्या सादेने मोहरून जातो. हा आशय घेऊन चंदना लिहिते---
पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
जे शक्य नाही त्याचाही वेध घेण्याची गुर्मीगर्भित भाषा मानवी मन बोलू लागते. त्याचं ते खुजेपण त्याला दाखवून देण्यासाठी कर्तव्य परायण चंदना लिहिते---
मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
शुभाशिर्वादासह बाळकृष्ण तिराणकर
चंदनाची फुले - रसग्रहण - 10
जगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल -
रसग्रहण - मधूकर जाधवजगण्यात आनंद फुलविणाऱ्या कविता नि गझल
मधुकर जाधव, सिन्नर
“चंदनाची फुले” हा सौ. चंदना सोमाणी यांचा कवितासंग्रह. फेसबुकावरील मैत्रीचे जे माणसं जोडणारे वलयं आहेत. त्यातून हा कवितासंग्रह मला भेट मिळाला. यावर भलावण वा टीका काहीतरी लिहावं म्हणून हा प्रपंच.
‘मनातले....’ मनोगतात त्या म्हणतात, ‘मी फक्त लिहिते...’ ह्या ओळी बरेच काही सांगून जातात. निर्मितीचा ध्यास सातत्य ह्यात दिसून येते. मा. म. भा. चव्हाण यांनी आपल्या मलपृष्ठावर दोन शब्दात ‘सत्य आणि सौंदर्याचा महोत्सव’ असं म्हणून गौरविले आहे.
कवितेच्या प्रांतात कवितेचं बेसुमार पिकं काढलं जात आहे. हे जरी खरं असलं तरी ह्या गदारोळात कवितेला काही हक्काची दालन खुली झाली आहेत. (फेसबुक, whats aap इ.)आणि त्यामुळे कवी कविता आणि आस्वाद घेणाऱ्यांची वर्दळ वाढली आहे. एकीकडे वाचन संस्कृती लोप पावली जात आहे काय ! हा सूर आळवत असताना त्या सोशल माध्यमातून नवोदित कवी कविता घेऊन येताहेत आणि रसिकही त्यांना क्रिया प्रतिक्रया दाद देतात. हेही नसे थोडके! सध्या हा पुराचा लोंढा आहे. त्यातला पुरासा बाजूला जावून नितळ पाणी आणि तळठावं निश्चित मिळेल हा आशावाद बाळगायला काय हरकत आहे ! कवितेचा दर्जा , संख्यात्मक, गुणात्मक हे जरा बाजूला सारून कवितेचा एक नवा प्रवाह मराठी साहित्याच्या दालनात समृद्ध होत आहे. त्यांचे स्वागतच करायला हवे. दिवाळी अंकाची मक्तेदारी आणि कविता उलट टपाली परत येणे ह्याला इथं फाटा मिळाला आहे. हे तेव्हढेच खरे.
मराठी साहित्याचा कल्पना आणि मनोरंजनाचा ढाचा तसाच ठेवीत काही कवी कवियित्री वर्तमान प्रश्नांची कैफियत आपल्या कविता नि गझल यामधून मांडीत पारंपारिक परिघाला छेद देण्याचे काम करीत आहे. इथे कवितेच्या जाणीवा समृद्ध होताहेत.
सुख दुःखाच्या सीमा सरकताहेत. दुःखाची भूमिका जेंव्हा दुय्यम आणि टोकाची ठरते तेंव्हा गळ्यात दाटून आलेला उमाळा बाहेर पडत नाही. आणि डोळ्यातले अश्रूही अतीव दुःखाने आटतात. ‘अक्षरांचा लळा’ यामध्ये कवियित्री हेच टिपते,
मन आणि मनांतल प्रेम ही जोडगोळी भेटीची अपेक्षा ठेऊन जगत असते. आशा निराशेचं वादळ मनांत रुंजी घालत असतं. जेंव्हा ही गळाभेट होते तेंव्हा नकळत कवियित्री शब्द रेखाटते,
विभक्त कुटुंब पद्धतीची रौंदळीचा इतका विपर्यास झाला आहे की ज्यांनी पोटाला चिमटे घेत आपली पिढी जोपासली ती अडगळ ठरू पाहताहेत. मग कवियित्री मर्मावर बोट ठेवीत म्हणते,
माणूस हा समाजात वावरताना त्याभोवती आणिक कंगोरे राजकीय, सामजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक रिंगण करून असतात. चालू राजनीतीवर माणूस हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा कसा आहे ते ह्या कवितेत विस्तृतपणे येते,
सगळीकडून अंधारून आलं आहे. जीवन जगण्याचा सारा कोंडवाडा होत आहे. जिंदगी डावावर लावली जात आहे. यावर कवियित्री म्हणते,
अत्याचारानं कळस गाठला आहे. याची शिकार होतेयं अबला स्री. तो अन्याय, ती सल ही जुलमी परंपरा कवियित्री इतिहासाचा दाखला देत चितारते,
‘आहेरे’ ‘नाहीरे’ हे वास्तव कवयित्रीनं नेमकेपणाने मांडलं आहे. वंचितांची तहान म्हणजे गरीबी श्रीमंताची दरी अधिकच रुंदावते आहे. ती संपवायला इथली व्यवस्था अपुरी पडली आहे. म्हणून ज्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड चवदार तळ्याची सामाजिक लढाई छेडली ते पाणीही चवदार नाही अशी स्पष्टोक्ती सोमाणी यांनी निर्भीडपणे व्यक्त केली आहे,
आयुष्यातील लेखाजोखा मांडताना चंदना सोमाणी यांनी एक नवीन ताळेबंद चितारला आहे. त्यामध्ये बाकी मोठे शून्य येतच नाही. हा ताळेबंद कधीच टॅली होत नाही. कुशल आणि अकुशल कर्माचा हा हिशोब असं कवियित्री स्पष्टपणे नोंदवतेय,
चंदनाची फुले ह्या कवितासंग्रहात गझल आणि मुक्त छंदातील कवितेचा हा सुरेख आकृतीबंध आहे. कविता कमी व गझल अधिक आहेत. गझलेचा पाढा वाचताना वृत्त, मात्रा आणि अक्षरी ह्याला हात न लावता भावलेल्या गझलांचा मनाला भिडणारा संवाद इथे मोलाचा वाटतो. तसेच कवितेचं दालन पाहताना मुक्त छंदातील कविताही उत्तम आहेत. शब्दांची ओढाताण न करता सहज भाषेतली मांडणी भावते. त्यामुळे कविता दुर्बोध होत नाही. कवितेत नवखेपण कुठेही आढळत नाही. जगण्याचं समीकरण मांडत जीवनात आनंदोत्सव साजरा करणाऱ्या ह्या गझल आणि कविता आहेत. अजूनही कवियित्री चंदना सोमाणी ह्यांना समता विषमतेचा कॅनव्हास व्यक्त व्हायला वाव आहे. भावी वाटचालीला मंगल कामना !
मधूकर जाधव, सिन्नर
Madhukarjadhav353@gamil.com
चंदनाची फुले
सौ. चंदना सोमाणी
पृथ्वीराज प्रकाशन
३५३, नारायण पेठ, लक्ष्मी रोड,
पुणे – ४११ ०३०
किंमत रू. १५०.००
Wednesday, 22 November 2023
मराठी गझल गायन - अश्विन जावडेकर, गझल - चंदना सोमाणी
सर्व्हर डाऊन...
मराठी गझल गायन - स्वरसाज - गायत्री गायकवाड, गझल - चंदना सोमाणी
Friday, 17 November 2023
मराठी गझल - बघू नंतर
किती दोघातले अंतर.. बघू नंतर
कुणाला लागली घरघर.. बघू नंतर
कुणाची चालली मरमर.. बघू नंतर
कुणी भरली इथे घागर... बघू नंतर
कुणाचा आटला सागर... बघू नंतर
इथे झाले कुणी बेघर.. बघू नंतर
कुण्या दारी किती झुंबर..बघू नंतर
मला ना भेटला आदर.. बघू नंतर
कुणाची केवढी चादर... बघू नंतर
जरी झालेच मन जर्जर.. बघू नंतर
स्मृतींचे साचलेले थर... बघू नंतर
Tuesday, 14 November 2023
लहानपण देगा देवा...
Monday, 13 November 2023
मराठी गझल आणि रसग्रहण - पाखरूही भीत नाही..
फक्त गझलेसाठी गृप वरचा Balkrishna Tirankar काकांचा नितांतसुंदर अभिप्राय 🙏🌹 मनापासून धन्यवाद काका 😊
चंदनाची फुले - रसग्रहण - 9
***चंदना सोमाणी***
कवयित्री-गझलकारा मा. चंदना सोमाणी यांचा 'चंदनाची फुले' हा गझल आणि कविता संग्रह वाचनात आला. निर्मळ मनाची माझी ही पोरगी जसे जगते तसेच लिहिते...जगण्याच्या परिघात येणारी सुख-दुःखे, आसू-हसू समंजसपणे स्वीकारत पुढे जाणारा तिचा प्रगल्भ प्रवास या संग्रहात प्रत्येक ओळीत दिसून येतो. या प्रवासाची नश्वरता तटस्थपणे पाहणे आणि सहज स्वीकार करणे फारसे सोपे नसते. जेव्हा एखाद्या संवेदनशील मनाला ते सहज जमून जाते तेव्हा समर्थ शब्दातून ते अभिव्यक्त होते.
ती लिहिते :-
या आणि यासारख्या बहारदार शब्दातून जगण्याचे तत्वज्ञान या कविता सांगत राहतात. असे जगत असताना वाट्याला येणारी उपेक्षा, वंचना आणि शोषण कवयित्रीला अस्वस्थ करते. परिस्थितीचे तौलनिक आकलन करून या विषमतेवर नेमके बोट ठेवणारी तिची कविता समानतेचे महत्व अधोरेखित करते. उतू जाणारी श्रीमंती आणि तेलाच्या थेंबासाठी तडफडणारे जगणे हा विरोधाभास कसा कमी होईल हा सनातन प्रश्न तिची कविता मांडत राहते.
एकूणच, मनाला भुरळ घालणाऱ्या शब्दांची हजारो फुले चंदनाच्या या संग्रहात आपल्याला दिसून येतात...त्याच्या सुगंधाने रसिक धुंद होऊन जातो...
बेटा, मनःपूर्वक अभिनंदन💐💐💐पुढील साहित्यिक प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा💐💐
चंद्रकांत वानखेडे
मराठी गझल - क्षण एखादा...
होत्याचेही नव्हते करतो क्षण एखादा
फाटत जातो बुरखा टरटर सत्याचा अन्
म्हणता म्हणता खोटा ठरतो क्षण एखादा
कोरी पाने उलटत गेली...भरली नव्हती
शेवट सारी पाने भरतो क्षण एखादा
माझी नाही तुमची नाही साऱ्यांचीही
क्षणात एका गफलत करतो क्षण एखादा
किती वंचना, किती वेदना, किती यातना
हसरी फुंकर घालत सरतो क्षण एखादा
काळालाही कळला आहे कधी कुठे तो
हसतो, रडतो अन् बावरतो क्षण एखादा
पैलतटावर धुन मृत्यूची ऐकू येता
ऐलतटावर मग मोहरतो क्षण एखादा
मीच थोपवू शकतो केवळ सूर्यालाही
तशाच केवळ भ्रमात हरतो क्षण एखादा
चंदना सोमाणी ©®
Saturday, 11 November 2023
मराठी गझल - तुझ्यामाझ्यातले अंतर...
जरा मिटवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
जरा समजून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
मला तू भेटतो तेव्हा, दिलासा देत जातो तू
जरा चकवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
कुणाला वाटु दे इर्षा, कुणाला वाटु दे हेवा
जरा उजळून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
नको नुसतेच लावू तू मधाचे बोट ओठांना
जरा उमजून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
नभाला हाक देऊ चल, उन्हाला साथ देऊ चल
जरा वळवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
नभाने झाकले आहे तुला काही मला काही
जरा हरवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
किती तू लांब गेला बघ, पुन्हा परतून येतो का ?
जरा मिळवून घेऊ चल तुझ्यामाझ्यातले अंतर
चंदना सोमाणी ©®
चंदनाची फुले - रसग्रहण - 8
सुगंधी - चंदनाची फुले...
चंदनाची फुले - रसग्रहण - 7
गझल आणि कवितांचा सुरेख संगम
गझल आणि कवितांचा सुरेख संगम असणारा हा काव्यसंग्रह पुणे येथील पृथ्वीराज प्रकाशनाने प्रकाशित केला आहे . मुखपृष्ट व मलपृष्ठ आकर्षक असून पुस्तकाची मांडणी व क्वालिटी सर्वोत्तम आहे. काव्यसंग्रहास समर्पक असेच शीर्षक व म.भा चव्हाण यांनी केलेली पाठराखण कवयित्रीच्या व्यक्तीरेखास अनुरूप अशीच आहे. या संग्रहामध्ये आशयगर्भ दर्जेदार गझला पहायला मिळतात. निसर्ग, सद्य परिस्थिती, प्रासंगिक, सामाजिक, वैचारिक, तसेच मानवी भावनांचे विविध रंग आढळून येतात. कवयित्रीचे शब्दांवरील प्रेम, संवेदनशीलता, वेगळेपणा, सर्वोत्तम लेखन कौशल्य शब्दातीत आहे. निसर्गाचे वर्णन किती वेगळेपणाने गझलेतून मांडता येते हे चंदनाच्या गझल वाचल्यावर लक्षात येते. या संग्रहात पयोधर, ओठांगुणी, लांघून यासारख्या शब्दांचा वापर केलेला आढळून येतो. गुलमोहर मोहरेल हा शब्द गझलेत पुर्णपणे बसवायचा होता पण न बसल्याने या शब्दांची संधी करून "गुलमोहरेल" हा नवीन शब्द तयार कसा झाला हे गप्पांच्या ओघात तिच्या तोंडून छान वाटले, दुर्दुःख, सुमनपाखरू यांसारखे काही नवीन शब्दही आढळतात. संग्रहातील गझल असो वा मुक्तछंद त्यांची लय नकळत वाचकांच्या मनात /ह्रदयात झिरपते. यातील काही गझला संकेत नागपूरकर यांनी संगीतबद्ध केल्या आहेत ही आपल्यासाठी अत्यानंदाची बाब...
संग्रहातील सर्वच गझल अप्रतिम आणि उल्लेखनीय आहेत. ओघवत्या भाषेतील मुक्तछंदही सुंदर आणि दखलपात्र आहेत. शेवटी असणारी एकच खट्याळ लावणी भाव खाऊन जाते. अनेक पुरस्कारांसाठी दखलपात्र ठरलेला हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला नाही तर नवलच........
एकुणच प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच हा काव्यसंग्रह आहे. कवयित्रीच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. आपल्या हातून अशाच दर्जेदार साहित्याची निर्मिती व्हावी व उत्तरोत्तर आपल्या यशाचा आलेख चढता असावा या सदिच्छासह...........!!!💐💐
संग्रहातील मला भावलेल्या काही गझल व मुक्तछंद म्हणजे..............
*गझल*
1) निवास माझा -
गझल म्हणाली मला चंदना
तुझ्यात आहे निवास माझा
2) सुध्दा वाटतो आता नकोसा......
ओळखीची माणसेही वागती खिल्जीप्रमाणे
पद्मिनी जोहार सुद्धा वाटतो आता नकोसा
3) कोंडमारा :-
जिथे फास घेतोस कृषका अरे त्या
तरूंच्या मनांचा किती कोंडमारा
*कविता* :- हिशोब, बेहिशोब ,प्रश्नचिन्ह, स्त्री तुझी अजब कहाणी, मैत्री, इत्यादी इत्यादी इत्यादी.........
💐💐💐💐💐💐💐
शब्दांकन:- ✍ सौ. वनिता कोराटकर
Friday, 10 November 2023
मराठी गझल - मरणाचा होणार सोहळा
असेल माझा जन्म वेगळा फार फार तर
रंग लागला या देहाचा त्या देहाला..
राधेलाही रंग सावळा फार फार तर
एकच असते गोष्ट नव्याने सांगत सुटतो
दारापुढचा एक भोपळा फार फार तर
उलटी गंगा वाहत आहे...हेच सांगण्या
एक पराचा हवा कावळा फार फार तर
हेही माझे... तेही माझे... सारे माझे
जन्मभराचा सोस पांगळा फार फार तर
नातू होतो त्यानंतर मग पणतू साठी
पुन्हा गुंततो पाय मोकळा फार फार तर
जन्म देऊन मृत्यू साठी जो अडकवतो
तोच लावतो इथे सापळा फार फार तर
चंदना सोमाणी ©®
Thursday, 9 November 2023
मराठी गझल - तिथे थांबून गेलेल्या...

तिथे थांबून गेलेल्या युगांचे काय झाले मग
मनावर खोल रुजलेल्या व्रणांचे काय झाले मग
उगा ती पानगळ नव्हती, जरासे कालचे आठव
तुझ्या वाटेत आलेल्या फुलांचे काय झाले मग
जरी कोसळ म्हणाले मी तरी जे साचले होते
तुझ्या डोळ्यात दिसलेल्या ढगांचे काय झाले मग
जिथे भेटायचे ठरले तिथे अंधार होता, पण
तुला वेढून असलेल्या दिव्यांचे काय झाले मग
जराशी रात्र कललेली जरासे चांदणे होते
अशा नाजूक वेळी काहुरांचे काय झाले मग
पुन्हा परतून येणेही तुला जर शक्य नव्हते तर
वृथा बंदिस्त झालेल्या दिशांचे काय झाले मग
चंदना सोमाणी ©®
चंदनाची फुले - रसग्रहण - 6
प्रतिभेचं आणि अलंकारिक शब्दसौंदर्याचं प्रतिबिंब
प्रतिभेचं आणि अलंकारिक शब्दसौंदर्याचं प्रतिबिंब पडलेलं चंदनाची फुले कविता आणि गजल संग्रह प्रतिभावंत कवयित्री, लेखिका चंदना सोमनाथ सोमाणी { पुणे } यांनी लिहिलेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये कवितांचा आणि गजलचा सुंदर असा भावअविष्कार वाचकांना अनुभवयाला मिळतो . मी हा काव्यसंग्रह नुकताच वाचला. काव्यसंग्रहामधील कविता आणि गजल वाचून कवियित्रीच्या प्रतिभेची,सखोल अशी निरीक्षणाची, दुरदृष्टीची आणि शब्दांवरील प्रेमाची वाचकांना अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.
कवियिञीनी मनोगतामध्ये लिहिलंय, मी फक्त लिहिते.शब्द शब्द जोडता जोडता अनेक नाती जुळत गेली.
कवियित्रीचं हे मनोगत वाचून शब्दावर भरभरून प्रेम करणारी शब्दवेडी कवियिञी अस वाचकांच्या मुखातून निघाल्याशिवाय राहत नाही.
शिवाय,कवितासंग्रहाचं मुखपृष्ठही सुंदर आणि मनोवेधक झालेलं आहे.पाण्यात तरंगणारी तेजोमय फुलांची आरास. फुले आपल्याला सुगंधमय करून टाकत असतात. वातावरण दरवळून टाकत असतात. तर तिमिरातून प्रकाशाकडे नेणारी ही ज्योत आपलं मानवी जीवन तेजोमय करून टाकीत असतात. कविता आणि गजल वाचता वाचता आपणही अगदी नकळतपणे शब्दांच्या विश्वामध्ये रमून जातो आणि कविताही आपल्याशी संवाद साधू लागतात.
चंदनाची फुले म्हणजेच भावनांच, विचारांच सुंदर असं रूप आहे. विविध विषयांना स्पर्श करणारी कविता आणि गजल आपल्याही आणि आपल्या जीवनालाही वैचारिकतेने समृद्ध करुन जाते. लिहिलेली प्रत्येक ओळ भावना आणि आशय यांनी परिपुर्ण आहे. शब्दांना सजवून साजश्रृंगारीत करून भावनेची जोड देऊन कवियित्रीनी कवितांना वाचकांसमोर ठेवलेले आहे. एकुण ५७ कविता आणि गजल या काव्यसंग्रहामध्ये आहे.
आपल्या पहिल्याच कवितेत त्या लिहितात,
चांदण्यांच्या घरी चंदनाची फुले
चंदनाच्या परी चंदनाची फुले
या ओळींमधुन कवियित्रीला हेच सुचवायचं आहे की, या जगामध्ये जे जे चांगल आहे, उदात्त आहे, शाश्वत आहे ते ते निरंतर टिकून राहणार आहे. याच मुळे मानवी मुल्य आणि विचारांना महत्व आहे.ज्याप्रकारे नभमंडळ चांदण्यांनी सुशोभित दिसत असते त्याचप्रकारे कवियित्रीलाही आपल जीवन या चंदनाची फुले या काव्यसंग्रहानी उजळून निघालेले आहे अस वाटत आहे.
अक्षरांचा लळा या कवितेत त्या लिहितात
असा अक्षरांचा लळा चंदनाला
जसा व्यापतो अर्थ आकाश सारा
शब्दांच वैभव आणि श्रीमंती लाभलेल्या कवियित्रीला शब्द हेच सर्वस्व आहे आणि याच शब्दांनी आपल्याला एक ओळख मिळालेली आहे ही मनोमन भावना मनी वसलेली आहे.आकाश जस अवघ्या सृष्टीला व्यापुन टाकत असते त्याचप्रकारे याच शब्दांनी आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त झालेला आहे अस कवियित्रीला या ओळींमधून सुचवायचे आहे.
शब्दमैफील या कवितेत त्या लिहितात,
तुझी आठवण गंध माळून यावी
जशी रातराणी फुलारून यावी
किंवा
अशी चंदनाने लिहावी गझल की
जशी स्वप्न कक्षेस लांघून यावी
अगदी सांजवेळी सुखद अशा गार वातावरणामध्ये रातराणी फुलारून यावी त्याचप्रकारे तुझ्याही आठवणी मनामध्ये दरवळत याव्या आणि शरीराचा कण नी कण मोहरून यावा, गंधाळून यावा अस या ओळींमधून कवियित्रीला सुचवायचे आहे.
मानवी जीवनप्रवृत्तीवर भाष्य करताना रंग माणसाचे या गझल मध्ये त्या लिहितात,
चुटकीसरशी रंग बदलतो
तो जगण्याचे ढंग बदलतो
माणूस आपल्या स्वार्थासाठी आपले विचार, आचार आणि नीती बदलवित असतो आणि आपलंच कसं भलं झालं पाहिजे यांचाच विचार तो करीत असतो.
त्यांच्या सर्वच कविता वाचनीय झालेल्या आहेत. आपल्यालाही त्या विचार करायला भाग पाडतात. आपलं अनुभव विश्व विस्तारून टाकतात.
काही कवितांचा उल्लेख करावासा झाल्यास लेखनीचा रंग, कुणास ठाऊक, प्रश्न आयुष्याचे, मनातील सल, क्षण, स्ञी तुझी अजब कहाणी, इच्छा, ओंजळीतील भावफुले या कविता आपल्या भावरूपी विचारांना विचार करण्यास बाध्य करतात.
म.भा.चव्हाण सरांनी कवियित्रीबद्दल किती सुंदर लिहिलंय,
चांदण्यांने धाडलेले पत्र आहे चंदना
हासणारे लाडके नक्षत्र आहे चंदना...!
असा हा सुंदर,भावस्पर्शी,वाचनीय असा काव्यसंग्रह आपल्या संग्रही असावा.हा काव्यसंग्रह तुमच्या विचारांना,भावनांना आणि जगण्याच्या पद्धतीलाही बदलवून टाकेल. वाचकवर्गानी या काव्यसंग्रहाचं भरभरून स्वागत केलेले आहे.
खर तर,तुमच्या चंदनाची फुले या काव्यसंग्रहाचा दरवळ आमच्यापर्यंतच काय सगळीकडे पोहोचलेला आहे. त्यामुळे हा काव्यसंग्रह वाचण्याची उत्सुकता मला होतीच. त्यामुळेच मी हा काव्यसंग्रह तुमच्याकडून मागवून घेतला. या काव्यसंग्रहामधील कविता आणि गजल वाचुन मी धन्य झालो. तुमची प्रतिभा आणि तुमच्या सर्जनशीलतेचं जितकं कौतुक करावं तितकं कमीच.
मानवी जीवन, नातेसंबंध, मानवी प्रवृत्ती आणि विचारधारा, व्यथा, वेदना, सुख दुःख यावरही तुम्ही छान लिहिले आहे. त्यामुळेच सामान्य वाचकही या काव्यसंग्रहाकडे आकर्षित झाला असल्यास नवल वाटणार नाही. एक चांगला, दर्जेदार काव्यसंग्रह वाचण्याचे समाधान मिळालं ते वेगळंच. मानवी जीवनाच्या आशा, आंकाक्षाचं प्रतिबिंब पडलेल आणि तुमच्या कल्पकतेनी आणि प्रगल्भतेनी, कल्पनाशक्तीनी हा काव्यसंग्रह आणखीनच सुंदर आणि वाचनीय झालेला आहे.
धन्यवाद चंदनाजी एक चांगला आणि वाचनीय काव्यसंग्रह तुमच्या लेखणीतून, विचारातून साकारल्याबद्दल.
पुढील वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेछा. हा स्नेह, लोभ असाच वृद्धींगत होत जावो हीच मनोकामना.
कवियिञी चंदनाजींचे मी सुंदर असा काव्यसंग्रह लिहिल्याबद्दल मनापासुन अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस शुभेछा व्यक्त करतो.
राजू गारमाडे 🙏🏻
काव्यसंग्रह : चंदनाची फुले
कवियित्री : चंदना सोमनाथ सोमाणी
प्रथम आवृत्ती : डिसेंबर २०१८
प्रकाशक : पृथ्वीराज प्रकाशन पुणे
पृष्ठे : ८०
मुल्य : ₹ १५०
चंदनाची फुले - रसग्रहण - 5
दोन शब्द ---
अशोक सोनवणे सर, आपली कौतुकाची थाप पाठीवर पडली आणि अत्यानंद झाला...कारण पुढचे पाऊल टाकण्यासाठी ही थाप फार महत्वाची......💐🙏
चंदनाची फुले
~~~~~~~
दोन शब्द.....
कवितेची अनवट वाट चालताना अडखळणारी कवयित्री चंदना सोमाणी चं नवं पुस्तक "चंदनाची फुले "वाचलं आणि जाणवलं की ती आता लीलया काव्य पथावर दमदार पावलं आत्मविश्वासाने टाकते आहे.
गझल आणि कवितांचा सुरेख संगम असणारी ही कविता सशक्त अभिव्यक्ती सादर करते. समर्थ प्रतिमा आणि संपन्न प्रतिभा यांचा सुंदर मेळ इथे आढळतो.
नवनवीन काव्य-विभ्रम दर्शवणारी ही कविता म्हणजे मनातले भाव कागदावर अविरत वाहणाऱ्या झऱ्या/नदीगत उमटत राहते.
कधी विरहिणी, कधी प्रेयसी तर कधी मंतरलेल्या लेखणीची सखी होते. म्हणून ती मनाच्या को-या पानावर चांदणे कोरते असे कवयित्रीला वाटत राहते.
चंदनाची फुले शायरी सांडते. कधी गझल स्वप्न कक्षेस लांघून जाते. कंकणांचा नाद मनाला दाद वाटते. वातीने कापसाला जाळावे, जसा घरातला भेदीच, हळव्या फुलाला वा-यानं छळावं तसा स्वप्नात भावनांचा कोंडमारा होतो, इ.इ.अनेकविध प्रतिमा मन वेधून घेतात.
गझलकार म.भा.चव्हाण यांनी पाठराखण करताना म्हटले आहे की, चंदनाचं शब्दांचं उद्यान समृद्ध आहे. जीवन जगणं ही एक कला आहे. त्याचं कवितेत रूपांतर करण्याची कला तिला साधली आहे. हे संग्रह वाचताना जाणवत राहतं.
काही तत्वज्ञानसदृष विधानं ही इथं भेटतात.
उदा. जिंदगी बेजार आहे, बाजार आहे, टांगती तलवार आहे. ओळखीची माणसेही वागती 'खिल्जी'प्रमाणे. पाखरूही भीत नाही गोफणीला, भावकीची ओढ नाही भावकीला. गंध नाही पण तरी तो-यात बहरे टणटणी, चलनात आज शिक्के खोटे जिथे तिथे..शोधून सापडेना कलदार फारसे, लेखणी जन्मास आली तरी का आयुष्याचं कोरं पान ?
सदाचाराची साठव नगद, दुराचाराचा कर खर्च. आणि त्याग,समर्पण फक्त चंदनाचेच का?सहाण पण झिजते सोबत....
अशा लक्षणीय ओळीं सोबत गझलेसह मुक्त छंदातल्याही छान कविता "चंदनाची फुले"या संग्रहात आढळलतात.
काही प्रेम या सदाबहार विषयावर कविता करण्याचं वय आणि नाद कवयित्रीला लिहितं ठेवतो. त्याचा आस्वाद प्रत्यक्ष वाचूनच वाचक/रसिक यांनी घ्यावा...
एकूणच कवयित्री चंदना सोमाणी याचा हा संग्रह वाचनीय आहे. तसेच भावी लेखनाचा चढता आलेख दाखवणारा नक्की आहे. म्हणून कवयित्रीला अभिनंदन आणि शुभेच्छा व्यक्त करीत आहे.....
-अशोक नीलकंठ सोनवणे
कितनी बातें...
कितनी बातें... हममें तुममें रह जाती हैं कितनी बातें चश्म-ए-नम भी कह जाती हैं कितनी बातें सब्र की पाबंदी तो नाज़िल है जुबां पे, ख़ामोशी में ...
-
गझल - सांजवेळी ही उदासी काजळी पेरीत येते सांजवेळी ही उदासी का मला शोधीत येते सांजवेळी ही उदासी याद येते त्या क्षणांची ज्या क्षणांवर प्रेम...
-
मराठी गझल - प्रश्न हजारो घुटमळलेले प्रश्न हजारो अन् दबलेले प्रश्न हजारो याला सुद्धा, त्याला सुद्धा सतावलेले प्रश्न हजारो नवीन कोडी सोडवत...
-
गझल - कोणती विराणी अंधार या मनाचा की कोणती विराणी मी आळवीत आहे गाणी उदासवाणी वाटे मनास माझ्या येथून दूर जावे आभाळ मागते हे फिरुनी पुन्हा न...























